नवी दिल्ली : भारताच्या प्राचीन संस्कृती आणि ग्रंथांसाठी गीता प्रेसचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे गीता प्रेसला २०२१ सालचा गांधी शांती पुरस्कार प्रदान करणे हा त्यांच्या भागिरथ कार्याचा सन्मान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे.
अहिंसात्मक आणि इतर गांधीवादी पद्धतींच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनामध्ये दिलेल्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी गोरखपूरच्या गीता प्रेसला २०२१ या वर्षासाठी या पुरस्काराचा मानकरी म्हणून निवडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने प्रदीर्घ विचारमंथनानंतर १८ जून २०२३ रोजी एकमताने निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विट करून गीताप्रेसचे अभिनंदन केले. ते म्हणाले, भारताची वैभवशाली प्राचीन सनातन संस्कृती आणि आधारभूत ग्रंथ आज सहज वाचता आले तर गीता प्रेसचे यात अतुलनीय योगदान आहे. १०० वर्षांहून अधिक काळ गीता प्रेस रामचरित मानस ते श्रीमद भगवद्गीता यांसारखे अनेक पवित्र ग्रंथ नि:स्वार्थपणे जनसामान्यांपर्यंत नेण्याचे अद्भुत कार्य करत आहे. गीता प्रेसला २०२१ चा गांधी शांती पुरस्कार मिळणे हा त्यांच्या या भगीरथ कार्यांचा सन्मान आहे, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसने मात्र या निर्णयावरून नेहेमीप्रमाणे टिकेचा सूर आळवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार २०२१ देणे म्हणजे 'सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कृत' करण्यासारखे आहे. जयराम रमेश यांनी यावेळी अक्षय मुकुल लिखित 'गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया'चे मुखपृष्ठही शेअर केले आणि हे पुस्तक खूप चांगले चरित्र असल्याचे मत मांडले. ते म्हणाले की लेखकाने संघटनेचे महात्मा यांच्याशी असलेले नाते आणि राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंडांवर त्यांच्याशी सुरू असलेला वाद उघड केल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १९२३ मध्ये स्थापना झालेली गीता प्रेस ही जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थांपैकी एक असून या संस्थेने श्रीमद भग्वदगीतेच्या १६.२१ कोटी प्रतींसह १४ भाषांमधील ४१.७ कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. उत्पन्न प्राप्तीसाठी या संस्थेने आपल्या प्रकाशनांमध्ये कधीही आपली जाहिरात केली नाही. गीता प्रेस आपल्या संलग्न संस्थांसह सर्वांचे कल्याण आणि चांगले जीवन यांसाठी प्रयत्नशील असते.
गीताप्रेसच्या सेवेचा गौरव – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता प्रेसने शांतता आणि सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा प्रसार करण्यामध्ये दिलेल्या योगदानाचे स्मरण केले आहे. स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना गांधी शांतता पुरस्कार मिळणे हा गीता प्रेस या संस्थेचा गौरव आहे. ज्या संस्थेने खऱ्या अर्थाने गांधीवादी जीवनाचे आचरण केले आहे, अशा गीता प्रेसने मानवतेच्या सामूहिक उत्थानामध्ये दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि असामान्य योगदानाचा गांधी शांतता पुरस्कार २०२१ मुळे गौरव झाला आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे.
पुरस्कार स्वीकारणार, रक्कम नव्हे – गीता प्रेस
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्कारासाठी आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या देणग्या स्वीकारण्यास नकार दिला आहे कारण ते आमचे तत्त्व आहे. सन्मानासाठी आम्ही हा पुरस्कार नक्कीच स्वीकारू, असे गीता प्रेसचे व्यवस्थापक डॉ लालमणी तिवारी यांनी म्हटले आहे.