बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!

    17-Jun-2023   
Total Views |
ashadhi ekadashi 2023


आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनाची साक्ष सांगणारी वारी... वारीचे आजचे वास्तव काय, तर वारी आणि वारकरी आजही तितकेच निर्मळ आणि सश्रद्ध मनाने वारीला जातात. विठूरायाबद्दल त्यांचे प्रेम आणि स्नेह शब्दातीत, वादातीत आहेच. पण, यावर्षी वारीमध्ये काही घटना घडल्या,काही लोक दिसले आणि त्याबद्दल लिहिले नाही, तर मग ’आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ हे संत तुकारामांचे वचन सार्थ होणार नाही. त्यामुळेच वारीमध्ये घुसलेल्या असामाजिक तत्वांचा आढावा घेणारा हा लेख...


अजि म्या देखिली पंढरी। 
नाचताती वारकरी।
भार पताकांचे करी।
भीमातीरी आनंद॥

 
सध्या आषाढी पंढरपूर वारी आहे. वारकरी, धारकरी आणि सगळा समाज वारीच्या जयघोषात अगदी तल्लीन झाला आहे. ‘ग्यानबा माऊली तुकाराम’ या सामूदायिक स्वराने अवघा महाराष्ट्र पावन झाला. विठ्ठल हरीनामाच्या गजराने जातपात, वर्ग, वर्ण सगळे भेद विसरून अवघा समाज पंढरपूरच्या कानड्या विठोबाच्या भक्तिभावात तल्लीन झाला आहे. रामकृष्ण हरी! पण, ऋषीमुनी यज्ञ करायचे, पूजापाठ करायचे आणि राक्षस मायावी रूप धारण करून त्यांच्या यज्ञ, पूजापाठामध्ये खंड पाडायला यायचे, अशा धार्मिक कथा आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या. आता काही सत्ययुग नाही आणि त्रेतायुगही नाही. कलियुग आहे म्हणे. पण, या कलियुगातही अगदी रामायण-महाभारतातले मायावी राक्षस आठवावे, असे काहीसे घडत आहे. असे कुटील मायावी सध्या वारीत घुसले आहेत. वारकरी आमचा साधा भोळा, गळ्यात तुळशीमाळ कपाळावर गोपीचंदन. भजनात तल्लीन. राग, लोभ, द्वेष सगळे सोडून विठोबाच्या दर्शनासाठी आतूर असताना त्यांना कुणीतरी एक येतो आणि सांगतो
 
अल्ला देवे अल्ला दिलावे
अल्ला दारू अल्ला खिलावे
अल्ला बिगर नही काये
अल्ला करे सोहि होय


असे म्हणत तो आजुबाजूवाल्या सगळ्या वारकर्‍यांना सांगतो, नव्हे आदेश देतो म्हणा, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे’ आणि ते वारकरी त्यात स्त्रियाही आहेतच. सगळेजण विठ्ठल रखुमाईच्या तालात म्हणतातही ’अल्ला देवे अल्ला दिलावे.’ अर्थात, त्या अल्लाच्या भक्ताने देवाच्या भक्तांना अल्लाच्या नावाने तल्लीन व्हायचे आदेश दिले आणि भोळ्याभाबड्या वारकर्‍यांनी तसे केलेही, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण, वारकर्‍यांच्या मते सगळ्यामध्ये विठुराया आहे. तसेच वारकर्‍यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण, या वारीत येणारे लाखो वारकरी ते पंढरीच्या सावळ्या विठोबाचे भक्त असले, तरीसुद्धा या भाविकांचे कुलदैवत वेगवेगळे असते. पण, वारीत कुणीही त्यांच्या कुलदैवताचे नाव घेऊन गजर करत नाही. वारीत कुणीही विठोबा व्यतिरिक्त किंवा संत- महात्म्याव्यतिरिक्त कुणाचा गजर केलेला आठवत नाही. मग हे ’अल्ला खिलावे का’? अर्थात, संत तुकोबारायांचा अभंग आहे हा. हा माणूस ज्या पद्धतीने वारकर्‍यांना ‘अल्ला खिलावे’ वगैरे म्हणायला लावतो, त्याचा अविर्भाव आणि सांगणे यातून एकच भाव ध्वनीत होतो की, तो वारकर्‍यांच्या मुखातून विठूचे नाव वगळून त्याला अपेक्षित असलेले वदवत होता.

