मेक्सिकोचे हरवलेले लोक

    02-Jun-2023   
Total Views |
Mexico Jardins Vallarta La Estancia

गेल्याच आठवड्यात सात युवक बेपत्ता झाले. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्या युवकांचे काय झाले? जीवंत आहेत की मृत्यू पावलेत, की त्यांच्यासोबत आणखी काही घडले आहे का? असा प्रश्न या युवकांच्या कुटुंबाना सतावत होता. मात्र, पोलिसांनी शोध सुरू केल्यावर त्याचे धागेदोरे सापडले आणि सगळेच हादरले. पोलीस पथकाला एका खड्ड्यात बॅग मिळाल्या आणि त्यामध्ये मानवी अवशेष सापडले. ही घटना आहे मेक्सिकोची. मेक्सिकोच्या ग्वाडलाजाराच्या जार्डिन्स वालार्टा आणि ला एस्टैंसिया इथून सात युवक बेपत्ता झाले होते. त्यांचा काहीच शोध लागला नाही. मात्र, आता मानवी अवशेषांनी भरलेल्या या बॅग्स मिळाल्यानंतर सगळ्यांची खात्रीच पटली की, या युवकांसोबत काहीतरी भयानकच घडले आहे.

मेक्सिकोमध्ये अपहरण, हरवणे आणि कुठेतरी सांगाड्याच्या स्वरूपात मिळणे किंवा पाताळाने गिळले की आकाशाने गिळले, अशा पद्धतीने अख्खा माणूसच गायब होणे ही गोष्ट सामान्य आहे. गेल्या काही वर्षांत मेक्सिकोतून एक लाख, दहा हजारांच्यावर लोक हरवले आहेत आणि त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. इतकेच काय, मेक्सिकोची अधिकृत शवागरही अज्ञात प्रेतांच्या खचांनी भरलेली असतात, पण त्यांना कुणी वाली नसतो. हरवलेल्यांमध्ये २० टक्के लोक हे १८ वर्षांखालील आहेत, तर जवळजवळ एक चतुर्थांश महिला आहेत. मेक्सिकोमध्ये हरवलेल्या किंवा अपहरण केलेल्या नागरिकांचा प्रश्न मोठा बिकट आहे. पोलीस तर पोलीस यंत्रणा, अगदी नागरिकही आपल्या हरवलेल्या पाल्यांचा शोध घेण्यात वर्षोनुवर्षे व्यस्त आहेत.

मेक्सिकोमध्ये २०२० साली ९७७ महिला बेपत्ता आहेत, अशी नोंद आहे, तर २०२१ साली हीच संख्या १,०१५ झाली, तर पुढे २०२२च्या सुरुवातीला १ हजार, ६०० महिला हरवल्या आहेत, अशी नोंद झाली. पण ही नोंद शासन दरबारातील अधिकृत नोंद होती. आठ महिन्यांपूर्वी मेक्सिको सिटीमध्ये गोळीबार झाला. यामध्ये शहराचे महापौर मेंडोजायांच्या सहित १८ लोक मृत्युमुखी पडली. ड्रग्ज माफियांनी तो हल्ला केला होता का? तर शहरात ड्रग्जसंदर्भात कायदा-कानून लावण्यात कुणीही सत्ताधार्‍याने धजावू नये म्हणून! जिथे शहराच्या महापौराचा खून करण्यास ड्रग्जमाफिया कचरत नाहीत, तिथे सामान्य माणसाचे काय? १३ कोटी लोकसंख्या असलेला मेक्सिको गेल्या ४० वर्षांपासून ड्रग्जमाफियांच्या जाळ्यात अडकला आहे. अफीम, हेरोईन आणि मारिजुआनाच्या तस्करसाठी मेक्सिकोचे ड्रग्जमाफिया समांतर सरकार चालवतात, असे म्हटले तरी खोटे ठरणार नाही.

जाणकारांच्या मते, मेक्सिकोचे १५०च्या वर ड्रग्जसंबंधित संघटना वर्षाला अडीच लाख कोटींचे अमली पदार्थ अमेरिकेमध्ये तस्करीच्या माध्यमातून अणतात. या संघटित माफियांची स्वतंत्र सैनिकी सदृश्य व्यवस्थाही आहे. मेक्सिकोमध्ये ड्रग्जमाफियांची सर्वांत मोठी संघटना आहे ‘सिनालोआ कार्टेल.’ या कार्टेलकडे ६००पेक्षा जास्त विमानं आणि हेलिकॉप्टर आहेत. मेक्सिकोची सगळ्यात मोठी ‘एअरलाईन्स’ आहे. ‘एअरो मेक्सिको.’ या ‘एअरो मेक्सिको’पेक्षा पाचपट अधिक विमान या ‘सिनालोआ कार्टेल’कडे आहेत. यावरूनच मेक्सिकोमध्ये सरकारपेक्षाही या ड्रग्जमाफियांची ताकद किती मोठी आहे, हे समजते. त्यामुळेच चटकन पैसा मिळवण्यासाठी मेक्सिकोतील युवक या ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात फसतात.

असो. या ड्रग्ज प्रकरणांचा आणि हरवलेल्यांचा संबंध काय? तर अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी किंवा अमली पदार्थांची निर्मिती करण्यासाठी या ड्रग्ज संघटनांना मोठ्या प्रमाणात मानवी बळ आवश्यक असते. ते काही सहजासहजी मिळत नाही. मग लोकांचे अपहरण केले जाते. त्यांनी गुलामासारखे काम करावे म्हणून. या गुलामांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या तर झाल्या. मात्र, २४ तास केवळ नशेच्या विळख्यात राहून काम करावेच लागते. त्यामुळे हे निष्पाप लोक मृत्युमुखी पडतात. अशा मृत पावलेल्या लोकांच्या मृतदेहाचे करायचे काय? तर मोठमोठ्या रसायनांमध्ये त्यांचा मृतदेह विरघळण्याच्या कामालाही अपहरण केलेल्या लोकांना नेमले जाते. किती भयानक! पण, हे सगळे घडते आहे मेक्सिकोमध्ये. अशाप्रकारे हरवलेल्या आणि मृत्यू पावलेल्या लोकांची काय चूक? जगाच्या पाठीवर असेही भयंकर!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.