ज्यांनी आपल्या देवीदेवतांना शिव्या दिल्या त्यांना उबाठा गटात चेहरा म्हणून वापरलं जातंयं!
पक्ष सोडताच मनीषा कायंदेंचा हल्लाबोल!
19-Jun-2023
Total Views | 430
मुंबई : आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. ज्यांनी आपल्या देवीदेवतांना शिव्या दिल्या त्यांना उबाठा गटात चेहरा म्हणून वापरलं जातंयं, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
मनिषा कायंदे म्हणाल्या, "आमची ठाकरे गटात घुसमट होत होती. आमच्या देवी देवतांना ज्यांनी शिव्या घातल्या, त्यांची खिल्ली उडवली, ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? हा प्रश्न मला सतावत होता. काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्हतं. मी वयाच्या २५ व्या वर्षीपासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले तरी विचारांनी शिवसैनिक आहे. नुसतंच सकाळी उठून आपण एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, त्यापेक्षा सकारात्मक काम करायची माझी इच्छा होती."
"संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. पक्षाने मला मान-सन्मान दिली. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची भूमिका, विचारधारा भरकटत आहे. मला औरंगाबादमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एका ज्युनियरला डोक्यावर बसवलं. आम्हाला नव्या लोकांबद्दल हेवा नाही. जळण्याचा काहीच विषय नाही. आम्ही देखील पक्षात काम केलं आहे. मी सुषमा अंधारे यांच्यासोबत देखील यात्रेत सहभागी झाले होते. पण, त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या, ती गोष्ट पक्षासाठी चांगली नाही. देवी-देवतांबद्दल त्यांनी काय विधान केली आहेत, त्या गोष्टी किती संभाळून घ्यायच्या. पक्षाचा डीएनए बदलायला लागला आहे. एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा काम करण्याचा स्वभाव आहे. मलाही जनतेचं काम करायचं आहे. ते करता यावं यासाठी योग्य व्यासपीठ हवं होतं, ते आता मिळालं आहे." असा खुलासा कायंदे यांनी केला.