२६ जून १९७५... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रांताचा अभ्यासवर्ग नगरला चालू होता. त्या दिवशीच्या वर्गाच्या पहिल्याच सत्रात मा. बाळासाहेब आपट्यांनी २५ जूनच्या रात्री इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी आणि तिच्या आपल्या देशावर होणारा हा गंभीर परिणाम आणि त्या विरुद्ध लढावे लागेल, अशी एकूण मांडणी केली. ’लंबी लडाई हैं’ असं ते म्हणाले. संघावर बंदी लगेच आली आणि धरपकडही लगेच सुरु झाली. संघाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रमुख आणि तोपर्यंत पकडले न गेलेले कार्यकर्ते भूमिगत झाले. वर वर नित्य कार्यक्रम आणि अंतर्गत आणीबाणी विरुद्ध संघर्षाची तयारी असा क्रम सुरुवातीचे काही दिवस सुरू राहिला.
शैक्षणिक वर्ष सुरु झाले होते. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गुरुपुजन, प्रथम विद्यार्थी सत्कारासारखे कार्यक्रम आम्ही (विद्यार्थी परिषदेने) सुरु केले. त्या त्या ठिकाणी सत्याग्रहात सहभागी होऊ शकणार्यांची चाचपणी होत होती. प्रांत टीमच्या दोन बैठका झाल्या आणि प्रांतामध्ये होणार्या सत्याग्रहांच्या योजनेसाठी पुण्यात बैठक घेण्याचे ठरले. वर वर शैक्षणिक संविमर्श आणि अंतर्गत सत्याग्रहांची तयारी असा कार्यक्रम ठरला. दि. १२ ऑक्टोबर १९७५ला पहाटे ६ वाजता सर्व कार्यकर्त्यांसमोर बाळासाहेबांनी सत्याग्रहांचा एकूण आराखडा मांडला. ९ वाजता संविमर्शाचे उद्घाटन झाले.
पुण्यातल्या सत्याग्रहांची योजना झाली. आदल्या दिवशी एका जनरल कार्यक्रमाचे पत्रक कार्यालयात आलेल्या ङ.ख.इ.च्या प्रतिनिधीला दिले होते. पोलिसांची तारांबळ उडावी, या हेतूने पहिल्या दिवशी एकाच वेळी सात महाविद्यालयांवर सत्याग्रह करायचे ठरले. प्रत्येक ठिकाणी वेगळा प्रकार करायचा, ज्यातून पोलिसांच्या निर्णयाचा गोंधळ उडावा, अशी योजना होती. प्रकाश जावडेकर यांच्या गटाने प्रथम पुणे विद्यापीठात सत्याग्रह केला आणि महाविद्यालयांवरील सत्याग्रहांची मालिका सुरु झाली. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुमारे २५० कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. त्यात ३५ विद्यार्थिनी होत्या. एक महिना २१/२ महिने अशा मुदतीच्या सर्वांना शिक्षा झाल्या व सर्वांची रवानगी येरवडा जेलमध्ये केली.
आमची रवानगी अर्थातच महिला जेलमध्ये झाली. तेथे ‘मिसा’अंतर्गत अटक झालेल्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आमच्या स्वागतासाठी तयार होत्या. जयवंतीबेन महता, अहिल्या रांगणेकर, सुमतीताई सुकळीकर, प्रमिला दंडवते अशा एकूण २० जणी तेथे होत्या. आमच्या त्या मावश्याच झाल्या. त्या ज्येष्ठ आणि आम्ही महाविद्यालयीन तरुणी. आम्हाला त्या आधार वाटायच्या आणि आमच्या तरुण, खेळकर वावराचा त्यांना तुरुंगवासात आनंद मिळायचा. त्यांना मिळणार्या शिध्यातून त्या आम्हाला रोज नवनवीन पदार्थ खायल्या घालायच्या. त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करायचो. सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे आमच्या गटात होत्या. त्यामुळे विविध कार्यक्रमांची आखणी सुलभ झाली. अनेक कार्यक्रमांच्या संहिता अरुणा लिहायची. त्यात नाटक, व्याख्यानमाला, प्रजासत्ताक दिन, संक्रांत उत्सव, शिक्षा संपलेल्या गटासाठी अश्रूपूर्ण निरोप समारंभ असे कार्यक्रम असायचे. ’इंदिरा हम को सजा करे। और जेल में हम सब मजा करे।’ अशा घोषणा देत सर्व कार्यक्रम चालू होते.
मध्ये मध्ये कोर्टाच्या तारखा यायच्या! पोलीस व्हॅनमधून त्या त्या गटाला कोर्टात नेले जायचे. ’ये मस्ताने कहाँ चले, जेल चले भाई जेल चले’ अशा घोषणा देत येरवडा ते कोर्ट आणि परत असा प्रवास व्हायचा. रोज रात्री काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि एक वार्तापत्र असायचे. दिवसभरातल्या तुरुंगातल्या आणि समजलेल्या बाहेरच्या बातम्यांचे वार्तांकन त्यात ‘जनवाणी येरवडा केंद्र’ हे त्याचे नाव. त्याची दखल त्याकाळी सरकारनेही घेतली होती. संध्याकाळी ६ वाजता आम्हाला बराकीत बंद केले जायचे. त्यानंतर त्याचे लिखाण व्हायचे. रात्रीचा कार्यक्रम झाल्यावर मुलींची दंगामस्ती, झोपल्या झोपल्या टाकाटाकी चालू व्हायची ती उशीरापर्यंत. मग प्रातःस्मरणाला उठायला त्रास व्हायचा.
सत्याग्रहांचे पर्व संपल्यावरही जवळ जवळ एक वर्ष आणीबाणी राहिली. तुरुंगातल्या काळात ‘मिसा’तल्या ज्येष्ठ महिलांशी जडलेला स्नेहबंध इतका घट्ट होता की, आणीबाणी उठल्यावर जनता पार्टीचे राज्य येईपर्यंत तो खूप वाढत गेला. या सर्व काळात सर्वजणींची शारीरिक, मानसिक आणि राजकीय विचारांची स्थिती सांभाळण्याचे काम सर्वच जणी आपापल्या परीने करीत होत्या.
नंतरचा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. या लिखाणाच्या निमित्ताने या सर्व पर्वाचे स्मरण रंजन झाले. धन्यवाद!
अंजली परचुरे-देशपांडे