कराची बंदर ते लब्बैक...

    21-Jun-2023   
Total Views |
Pakistan PM Shahbaz Sharif With Tehreek-e-Labbaik

शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाची पूर्ण कारकिर्द विवादास्पद आहेच. अंतर्गत हिंसा, कर्जबाजारीपणा, अनाचार आणि अराजकता याचे दुसरे नाव म्हणजे पाकिस्तान. अशा या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजूर केलेल्या ६.५ अब्जच्या कर्ज राशीतले अडीच अब्ज कर्ज अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने मागे न्यूयॉर्क येथील रूझवेल्ट हॉटेल भाड्याने दिले. आता तर पाकिस्तानचा इतिहास, भूगोल ज्याच्याशिवाय सुरू होणार नाही, असे कराची बंदरही पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीला देण्याचे ठरवले.
त्या बदल्यात अर्थातच पाकिस्तानला आर्थिक साहाय्य होणार. देशाचा भूभाग असा इतर देशांना देऊन टाकणार्‍या पाकिस्तानची ही देशभक्ती? अर्थात, आजपर्यंत पाकिस्तानची देशभक्ती म्हणजे भारतावर जळायचे, अस्सल खलनायकी षड्यंत्र रचत भारतात समस्या कशा निर्माण होतील, यासाठी काम करायचे हीच होती. पण, ‘बेडूक कितीही फुगला तरी’ ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानुसार पाकिस्तानने कितीही कुभांड रचले, तरी तो भारताची बरोबरी करू शकला नाही, आणि आता तर काय पाकिस्तान अभूतपूर्व कंगालतेकडे चालला आहे.
या अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानी सरकारने ‘तहरिक-ए-लब्बैक’ या दहशतवादी संघटनेला आपले राजकीय सोबती जाहीर केले. ‘लब्बैक’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणखी धर्मांध कट्टरतेकडे वळतोय. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा भयंकर गुन्हा आहे. ‘तहरिक-ए-लब्बैक’ या संघटनेची मागणी मान्य करत आता कायद्यानुसार ईशनिंदेचा आरोप असलेल्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करून सजा देणार, असा निर्णय पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने घेतला. गेले अनेक दिवस ‘तहरिक-ए- लब्बैक’ नावाची पाकिस्तानमधील संघटना या आणि अशा प्रकारच्या ११ मागण्या घेऊन आंदोलनं करत होती. २०२१ साली इमरान खानच्या सरकारने या संघटनेला दहशतवादी घोषित केले.
 मात्र, आता शाहबाज यांच्या सरकारने ‘तहरिक-ए-लब्बैक’ संघटना दहशतवादी नाही, असे जाहीर करून येणार्‍या काळात या संघटनेसोबत निवडणूक लढवायचेही संकेत दिले. हे सगळे का, तर शाहबाज शरीफचे कट्टर विरोधक इमरान खान यांच्यावर ईशनिंदेचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता इमरान खान यांना तत्काळ दहशतवादी ठरवून कारवाई करता येईल, असे गणित शाहबाज सरकारचे आहे. पाकिस्तान आता ‘भिकिस्तान’ होत असताना त्याने ‘तहरिक-ए-लब्बैक’ या दहशतवादी संघटनेला रान मोकळे करून दिले. ‘लब्बैक’ची स्थापना २०१५ साली खादिम हुसैन रिझवी याने केली होती. ‘गुस्ताख ए रसूल की एक ही सजा सर तन से जुदा’ हा या संघटनेचा नारा.
पाकिस्तानमधला आसिया बेगम आणि ईशनिंदा हा खटला जगभरात गाजला. पाकिस्तानच्या शेखपुरा गावात आसिया ही ख्रिस्ती महिला तिच्या मुस्लीम मैत्रिणीसोबत शेतमजुरीचे काम करत होती, तर शेतीचे काम करताना तेथील सर्व मजदूर महिलांना तहान लागली. त्या मुस्लीम महिलासांठी पाणी कोण आणणार, तर आसियाच. कारण, मुस्लिमेतर अल्पसंख्याक समाजाला इथे दुय्यमच दर्जा. त्यामुळे आसिया सर्व महिलांसाठी पाणी आणायला गेली. मात्र, तहानेने तिचाही जीव कासावीस झालेला. त्या महिलांना पाणी देण्याआधी आसिया स्वतः पाणी प्यायली. आमच्या आधी पाणी का प्यायलीस, म्हणून त्या महिला तिच्याशी वाद घालू लागल्या. मुस्लीम कसे श्रेष्ठ, अल्ला कसा श्रेष्ठ सांगू लागल्या. तेव्हा आसिया म्हणाली, “जिजस श्रेष्ठ आहे.” या एका वाक्यावरून आसियावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवला गेला आणि तिला मृत्यूची सजा सुनावली गेली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची निंदा झाली. शेवटी तिची मुक्तता करण्यात आली. मात्र, त्यावेळी ’तेहरिक-ए- लब्बैक’ने फतवा काढला की, ईशनिंदेच्या गुन्ह्यातून आसियाची सुटका करणार्‍या सगळ्यांनाच मृत्यूंदड मिळणार. न्यायाधीश आणि सरकारी अधिकार्‍यांनासुद्धा. अशा या दहशतवादी संघटनेने किमान आठ वेळा विविध घटनांवरून पाकिस्तानमध्ये हिंसक खुनी हंगामा माजवला. अर्थात, पाकिस्तान सारख्या देशासोबत असेच होणार. एकीकडे राजकीय स्तरावर अनागोंदी माजली आहे, दुसरीकडे आर्थिक स्तराचे पार मातेरे झाले आणि त्यात आता अधिकृतरित्या दहशतवादी घोषित झालेली संघटना पाकिस्तानच्या सरकारसोबत आहे.
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.