संत तुकोबाही म्हणून गेलेत पहा की, ’अल्ला देवे अल्ला खिलावे.’ अल्लाच सगळे करतो, असे त्याला त्या वारकर्‍यांच्या मनात ठसवायचे होते जणू. पण, हे खरे का? संत तुकोबांचे म्हणणे हेच होते का, तर अजिबात नाही. तुकोबांनी त्यांच्या या अभंगात नशिबावर विसंबणार्‍यावर प्रहार केला. ते म्हणाले होते, अल्ला खायला देतो, प्यायला देतो वगैरे म्हणून काही होत नाही, तर कर्म केल्याशिवाय कुणाचाही उद्धार होत नाही. तुकोबाराया यांनीही अल्लावर विसंबण्यापेक्षा स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवा, असे म्हटले आहे. असे त्या गोपीचंदन टिळा न लावलेल्या आणि गळ्यात तुळशीमाळा न घातलेल्या व्यक्तीने सांगितले नाही. संत तुकोबांच्या नावाने काही समाजविघातक लोक काय काय अफवा पसरवतील म्हणा नेम नाही. तुकोबांचा खून झाला ते संत तुकोबा निधर्मी होते, विद्रोही होते आणि आता तर संत तुकोबा हे ‘अल्लाचे भक्त’ होेते, हे सांगण्याचा प्रयत्न! हे का? तर संत तुकोबारायांवर महाराष्ट्राच्या तमाम विठूप्रेमी जनतेचे प्रेम निर्विवाद आहे. या संत तुकारामांनाच जर हिंदू आणि हिंदू श्रद्धाविरोधी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर आज नाही, उद्या नाही, पुढच्या 20-30 वर्षांत हेच समाजविघातक लोक संत तुकाराम हे विठ्ठलाचे भक्त नव्हते, नव्हे ते हिंदू नव्हतेच, ते तर एक विद्रोही आणि देवधर्माला शिव्या देऊन अल्लाच्या चरणी विसावलेला नेक बंदा होता, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.

कुणी याला अतिशयोक्ती म्हणेल. पण, ती घोषणा विसरू नका- ‘लढ के लिया पाकिस्तान हस के लेंगे हिंदुस्थान’. ज्याप्रमाणे तैमूर, खिलजी, औरंगजेब, टिपू आणि तमाम मुस्लीम आक्रमणकर्ते आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी पूर्वी तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतरण केले, मतांतरण केले, पुढे प्रचंड हिंसा करत पाकिस्तान वेगळा झाला. मात्र, सध्या 80 टक्के हिंदू असलेल्या देशामध्ये अयोध्या राममंदिर आणि काशिविश्वेश्वर मंदिराचे महत्त्व जपणारा हिंदू धर्मनिष्ठ पंतप्रधान आणि त्याच विचाराची सत्ता असताना रक्तपात करून धर्मांतरण करणे सोपे नाही. या पार्श्वभूमीवर प्रेम आणि आपुलकी दाखवणेच सोपे जाणार आहे. आता हिंदुस्थान त्यांना हसून घ्यायचा आहे. त्यामुळेच प्रेमाचे खोटे जाळे टाकून हिंदूंच्या मुलींसोबत ‘लव्ह जिहाद’ केला जातो आणि ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून हिंदूंच्या मुलांना धर्मांतरित केले जाते. ’लव्ह जिहाद’ आणि ’ऑनलाईन गेम धर्मांतर’ या दोन्ही गोष्टीत वर वर कुठेही हिंसा दिसते का? मात्र, धर्मांतराचा, मतांतराचा परिणाम आहेच. या अनुषंगाने हिंदूंची मंदिरे तोडणेही सोपे नाही. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये घुसून आम्हीही मंदिरात पूजा करतो, आमचीही श्रद्धा आहे, भक्ती आहे, हे म्हणणे सोपे आहे. याच न्यायाने वारीला जाण्यापासून श्रद्धाळूंना रोखू शकलो नाही, तरी वारीत घुसून संधी मिळताच वारीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून वारी विठूसाठी नाही, तर ‘अल्ला खिलावे, अल्ला दिलावे’ अशी श्रद्धा असणार्‍यांची आहे, हे सिद्ध करण्यासाठी काही लोक प्रयत्नशीलही असू शकतात. याबद्दल विचार करायलाच हवा.

