नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका उपस्थित होते.
संसदेच्या ग्रंथालयात झालेली ही बैठक सुमारे तीन तास चालली. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग (काँग्रेस), डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस), मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड सिंग (एनपीपी), एम थंबीदुराई (अद्रमुक), तिरुची शिवा (द्रमुक) पिनाकी मिश्रा (बीजद), संजय सिंह(आप), मनोज झा (राजद) आणि प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना उबाठा) आदी नेते उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी उपस्थित नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीची माहिती दिली. त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित केली जाईल, असेही शाह यांनी स्पष्ट केले आहे.
बैठकीदरम्यान, गृह मंत्रालयाने हिंसाचार कशामुळे झाला आणि आतापर्यंत कोणती पावले उचलली गेली हे स्पष्ट केले. सर्व पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या चिंता व्यक्त केल्या, अशी माहिती भाजप नेते संबित पात्रा यांनी दिली.