जीवघेणी औषधे...

    23-Jun-2023
Total Views |
Indian drugs after cough syrup deaths In Gambia

गेल्या वर्षी गाम्बिया येथे ६६ आणि उझबेकिस्तानमध्ये १८ लहान मुलांचा भारतीय बनावटीच्या कफसिरपमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर भारतीय औषध उत्पादकांकडून निर्मित खोकला आणि तापाची औषधे दूषित किंवा निकृष्ट औषधे म्हणून ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ‘स्कॅनर’खाली आहेत. भारत आणि इंडोनेशिया या देशांमध्ये निर्माण होणार्‍या औषधांचा आजपर्यंत १५ पेक्षा जास्त भिन्न उत्पादकांसह २० हून अधिक उत्पादनांवर परिणाम झाला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’द्वारे भारतीय खोकला आणि तापाच्या औषधांची तपासणी केली जात आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’चे सदस्य देश दूषित किंवा निकृष्ट औषधे तयार करत आहेत, असा ठपका ‘डब्ल्यूएचओ’ने ठेवला. ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रवक्तत्या मार्गारेट हॅरिस यांनी यांनी केलेल्या विधानानुसार ‘स्कॅनर’अंतर्गत सर्व उत्पादने पॅरासिटामॉल, खोकला आणि जीवनसत्त्वे अशांसारखी सिरप आधारित आहेत.

‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले की, याबाबत तपास सुरू असून, तरी अद्याप यासंबंधी काही ठोस दुवा हाती आला नाही. दरम्यान, निकृष्ट आणि हानिकारक औषधांचा तपास चालू असताना, ‘डब्ल्यूएचओ’ने वैद्यकीय उत्पादनांच्या सूचनांच्या यादीतही वाढ केली नाही. गेल्यावर्षी गाम्बियामध्ये दूषित औषधांमुळे मानवांवर झालेल्या परिणामांचे धक्कादायक अहवाल समोर आले. त्यानंतर इंडोनेशिया, उझबेकिस्तान, मायक्रोनेशिया आणि द मार्शल आयलंडमध्येही या प्रकारच्या औषधांचे असे दुष्परिणाम दाखवणारे निष्कर्ष प्राप्त झाले. ’डब्ल्यूएचओ’कडून वैद्यकीय उत्पादनांना ‘अलर्ट’ करून त्याच्या प्रमाणीकरणाची आणि दुष्परिणामरहित बाबींची हमी दिली जाते, असे असूनही अशा प्रकारे औषधांचे दुष्परिणाम अथवा त्यांच्या निकृष्टेसंबंधी ही घटना घडली. ही नक्कीच गंभीर बाब मानली जाते.

‘डब्ल्यूएचओ’ औषधांचा दुष्परिणाम अथवा त्यामुळे प्रभावित रुग्ण असलेल्या देशांकडून कारवाई करण्यायोग्य माहिती प्राप्त केल्यानंतर वैद्यकीय उत्पादनावर सूचना(अलर्ट) जारी करते. ’अलर्ट’मध्ये हरियाणास्थित ‘मेडेन फार्मास्युटिकल्स’, नोएडास्थित ‘मेरियन बायोटेक’, पंजाबस्थित ’क्यूपी फार्माकेम’ आणि हरियाणास्थित ’ट्रिलियम फामा’ या कंपन्यांची नावे नमूद केली गेली. या कंपन्यांनी तयार केलेल्या खोकला आणि सर्दी औषधांमध्ये ‘डायथिलीन ग्लायकोल(डीईजी)’ किंवा ‘इथिलीन ग्लायकोल(ईजी)’ या घटकांच्या प्रमाणापेक्षा अधिक मात्रेचा समावेश आढळला. ‘डीईजी’, इॅजी’ युक्त औषधी मानवांसाठी अत्यंत घातक व विषारी ठरले आहेत. गाम्बियामध्ये झालेल्या बालमृत्यूची कारणमीमांसा करता त्यांचा थेट संबंध ‘मेडेन फार्मास्युटिकल्स’ या औषधी उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या खोकला व सर्दीच्या औषधांशी जोडला गेला. उझबेकिस्तानमधील मृत्यूच्या कारणांचा अहवालात ‘मेरियन बायोटेक’ निर्मित उत्पादनावर मोठा ठपका ठेवण्यात आला. या कंपनीने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कफसिरप औषधांवर ‘डब्यूएचओ’बंदी घातली.

एकीकडे भारताने ‘कोविड’वरील प्रभावी लस शोधून त्याचा पुरवठा जगातील इतर देशांना करून औषधनिर्माण आणि लक्षनिर्मिती क्षेत्रात मान उंचावली असे असताना खोकल्यासाठी दिल्या जाणार्‍या कफसिरफ आणि तत्सम औषधांमुळे जर देशाची प्रतिमा नकारात्मक होणार असेल, तर जागतिक औषध निर्माणात अग्रेसर होणार्‍या भारतासाठी ही बाब नक्कीच भूषणावह नाही.
जगभरात ४० टक्के जेनेरिक औषधे भारताकडून वितरित केली जातात. सध्या जागतिक स्तरावर ’एड्स’चा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘अँटिरेट्रोव्हायरल औषधांपैकी ८० टक्क्यांहून अधिक औषधांचा पुरवठा भारतीय औषध कंपन्यांकडून होतो.

केंद्र सरकारने देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर खराब होऊ नये, म्हणून गेल्याच महिन्यात कफसिरप औषधांची निर्यात करताना सरकारी प्रयोगशाळांमध्ये संबंधित उत्पादनाची चाचणी झाल्यानंतरच परदेशात पाठवण्याचे निर्देश दिले होते. दि. १ जूनपासून हा निर्णय देशभर लागू झाला. कफसिरप निर्यात करताना निर्यातदार कंपनीला सरकारी प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधित उत्पादनाची चाचणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्य सरकारे आणि निर्यातदारांनी या अधिसूचनेची सुरळीत अंमलबजावणी करण्याचेही यावेळी आदेश देण्यात आले आहेत.

निल कुलकर्णी