या पार्श्वभूमीवर प्रश्न हा आहे की, अल्लाचे गुणगाण गाणार्‍या त्याला विठूरायाच्या नावाने चालणार्‍या या भक्तीदिंडीत, श्रद्धावारीत का यावेसे वाटले? त्याचे प्रयोजन काय असेल? आणि आपला हिंदू समाज किती काळ असा आत्मग्लानीत आणि भोळाभाबडा आहे, भोळाभाबडा आहे, म्हणत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार? होय, आम्ही सहिष्णू आहोत. होय, आमचा धर्म आम्हाला सर्वांचा आदर करायलाच शिकवतो. पण, जगभरात ज्या वारीची पवित्रता आणि ऐतिहासिकता वादातीत आहे, त्या वारीत विठूच्या नावाचा गजर करणार्‍यांच्या मुखातून लबाडीने विठूचे नाव डावलून टाकायला लावणे, हे एक षड्यंत्रच वाटते.असो. आषाढीवारी आहे आणि संतमाऊली ज्ञानेश्वरांचे नाव मुखी यायलाच हवे. पसायदानाद्वारे अवघ्या विश्वाची मंगल कामना करणारे संत माऊली ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर सांगतात की-

काम क्रोध लोभ मोह दंभ मद।
केला याचा छेद ज्ञानशस्त्रे॥
विवेक वैराग्य बोध क्षमा शांति। राखिली संपत्ति दैविकीजे


मदमत्सराचा त्याग करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणार्‍या या संतमाऊलीबद्दल काय म्हणावे? शब्दच नाहीत. पण, ज्यांच्या तोंडाला नेहमी कुत्रा बांधलेला असतो, की काय अशी शंका यावी, ज्यांच्या मनात आणि डोक्यात जगभरच्या कुबुद्धी, कुविचारांचा अंधार भरलेला आहे, अशी काही लोकही ज्ञानोबांबद्दल काहीबाही बोलताना आढळली होती. ज्ञानदेवांनी भिंत चालवली ते रेड्याच्या मुखातून वेद वदवला, यावर आपल्या कुवतीप्रमाणे अक्कल पाजळणार्‍या सुषमा अंधारेला महाराष्ट्राची वारकरी जनता कधी, तरी माफ करेल का महाराजा? पण, या अशा प्रवृत्ती राजकारणासाठी का होईना, वारकर्‍यांसाठी वारीत पोळ्या लाटायला आल्या. अर्थात, पोळी लाटताना मनात काय भाव असतील ते त्यांची ती कीव आणणारी बुद्धीच जाणो. तसेच चतुर्थीच्या दिवशी मांसाहार करून मंदिरात जाणार्‍या (असे लोक म्हणतात) आणि हिंदूच्या मुलीबाळी जिहादलास क्रूरपणे बळी पडत असताना ‘लव्ह’ माहिती आहे, म्हणत ‘जिहाद’ वगैरे नसतो, असे ठसवणार्‍या सुप्रिया सुळेही वारीत येतात म्हणे. अर्थात, वारीत कुणीही येऊ शकते, अगदी संविधान, समता दिंडीमध्ये काफीर कोण, हे सांगणारा पैगंबर शेखसुद्धा. सश्रद्ध हिंदूंच्या वारीमध्ये शेखला कोणी विचारले होते, काफीर कोण म्हणून? तर हिंदू धर्मावर अखंड तिरस्कृत बोलणारे आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असणारे सचिन माळी आणि शीतल साठे हे ‘कबीर कलामंच’वाले संविधान दिंडीच्या माध्यमातून वारीत घुसले यात नवल नाही.

भक्तिरसात श्रद्धेत मग्न असलेल्या वारीत घुसण्याची त्यांची आग्रही वृत्ती का आहे? हिंदू समाज भोळा आहे. वारकरी भोळे आहेत, पण म्हणून वारीत घुसू पाहणारे हे लोक भोळे आहेत का? देवधर्म नाही नव्हे, हा देश आणि या देशाचे प्रशासन संस्कृती आपली नाही, सांगणारे हे लोक यांना महाराष्ट्राच्या समाज आणि धर्मशक्तीच्या केंद्राचे अर्थात वारीचे महत्त्व एकाएकी का वाटले असेल? तर ते तसे नाही. वारीच्या अनुषंगाने वेगळीच दिंडी काढून तिथे भोळ्याभाबड्या वारकर्‍यांमध्ये समाजविघातक, धर्मविघातक विचार पेरण्याचा कुटील डाव आहे.सध्या ज्ञानेश्वर वाबळे नावाचा असाच एकजण. संविधान दिंडी वगैरे काय झाली पुण्यामध्ये. त्यावेळी या वाबळेने काय कीर्तन करावे? तर झानेश्वर हे कसे विद्रोही होते आणि ते कसे देव मानत नव्हते, हे सांगण्यावर या वाबळेचा भर होता. (त्याने ज्ञानेश्वरांचे ‘ओम नमोजी आद्या’ किंवा ‘देवाचिये द्वारी’ ऐकलेले नसावेत बहुतेक) ज्ञानेश्वर कसे विद्रोही हे सांगताना वाबळेची देहबोली पाहिली, तर कोणत्याही सज्जन व्यक्तीला संताप आल्याशिवाय राहत नाही. असो. तर या वाबळेने दिंडीच्या नावाने ब्राह्मण, क्षत्रीय, मांग, महार, कुंभार वगैरे जातीची नावे घेतली.

जो वारकरी जातीचा, पंथाचा विचार करत नाही, नव्हे समरसता-समतेच्या धर्मामुळेच वारीचे वैशिष्ट्य अबाधित आहे, त्या वारीच्या नावे दिंडी काढून जातपातीच्या उखाळ्यापाखाळ्या काढणार्‍या या व्यक्तीला काय म्हणावे? वर आपण मोठे कीर्तनकार असल्याच्या नादात त्याने उपस्थित आयाबायांना विचारले, “तुम्ही मराठवाड्यातल्या ना? तुम्ही आतापर्यंत कीर्तनात एकच ऐकलं असेल, रामाची सीता रावणाने पळवली. तसेच ब्रह्मदेवाला चार-चार तोंडं होती. मग तो एका कुशीवर कसा झोपत असेल?” तर असे प्रश्न विचारत हा वाबळे समोर असलेल्यांशी संवाद साधत म्हणतो की, ”पूर्वी सती जायच्या नवरा मेला की... त्याच्या बायकांना जाळलं जायचं.” अर्थात, संत ज्ञानेश्वर असोत की संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनार्दन, संत चोखामेळा, संत जनाबाई सगळ्यांनीच समाजातील कुप्रथांवर प्रहार केले आहेत. पण, वाबळे काही संत आहे का? बरं, त्याने ज्या प्रथा संविधान दिंडीत सांगितल्या, त्या तर कालबाह्य आहेत. मग नसलेल्या रूढींबद्दल हा वाबळे का बरं बोलत असेल? मागोवा घेताना जाणवते की, एकंदर वाबळेच्या बोलण्यात कशाला कशाचा संदर्भ आणि पत्ता नसला तरी अंतरंग एकच होते, ते म्हणजे हिंदू धर्म, हिंदू श्रद्धा यांचा ठासून भरलेला द्वेष आणि कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून दिंडीच्याद्वारे हा द्वेष जनसामान्य भोळ्याभाबड्या जनतेच्या मनात भरवायचा. स्त्रीशक्ती राष्ट्रशक्ती असते. ती कुटुंबाचा आत्मा असते. त्यामुळे स्त्रियांच्या मनातच धर्म, देव आणि देशाबद्दल तिरस्कार उत्पन्न करायचा. भयंकर!

तुका म्हणे एशा नरा
मोजुनी माराव्या पैजारा
 
बरं, हा वाबळे भजन-कीर्तनाचा आव आणत काहीबाही म्हणत असताना समोरचे बसलेले लोक कोण होते? हिंदू धर्माविरोधात काहीही विधान याने केले की, समोर बसलेले लोक ‘वॉव, वाहवा ओहो’ असे चिक्तारत होते. व्हा रे संविधान दिंडी, तर असे सगळे हे लोक आषाढवारीच्या निमित्त भोळ्याभाबड्या वारकर्‍यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मोठे वारकरी असा अविर्भाव आणून अभंग-कीर्तनाच्या नावाने काहीही विकृत विचार पेरण्याचा काही समाजविघातक घटक प्रयत्न करीत आहेत. अशांना संत तुकारामांचे एक वचन कायम लक्षात असायला हवे-
 
शुद्धबुद्धि होय दोघां एक मान।
चोरासवें कोण जिवें राखे॥
आपुलें देऊनी आपुलाचि घात।
शन करावा थीत जाणोनियां॥


म्हणजेच सद्बुद्धी असलेल्या माणसाची साथ असली की मानसन्मान प्राप्त होतो. पण, चोराची सोबत केली, तर सजा मिळते. आपल्याकडे असलेले सर्वस्व देऊन आपलेच अहित करुन घेऊ नये, आपले हित ओळखावे. तर यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने चंद्रभागेतरी विठूरायाच्या दर्शनासाठी, श्रद्धाशील असणारे तुम्ही-आम्ही सर्वच. एकच लक्षात ठेवूया, देवधर्म टिकला, तर आपला समाज आणि आपला देश टिकेल. त्यामुळे वारीत घुसून अधर्म-कुविचार माजवणार्‍यांच्या कटकारस्थानांना बळी न पडता आपण सजग राहू. ’नाचू कीर्तनाचे रंगी, तो हा विठ्ठल बरवा’ आहेच. मात्र, जो धर्माच्या आणि समाजाच्या विरोधात षड्यंत्र करेल त्यांच्यासाठी-
 
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाच्या माथी हाणू काठी..


बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.