सिंगापूरमध्येही मंदीचे वारे

    20-Jun-2023   
Total Views |
Singapore in a Economic recession

आग्नेय आशियातील सर्वांत छोटे राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंगापूर या द्वीपराष्ट्राची अर्थव्यवस्था ही व्यापार आधारित अशी विकसित भांडवली अर्थव्यवस्था. तसेच जगातील सर्वांत खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणूनही सिंगापूर ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीयदृष्ट्या सिंगापूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले असले, तरी सध्या या देशातील आर्थिक मंदी येत्या काही महिन्यांत वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात सिंगापूरचा आर्थिक अहवाल सादर झाला. कमकुवत स्वरुपाच्या मानल्या जाणार्‍या या आर्थिक अहवालामुळे मंदीचे सावट निर्माण झाले असून तिथे नोकरीनिमित्त स्थलांतरित भारतीयांच्या नोकर्‍यांवरही त्याचा परिणाम होताना दिसू लागला आहे.

सिंगापूरच्या मानव संसाधन मंत्रालयाने सादर केलेल्या पहिला तिमाहीतील श्रम बाजार अहवालातून असे दिसते की, नोकरीच्या रिक्त जागांची संख्या १ लाख, २६ हजारांवरून ९९ हजार, ६००वर घसरली आहे. या कारणास्तव नोकर्‍यांमध्ये मोठी घट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सलग चौथ्यांदा ही घट नोंदवली गेली आहे. सिंगापूरच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या ’एंटरप्राईझ सिंगापूर’ या वैधानिक मंडळाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात सिंगापूरची गैर-तेल देशांतर्गत निर्यातीत (नॉन-ऑईल डोमेस्टीक एक्सपोर्ट) १४.७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि नॉन-इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीतही साधारण ९.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. चीन आणि अमेरिकेला निर्यात वाढली असली तरी हाँगकाँग, मलेशिया आणि तैवानच्या बाजारातील कमकुवतपणामुळे ही घट अधिक झाल्याचे म्हटले जात आहे.

सिंगापूरची लोकसंख्या ५.४५ दशलक्ष असून ’सिंगापूर सांख्यिकी विभागा’च्या आकडेवारीनुसार साधारण नऊ टक्के रहिवासी हे भारतीय आहेत. उरलेले सर्व हे येथील कायमचे रहिवासी आहेत. उत्तम नोकरी किंवा उत्तम शिक्षणासाठी अनेक भारतीय सिंगापूरमध्ये स्थलांतरित झालेले आपण पाहतो. येथील भारतीय व्यावसायिकांचे प्रमाण २००५ ते २०२० दरम्यान १३ ते २५ टक्क्यांपर्यंत दुप्पट झाले आहे. याठिकाणी बरेच भारतीय हे ‘वर्क फ्रॉम होम’ करणारेसुद्धा आहेत. सिंगापूरची अर्थव्यवस्था या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ०.४ टक्क्यांनी घसरली. व्याजदरात तीव्र वाढ होऊन जागतिक खप कमी झाला. त्यामुळे कमकुवत अशा आलेल्या आकड्यांमुळे सिंगापूरच्या निर्यात-केंद्रित अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा धोका वाढला आहे. आर्थिक मंदीचा फटका प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, माहिती आणि संप्रेषण व आर्थिक सेवादेणार्‍या काही उद्योगांना बसला आहे.

सिंगापूरमधील एकूण नोकरदार व्यक्तींची संख्या पाहिली, तर जानेवारी ते मार्च या कालावधीत ती ३३ हजारांनी वाढली आहे. ज्यात प्रामुख्याने भारतीयांसह, विविध अनिवासी व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी एकूण ३० हजार, २०० अनिवासी हे परदेशातून प्रामुख्याने बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने आले आहेत. ही आकडेवारी ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍या स्थलांतरित नोकरदारांना वगळते. सध्या सिंगापूरमधील एकूण रोजगाराने महामारीपूर्वीची पातळी ३.८ टक्क्यांनी ओलांडली आहे. दरम्यान,या परिस्थितीवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. ‘मेबँक’चे अर्थतज्ज्ञ चुआ हक बिन यांनी सिंगापूरच्या निर्यातीतील मंदी तीव्र होत चालल्याचे एका वृत्तसंथ्थेला दिलेल्या माहिती म्हटले आहे. त्याचप्रमाणे सिंगापूरच्या मानवसंसाधन मंत्रालयानेही यापूर्वी म्हटले होते की, जागतिक आर्थिक हेडविंड्समुळे सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. आणि ज्यामुळे पुढे जाणार्‍या कामगारांच्या मागणीवर विशेषत: बाह्याभिमुख क्षेत्रांसाठी रोजगाराची वाढ कमी होण्याची शक्यता आहे.

‘ओसीबीसी बँके’चे मुख्य अर्थतज्ज्ञ सेलेना लिंग यांनी बाह्य वातावरणातील बिघाडामुळे श्रमिक बाजाराचा दृष्टिकोन घटत चालल्याचे सिंगापूरच्या ‘स्ट्रेट्स टाईम्स’ला सांगितले. ब्लूमबर्ग पोलमधील अर्थशास्त्रज्ञांनी ही घट सरासरी ७.७ टक्क्यांनी होणार असल्याचे याआधी भाकीत केले होते. मात्र, ही घट त्याहीपेक्षा अधिक म्हणजेच १४.७ टक्क्यांनी झाल्याचे दिसते. मानव संसाधन मंत्रालयाचे मंत्री टॅन सी लेंग यांनी सिंगापूरमधील या परिस्थितीबाबत भाष्य केले असून विस्थापित कामगारांना चांगली नोकरी कशी प्रदान करता येईल, यावर बारीक लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी सरकारी कार्यक्रमांचा पूर्ण वापर करून घेत व्यावसायिक वातावरणाशी जुळवून घेण्याचे आवाहनही केले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक