पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा; टेस्ला सीईओ एलन मस्क यांची भेट घेणार
20-Jun-2023
Total Views |
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर असून ते टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला संस्थापक एलन मस्क यांची भेट होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. २०१५ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी एलन मस्क यांची भेट घेतली होती. तसेच, त्यांनी टेस्ला कारखान्याला भेट दिली होती. या दोघांत होणाऱ्या बैठकीत औद्योगिकदृष्टया करार होण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांना नेहमीच भारतीय बाजारपेठेने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा या उभयतांमध्ये होऊ शकते.
दरम्यान, या बैठकीचा अजेंडा अद्याप स्पष्ट झाला नसला तरीही, एलन मस्क यांनी याआधीच टेस्ला कंपनीला भारतात आणण्याचे सुतोवाच केले होते. पण त्यावेळी काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते प्रकल्प रखडले. तसेच, गेल्या वर्षी भारताने टेस्ला कंपनीच्या कारवरील आयात कर कमी करण्याच्या विनंतीस नकार दिला होता तो या भेटीत बदलण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, टेस्लाने स्थानिक पातळीवर वाहने तयार करावीत अशी भारताची इच्छा आहे परंतु कारनिर्मिती कंपनीला आयातीद्वारे बाजारपेठेतील मागणीची चाचणी घ्यायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, टेस्ला संस्थापक एलन मस्क यांनी या वर्षाच्या सुरुवातीला 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ऑटोमेकर कदाचित या वर्षाच्या अखेरीस नवीन कारखान्यासाठी जागा निवडेल. तसेच हा नवीन कारखाना उभारण्यासाठी भारत हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ते म्हणाले, "अगदी" असे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले होते. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठराव होतो याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.