यंदाचा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण पुन्हा प्रथम

    02-Jun-2023
Total Views |
State Board of Secondary and Higher Secondary Pune

पुणे
: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी निकाल शुक्रवारी (दि. 2) ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आला. त्यात राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. तर, सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा आहे. गत वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे.

दहावीची परिक्षा २ ते २५ मार्च या दरम्यान पार पडली. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागात परिक्षा पार पडल्या. परीक्षेत १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ५ हजार ३३ केंद्रावर दहावीची परिक्षा झाली.

राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होते. या परिक्षेत १५१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १ लाख ९ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.