सेवा आणि कर्तव्याचा दीपस्तंभ

    26-Jun-2023   
Total Views |
Article On Entrepreneur Smita Yashwant Ghaisas

प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती आणि रा. स्व. संघाच्या विचारांतून कार्य, अशी जीवनपद्धती स्वीकारलेल्या स्मिता यशवंत घैसास. उद्योग आणि समाजकार्य करणार्‍या स्मिता यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

माझी इच्छा आहे की, माझ्या सहचारिणीने सामाजिक कार्यात मला साथ द्यावी. अगदी ती द्यायची नसेल, तर मला अडवू नये.” रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेल्या त्या स्वयंसेवक तरुणाने- यशवंत घैसास यांनी त्याच्या भावी वधूला म्हणजे स्मिता अंतरकर यांना विचारले. त्यावेळी स्मिता यांनी यशवंत यांना होकार दिला. त्यानंतर सामाजिक कार्याचा घेतलेला वसा घैसास दाम्पत्याने घेतला कधीच टाकला नाही. यातूनच पुढे स्मिता यांनी उद्योगविश्वातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्या ‘एमएसएमई नॅशनल बोर्ड ऑफ गर्व्हमेंट ऑफ इंडिया’च्या सदस्य, पुणे ‘डिव्हिजनल प्रोडक्टीव्हिटी काऊंसिल’च्या सदस्य, ‘मिनीलेक इंडिया प्रा.लि’च्या अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर, ‘लघु उद्योग भारती’च्या उपाध्यक्ष आणि ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’सारख्या ऐतिहासिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षही आहेत. दुसरीकडे त्यांची सामाजिक संस्था आहे. समाजाचा आणि देशाचे कल्याण करायचे, याच ध्यासातून स्मिता यांनी व्यवसाय वृद्धिंगत केला. या काळात ’वनवासी कल्याण आश्रमा’चे भास्करराव कळंबी यांचे स्मिता यांना मार्गदर्शन लाभले.

दुर्गम खेड्यातल्या बांधवांकडे थोडी शेतजमीन असते आणि कामासाठी राबणारे हात असतात. या कष्टकरी माणसाला त्याच्या स्थानिक परिसरात त्याची गुणवत्ता विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायलाच हव्यात. स्वाभिमानी, सदाचारी, संपन्न वनवासी हे स्मिता यांचे ध्येय ठरले. त्यातूनच मग स्मिता यांच्या संस्थेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, ओडिशा राज्यातील दुर्गम वनवासी पाड्यांच्या सक्षमीकरणासाठी काम सुरू केले. पाच हजार पाड्यांमधील अडीच लाख कुटुंबाच्या आर्थिक आणि सर्वच प्रकारच्या सक्षमीकरणाचे काम स्मिता यांनी केले. अर्थात, त्यांचे पती यशवंत यांचा मोलाचा सहभाग आहेच. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन ते दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना दारिद्य्र रेषेवर आणण्यासाठी स्मिता सध्या कार्यरत आहेत. वनवासी बांधवांसाठी अत्यंत भरीव समाजकार्य करणार्‍या आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातही भरारी घेणार्‍या स्मिता यांना समाजात मानाचे स्थान नसेल तरच नवल. उद्योजकतेबद्दल त्यांना ‘बेस्ट इंजिनिअरिंग इंटरप्रीन्योर अवॉर्ड’, ‘महिला चेतना दिन अवॉर्ड’, उद्योगिनी गौरव पुरस्कार, ‘इंटरप्रीन्योर ऑफ द इअर’ पुरस्कार प्राप्त आहेत, तर त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना ‘नानाजी देशमुख पुरस्कार’, ‘डॉ. हेडगेवार पुरस्कार‘, ‘ग्रीन वर्ल्ड पुरस्कार’, ‘महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कार’, ‘जनकल्याण समिती पुरस्कार’ प्राप्त आहेत.

स्मिता यांचा हा प्रवास सहज अजिबात नाही. ‘मिनीलेक प्रा.लि.’च्या सुरुवातीच्या दिवसांत एक मोठी ऑर्डर मिळाली. ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवले. मोठी जागा घेतली; पण सगळे केल्यानंतर अचानक ती ऑर्डरच रद्द झाली. नव्या उमेदीने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवू इच्छिणार्‍या स्मितांसाठीही हे निराशाजनकच होते. पण, जराही नाउमेद न होता, त्यांनी पुन्हा व्यवसायाचा श्रीगणेशा केला आणि राखेतून फिनिक्स पक्ष्याने झेप घ्यावी, तशी त्यांनी उद्योग-व्यवसायामध्ये उत्तुंग झेप घेतली.

आपल्या कंपनीच्या उत्पादनाची माहिती व्हावी, यासाठी त्या हॅनोव्हर फेअरला गेल्या होत्या; पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. इतर कंपन्यांचे स्टॉल पाहावे, म्हणून त्या प्रदर्शनी पाहायला गेल्या. तिथून परतल्यावर स्टॉलवर बसलेल्या त्यांच्या कंपनीच्या माणसाने सांगितले, “मॅडम, एक परदेशी माणूस आपल्या स्टॉलवर आला होता. त्यांच्याकडे एक असेंबल केलेले कार्ड होते. त्याला तशी कार्ड बनवून हवी होती; पण आपल्या कॅटलॉगमध्ये ते कार्ड नव्हते, म्हणून आम्ही नकार दिला.” हे ऐकून स्मिता खूपच अस्वस्थ झाल्या? त्यांनी तो परदेशी माणूस कसा दिसत होता वगैरे माहिती घेतली. इतक्या मोठ्या प्रदर्शनामध्ये आलेल्या असंख्य माणसांमधून स्मिता यांनी तो माणूस शोधला. त्याच्याकडून कामाची ऑर्डरही मिळवली. त्यासाठी त्या हॅम्बर्गला गेल्या आणि ती ऑर्डर मिळवून पूर्णपणे यशस्वीही केली. इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे बारकावे कळावे म्हणून त्यांनी काही वर्षे इलेक्ट्रॉनिक विषयाचा अभ्यासही केला.

असो. सरसंघचालक सुदर्शनजी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे अनेकदा मार्गदर्शन लाभलेल्या स्मिता यांच्या यशकीर्तीचा प्रवास अत्यंत वेधक आहे. कोकणातल्या डुगावसारख्या दुर्गम खेड्यामध्ये रामकृष्ण आणि कमला अंतरकर यांची कन्या स्मिता. अंतरकर दाम्पत्य अत्यंत समाजशील. त्या जेव्हा आठ वर्षांच्या होत्या, तेव्हाच शिक्षणासाठी त्या आईच्या आईकडे ठाण्याला शिकायला आल्या. अकरावी उत्तीर्ण होऊन पुढचे शिक्षण त्यांनी चिपळूणच्या महाविद्यालयातूनच घेतले. याच काळात त्यांचा विवाह यशवंत घैसास यांच्याशी झाला. अंतरकर आणि घैसास कुटुंब दोन्ही ठिकाणी रा. स्व. संघाच्या विचारांंनी प्रेरित होऊन काम करणारी मंडळी. स्मिता म्हणतात, ”सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. परंतु, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांचे हे वाक्य प्रमाण मानून कार्य करते आणि भगवंत कशात आहे, हे रा. स्व. संघाने आणि स्वामी विवेकानंदांनी शिकवलेलेच आहे,” अशा या कर्तृत्ववान स्मिता घैसास आणि त्यांचे विचारकार्य समाजासाठी दीपस्तंभच आहे.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.