ठाणे : नालेसफाईत 'हातसफाई' करणाऱ्या एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतरही शहरातील कळवा,मुंब्रा,वागळे इस्टेट भागातील बहुतांश नाल्यांमध्ये अद्याप काहीच सफाई झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव दै.मुंबई तरुण भारतने मांडले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार या ठेकेदारांना साडेआठ लाखांचा दंड ठोठावला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने यंदा एप्रिलमध्येच नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली. सुमारे १० कोटी खर्चुन नऊ प्रभागांमध्ये नऊ ठेकेदारांकरवी नालेसफाई करताना मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी नालेसफाईवर करडी नजर ठेवली होती. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे व नागरिक यांच्याकडून येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करुन नालेसफाई चांगल्या दर्जाची होण्याकडे कटाक्ष ठेवला होता.मध्यंतरी, उथळसर प्रभागात समाधानकारक कामे न केल्याचा ठपका ठेवुन दंड आकारल्यानंतर मे.जे. एस इन्फ्राटेक या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले होते.
तरीही, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट तसेच घोडबंदर भागातील काही नाल्यांच्या सफाईत ठेकेदारानी हातसफाई केल्याचे वास्तव दै. मुंबई तरुण भारतने उघड केले होते.दरम्यान, आ. संजय केळकर आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनीही श नालेसफाईची पोलखोल केली होती. अनेक नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढिग दिसून आल्याने केळकर यांनी प्रशासनावर टिकेचे आसुड ओढले होते.त्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेत कामे पुर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी आणि उथळसर भागातील ठेकेदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या ठेकेदारांना ८ लाख ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे नालेसफाईत कुचराई करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.