जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका लग्नात लग्नाच्या कार्यक्रमात काही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. यावेळी लग्न मंडपातील महिलांसोबत असभ्य वर्तन काही तरुणांनी केले. त्यानंतर त्या कट्टरपंथी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी कार्यक्रमावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुमारे १२ ते १५ हल्लेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना २४ जून रोजी घडली.
हे प्रकरण अलवर जिल्ह्यातील रामगढ पोलिस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. येथील खोह गावात दि. २४ जून रोजी बाबूलाल मेघवाल यांच्या मुलीचे लग्न होते. यावेळी डीजेच्या तालावर बिंदोरीचा कार्यक्रम सुरू होता. याचदरम्यान काही कट्टरपंथी तरुण तेथे पोहचले आणि ते लग्न मंडपातील महिलांसोबत नाचू लागले. त्यावेळी वधूच्या कुटुंबीयांनी त्यांचा विरोध केला.पीडित जयकिशनने सांगितले की, कट्टरपंथी भरधाव वेगात दुचाकीवरून लग्न मंडपात घुसले. त्यानंतर त्यांनी तिथल्या महिलांसोबत असभ्य कृत्य करण्यास सुरूवात केली.
दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांना कट्टरपंथीयांनी धमकी दिली आहे. यावेळी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आले. त्यानंतर कट्टरपंथी छतावर चढून लग्न समारंभात उपस्थित लोकांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांनी ५ आरोपींवर कलम १५१ अंतर्गत शांतता भंगाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर जवळपास १२ लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. इतर आरोपींवरही एससी-एसटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पीडित जयकिशनच्या म्हणण्यानुसार, याआधीही २-३ वेळा लोकांसोबत मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र पीडित कुटुंब मूग गिळून गप्प होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.