जनतेची नाडी ओळखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये कसब : न्यूयॉर्क टाईम्सचे विश्लेषण
22-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वास्तवाची जाण असून ते जनतेची नाडी अतिशय नेमकेपणाने ओळखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमाचाही मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वृत्तपत्राने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रात मुजिब मशाल यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेस ‘डिकोड’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमाचा मोठा वाटा असल्याचे मुजिब मशाल यांनी लेखात म्हटले आहे. अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या विशालतेत स्वतःला सर्वव्यापी केले आहे. या कार्यक्रमामुळे केंद्र सरकारवर टिका करणाऱ्या परस्पर उत्तर मिळते. ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्यासाठी टिप्स देतात, जलसंधारणावर बोलतात, लोकांना ग्रामीण जीवन आणि शेतीच्या आव्हानांबद्दल जागरूक करतात आणि त्यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधतात. त्यांना वास्तवाची जाण असून त्यामुळेच ते भारतीयांची नाडी ओळखण्यात यशस्वी ठरले आहेत, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.
‘मन की बात’ कार्यक्रमामुळे नागरिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांची माहिती होते. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशात होत असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या सकारात्मक बदलांबद्दल बोलतात. पंतप्रधान मोदी हे केवळ जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान म्हणून लोकप्रिय नाहीत तर देशातील जनतेवर त्यांचा खूप प्रभाव आहे म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक धोरणामध्ये भारताचा वारसा प्रतिबिंबीत होत असल्याचेही लेखात म्हटले आहे.