मुंबई : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले असून अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या संमेलनाच्या तारखासुध्दा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अमळनेर येथे दुसऱ्यांदा संमेलन भरणार असून २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हे संमेलन असणार आहे, असे साहित्य महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, साहित्यिक न. म. जोशी यांनी उपस्थिती दर्शविली होती. या बैठकीमध्ये रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
डॉ. रवींद्र शोभणे यांचा परिचय
साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले असून १९८९ मध्ये मॉरिस महाविद्यालयातून त्यांनी पीएच. डी. मिळवली. डॉ. रवींद्र शोभणे हे उत्तम कथालेखक म्हणून सुपरिचित असून १९९१ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह "वर्तमान" प्रसिध्द झाला. डॉ. शोभणेंना अनेक सन्मान मिळाले असून पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यांकडे होते. तसेच, सन २००७ ते २०१२ यादरम्यान ते मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्यपदी ते होते.