आणीबाणीमध्ये भगूरचे एकनाथ शेटे स्थानबद्ध

    24-Jun-2023
Total Views |
Mrutyunjay Kapase Article On Emergency

भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वथा निंदनीय, देशातील जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्यास बाधक, जुलमी हुकूमशाहीचा काळा कालावधी ठरावा अशी २५ जून १९७५ मध्यरात्रीपासून दि. २१ मार्च १९७७ या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी...

या आणीबाणीमध्ये देशातील सर्व विरोधी व्यक्ती, पक्ष, संस्था संघटनेचे नेते, कार्यकर्त्यांना सक्तीने अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. त्यावेळी भगूरसारख्या क्रांतिकारी गावातून रा. स्व. संघाच्या प्रमुख व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यामध्ये भगूरचे तत्कालीन शहर संघचालक तुकाराम तथा दादा रहाणे, ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर अण्णा जोशी, शंकरराव शेटे, श्रीधरपंत रहाणे, रामदास आंबेकर आणि एकनाथराव सहादू शेटे यांचा समावेश होता.

या आणीबाणीला आता ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथराव शेटे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून प्रत्यक्ष आणीबाणी विषयक आठवणी आणि त्यांना अटक झाल्यावरचे स्वानुभव याची जवळून माहिती मिळाली. दि. १३ नोव्हेंबर १९७५ ला नाशिकमधील रविवार कारंजा येथे असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. रा. स्व. संघाचे सक्रिय स्वयंसेवक आहेत म्हणून सरळ त्यांच्यावर ‘मिसा’ कायदा लावण्यात आला. त्यांची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू स्व. शंकरराव शेटे यांना अटक झाली. एकाच कुटुंबातील दोन ज्येष्ठ व्यक्तींना जेलमध्ये डांबल्यावर त्यांच्या कुटुंबावर केवढे मोठे संकट कोसळले असेल. त्यांच्या कुटुंबीयांनी न डगमगता या संकटाला मोठ्या धीराने तोंड दिले.

त्यांच्यासोबत परिसरातील श्याम बालानी, हरिभाऊ दोंदे, विंचुरी दळवी येथील नामदेव दळवी यांनाही अटक करण्यात आली. आपला अनुभव सांगताना एकनाथराव शेटे म्हणाले की, आता कोरोनामुळे जशी भीती पसरली आहे, त्यापेक्षा अधिक भीती आणीबाणीवेळी पसरली होती. प्रत्येक अटक केलेल्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील समस्या दिसत होत्या.

त्यावेळी समाजातून जुलमी शासनाच्या भीतीपोटी सर स्तरावर विरोध, अपमान, क्लेशदायक अनुभव वाट्याला आले. समाजातील काही जणांना वाळीत टाकले गेले. कापड व्यापारी, किराणा दुकानदार यांनी ‘मिसाबंदी’ असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला उधारी बंद केली.एकनाथराव यांना जेलमध्ये ४८ क्रमांकाच्या कोठडीत ठेवले होते.त्यांच्यासोबत पेठ येथील अण्णा गजभार होते. सुरुवातीला घरच्यांना भेटण्यास मनाई होती. नंतर महिन्यातून दोनदा भेटण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, शेटे कुटुंबाने ही देशसेवा आहे, ते व्रत मानून जेलमधील बाहेरगावच्या सहकारी मित्रांना खाद्यपदार्थ पुरविले. इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने अटक केलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबाची काळजी घेत होते.

शेटे यांनी तुरुंगात असताना आलेला एक हृदयद्रावक अनुभव सांगितला. छत्रपती संभाजीनगर येथील स्वयंसेवकांना जवळजवळ एक वर्ष होत आले, पण घरचे भेटायला येऊ शकले नाही. घरून नाशिकला येण्यासाठी एका व्यक्तीला २५ रुपये एकवेळेचे भाडे लागते. त्यामुळे ये-जा आणि पत्नीला सोबत अजून एक जण म्हणजे दुप्पट खर्च होणार. इतके पैसे माझ्या कुटुंबाकडे नाहीत. शेटे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्या घरी पैसे पाठविले आणि त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली.

संगमनेर येथील कासट यांचे लग्न झाले आणि लगेच त्यांना अटक झाली. अनेक जणांनी त्रासून आत्महत्या केल्या. परिस्थिती इतकी भयानक होती की, आपली माणसे जेलमधून कधी सुटणार, असा मोठा प्रश्न होता. अशा बिकट परिस्थितीमध्ये मात्र संघकार्य सुरु होते. अनेक गरजू कुटुंबांना कार्यकर्ते मदत करीत होते. जेलमध्ये सुद्धा रोज संघ शाखा लागत असे. ती गोलाकार बसवून पद्य, खेळ, बौद्धिक, प्रार्थना होत असे. त्यावेळी जेलमधील अन्य सहकार्‍यांमध्ये रा. स्व. संघाचे प्रल्हाद अभ्यंकर, बाबाराव भिडे, अनंतराव भालेराव, बाबाराव दाते, मोहन धारिया, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा सर्वांच्या सहवासाने उत्साह वाढला आणि त्याचा उपयोग पुढे संघटनात्मक वाढीसाठी झाला. आजही त्या सर्व कार्यकर्त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे. विजयादशमीला दरवर्षी पद्य म्हणून एकनाथराव सर्व कार्यकर्त्यांवर देशप्रेमाचा संस्कार करतात.

खंडेराव खैरनार स्थानबद्ध

धुळे जिल्ह्यातील संघ स्वयंसेवक खंडेराव खैरनार यांना पुणे येथील खेड तालुक्यातील विहिंपच्या विद्यार्थी वसतिगृहाचे पूर्णवेळ व्यवस्थापक असताना अटक झाली. दि. २५ ऑगस्ट १९७६ रोजी त्यांना नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळी अनेक संघ स्वयंसेवकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकांची घरे, संसार उद्वस्थ झाले.सर्व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य चांगले राहावे, म्हणून संघाच्या ज्येष्ठ मंडळींनी जेलमध्ये विविध कार्यक्रमातून योगवर्ग, विविध भाषा वर्ग घेतले.सूर्यनमस्कार, नाट्य स्पर्धा घेऊन सकस वातावरण तयार केले. १९७७ मध्ये सुटका झाल्यावर खैरनार यांच्यासह त्यांच्या गावातील बाजीराव मुळे, बाळकृष्ण शहा यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

मृत्युंजय कापसे
९८६०३१०१३०