मुंबई : राज्यातील सत्तेत कमबॅक केल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला शक्य तितके राजकीय हादरे देण्याचा सपाट लावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण दर मंगळवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर करत पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. त्यातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात धक्का दिला असून रत्नागिरी जिल्ह्यातील काही नेते अन कार्यकर्त्यांचा प्रवेश लवकरच होणार असल्याचे भाजपातील सूत्रांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या काही कार्यकर्त्यांचा मंगळवार, दि. २७ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तटकरे यांचा निकटवर्तीय असलेला तो नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य पातळीवरील एक पदाधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हा पक्षप्रवेश केवळ ट्रेलर असून अजून काही मोठे धमाके येत्या काळात होतील असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.