‘ट्री-मॅन ऑफ कांदिवली’

    21-Jun-2023   
Total Views |
Article On Tree Man Gyanmal Bhandari

मुंबईत शेकडोंच्या संख्येने वृक्षारोपण करणार्‍या ग्यानमल भंडारी यांची ही गोष्ट. झाडे लावून, जगवून आणि ती पुन्हा जळली तरी निराश न होता, त्यांची पुनर्लागवड करणार्‍या या ‘ट्री-मॅन’विषयी...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती...
ही तुकोबांची उक्ती सर्वज्ञात. झाडे- वनस्पतींचे जीवनातील महत्त्व तुकोबांनी अगदी नेमकेपणाने या अभंगात सांगितले आहे. या उक्तीला अगदी जागणारे ग्यानमल भंडारी. झाडांचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व. कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेणे, पावसाच्या चक्रामध्ये झाडांचे असणारे कार्य याबरोबरच इतर अनेक कामे झाडे करत असतात. पृथ्वीवरील वातावरण आणि तापमान संतुलित ठेवण्यासाठी ही झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, त्यामुळे एकूणच जैवविविधतेवर होणारे परिणाम या सगळ्यांची कल्पना जगाला आहेच. आपल्यापरीने यात साहाय्य करता यावे, या दृष्टिकोनातून मुंबईतील कांदिवलीमध्ये काम करणारे ग्यानमल भंडारी.

राजस्थानातील साकरोदा या आपल्या मूळच्या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचे बालपण अगदी सुखात गेले. लहानपणापासून हिरवळ आणि झाडांशी जवळचा संबंध आल्यामुळे झाडांवर तसेच, निसर्गावर त्यांचे विशेष प्रेम. कधी बाहेर भटकंतीला गेल्यावर किंवा शाळेची वाट धरलेली असताना त्यांच्या लक्षात यायला लागले की, दमल्यावर किंवा उन्हातून खूप चालल्यावर झाडांची सावली किती उपयुक्त ठरते. झाडांच्या सावलीत बसून थंडावा आणि ताजी हवा घेणे, काय असते, हे त्यांनी अगदी जवळून अनुभवलेलं. त्यामुळेच की काय, झाडांबद्दलचा आदर आणि ऋणानुबंध त्यांच्या मनात लहानपणीच रुजला गेला होता. शाळेत जाताना अशी झाडांची सावली मिळाल्यामुळे रस्ताभर झाडेच झाडे का नाही, असा विचार त्यांच्या बालमनात डोकावत असे. शाळेत असल्यापासून म्हणजेच वयाच्या १३-१४ वर्षापासून त्यांनी शाळेत आणि गावाच्या परिसरात हळूहळू झाडे लावायला सुरुवात केली.

दहावीनंतर पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांंचे गावी येणे-जाणे कमी झाले; पण वृक्षारोपणाची सवय आणि संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून वृक्षरोपणाची ही मोहीम त्यांनी मुंबईतही जोमाने सुरू केली. कांदिवली परिसरात स्थायिक असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रथम झाडे लावायला सुरुवात केली. पदपथांच्या आजूबाजूला, मोकळ्या जागांवर दिसेल तिथे झाडे लावायला सुरुवात केली. फक्त झाडे लावणे एवढ्यावरच काम संपत नाही, तर त्या लहान रोपांची काही काळापर्यंत अगदी व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. त्याची जबाबदारी ही ग्यानमलस्वतः उचलतात. लहानगी रोपे एकदा व्यवस्थित वाढीला लागली की वर्षभरानंतर ती आपोआप स्वतःची वाढतात. परंतु, ही रोपे जगवणे, हेच ग्यानमल यांच्यासाठी मोठे जिकिरीचे काम. सुरुवातीला स्वतः हौस म्हणून काम करणार्‍या ग्यानमल यांनी पुढे स्थानिकांसोबतही काम करायला सुरुवात केली. स्थानिकांना हाताशी धरून काम केल्यामुळे त्यांना अधिक काम करता येऊ लागले आणि झाडांचीही अधिक काळजी घेतली जाऊ लागली. झाडांना ठरावीक वेळी खतपाणी देण्याचे काम सातत्याने सुरू होते. लावलेल्या झाडांपैकी सगळीच्या सगळीच झाडे जगतात, असे नाही; पण एकूण ५० टक्के झाडे जगवता येतात, हे ग्यानमल आपल्या अनुभवातून सांगतात.

साहाय्य केले नाही, तरी विरोध न करणे, हे ही माझ्या दृष्टीने त्या कार्यात केलेली मदतच आहे, असे आवर्जून सांगणार्‍या ग्यानमल यांना कुटुंबीयांकडून कधीही विरोध पत्करावा लागला नाही, असेही ते सांगतात. स्थानिक लोकांबरोबरच काही संस्थांबरोबर ही त्यांनी समन्वय साधून वृक्षारोपण केले. ग्यानमल यांचा हार्डवेअरचा आणि इलेक्ट्रिक्सचा स्वतःचा उत्तम व्यवसायही होता. परंतु, पर्यावरण आणि प्रामुख्याने वृक्षारोपणाचे काम पूर्णवेळ करता यावे, या उद्देशाने गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी तो व्यवसाय बंद केला. कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स आणि इतर परिसरात त्यांनी आजवर शेकडो झाडे लावली आहेत.

काही वर्षांपूर्वी ठरावीक क्षेत्रात लावलेली जवळ जवळ सगळी झाडे पाणी न मिळाल्यामुळे जळून गेल्याची घटनाही त्यांनी सांगितली. मात्र, ही झाडे वृद्ध झाल्यामुळे गेली, अशी स्वतःचीच समजूत काढत पुन्हा त्याच उत्साहाने त्यांनी पुन्हा तिथे झाडे लावली. जितकी झाडे लावली, त्याच्या ५० टक्के झाडे प्रत्यक्ष जगतात, असे सांगणार्‍या ग्यानमल भंडारी यांनी आजवर तब्बल ६०० हून अधिक वृक्ष लागवड केली आहे. यामुळेच त्यांना ‘ट्री-मॅन ऑफ कांदिवली’ या शब्दांमध्ये गौरविले गेले आहे. अनेक संस्थांबरोबर काम केलेले असल्यामुळे, अनेक पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. यापुढेही जिथे जागा मिळेल आणि झाडे उगवणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी मी झाडे लावणार, असे ते दृढपणे सांगतात. झाडे लावण्याचा हा त्यांचा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे. त्यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.