मनोरंजनातून समाजप्रबोधन गरजेचे : संदीप पाठक

    17-Jun-2023   
Total Views |
Comedy Actor Sandeep Pathak interview


‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी दि. २३ जून रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. अभिनेता संदीप पाठक या चित्रपटात आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसेल. तसं ‘संदीप पाठक आणि वारी’ हे कित्येक वर्षांपासूनचं दृढ नातं. तेव्हा, या चित्रपटाविषयी आणि वारीच्या अनुभवांविषयी संदीप पाठक यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचित...

तुमच्या आठवणीतली पहिली वारी केव्हा केली? त्यावेळचा अनुभव कसा होता?


माझा मुळात जन्म बीड जिल्ह्यातील माजलगावचा. लहानपणापासूनच मी पाहायचो की, आमच्या घराजवळच्या, गल्लीतले शेजारी आणि नातेवाईकसुद्धा वारीला जाऊन यायचे. त्यामुळे कळायला लागायच्या आधीपासूनच तशी वारी माहिती होती. वारकरी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय काय आहे, कसा आहे, ग्रामीण भागात हे वातावरण नाही म्हंटले, तरी जास्त आहे. आणि शेवटी घरातल्या वातावरणाचा प्रभाव पडतोच ना आपल्यावर? माझ्या वडिलांनी नाही, पण आजी-आजोबांनी वारी केली होती. आजोबा भिक्षुकी करायचे, पूजापाठ करायचे, कीर्तन-भजन या सगळ्या रसमयी वातावरणात माझं संपूर्ण बालपण गेलं. मी वारीला गेलो नव्हतो, तरी घरची देण होती. त्यामुळे चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पहिली वारी मला करायला मिळाली आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला. तुम्हाला आता मी सांगितले, तर आश्चर्य वाटेल पण प्रत्येक गाव वारीत सहभागी झालेले असते. म्हणजे अगदी समजा, आज सासवडला पालखी आहे, तर गावातील प्रत्येक गावकरी वारकर्‍यांची सेवा करतो.


कोणीही वारकरी कधीच उपाशी झोपत नाही. एकमेकांना खाऊ घातले जाते. शेवटी वारकरीच म्हणतात की, नको माऊली, आताच खाणे झाले. वारकरी सगळ्यांच्या घरात राहायला सुद्धा जातात. गावातील प्रत्येक कुटुंब काही ना काही माणसांची जबाबदारी घेते. मग ते अन्नपाण्याची असो, पांघरुणाची असो किंवा अंघोळीची. त्यांची सेवा करणे, त्यांचे पाय चेपून देणे इथपर्यंत सर्वच बाबतील या गावकर्‍यांचा सहभाग असतो. हे गावकरी वारकर्‍यांची वाट पाहतात. जवळपास आठ ते दहा लोक वारीत असतात. हा माझा पहिला अनुभव... किती ते मोठं रूप पांडुरंगाचं, केवढा मोठा जनसमुदाय, किती भव्यता! हा जगासाठी उपयुक्त असा संदेश आहे. ही लोकं प्रेमापोटी, भेटीच्या ओढीसाठी अखंड २०-२१ दिवस चालतायेत. बरं त्यांचं पांडुरंगाच्या चरणी काही मागणेसुद्धा नाही. केवळ निरपेक्ष भाव. पहिल्यावेळी गेलो होतो तेव्हा वारी पूर्ण केली होती मी. संपूर्ण चाललो नाही. मला शुटिंग करावं लागायचं. त्यामुळे मध्ये मध्ये चालत, मध्ये मध्ये कॅमेरा घेत, अशी ती वारी झाली.
 
तुम्ही आजही अगदी दरवर्षी भक्तिभावाने वारीत सहभागी होतात. वारकर्‍यांच्या सहवासात पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात तुम्हाला नेमकं काय भावतं? प्रत्येकवर्षी पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो, असं काय आहे या वारीत, जे ओढ लावते? या आनंदसोहळ्याचे गमक काय?


बापरे! मी पहिल्यावेळी वारी केली होती, तेव्हाच हा महाराष्ट्र भावला होता मला. सांस्कृतिकदृष्ट्या पाहायचा झाला, तर किती समृद्ध आहे, हा देश. किती समृद्ध आहे आपला महाराष्ट्र. या वारकर्‍यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्या भावाने मी भारावून गेलो. वारीची शेकडो वर्षांची परंपरा वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे. या गोष्टीचा मला अतिशय अभिमान वाटला. कारण, गेले ४० वर्षं आपण पाहतोय, जात आणि पंथाचे राजकारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होते. पण, वारकरी मात्र अगदी वेगळा आहे. आज जातीय तेढ जी दिसून येते, त्यातच आपली अर्धी शक्ती हरवून जाते. वारकरी या सर्वांच्या पार गेला आहे. गरीब-श्रीमंत हे भेदसुद्धा पुसून जातात, वारीचं वातावरणच इतकं उल्हासी असतं. जगाकडे पाहण्याचा माझा चष्माच बदलून गेला. इथे सगळे पांडुरंगाच्या एका छत्रीखाली येतात. एक होतं हे अद्वैताचे रूप. केवळ विठ्ठल, विठ्ठल प्रेम असे, म्हणत एकटेच आणि मानवतेचा संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय. वारी केल्यावर हे जाणवलं, म्हणून पुन्हा पुन्हा इथे येत राहिलो.


एक गोष्ट लक्षात आली, कसं व्यवस्थापन असतं, इतकी माणसे एकत्र जातात, त्यांचे व्यवस्थापन कसे असावे, कसे करावे, हे मोठमोठ्या कंपन्यांनी वारकर्‍यांकडून शिकून घ्यावं. समजा, एखादी ४५० लोकांची दिंडी आहे, तर ती दिंडी ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याच्या आत त्यांचा दिंडीप्रमुख ट्रक घेऊन तिथवर जातो, त्या सर्वांचा स्वयंपाक तिथे जाईपर्यंत तयार असतो. राहण्याची व्यवस्था तयार असते. राहुट्या उभ्या झालेल्या असतात. ही माझी आजची चौथी वारी. वारीतच आहोत आम्ही. चित्रीकरण करण्यासाठी वारी सुरू झाली आणि आता जातो त्यानिमित्ताने व्हिडिओ करतो, तर डॉक्युमेंटेशन, पुढल्या पिढीला वारी कळावी, दिसावी, त्यात काय होतं समजावं यासाठी. काही भागातून लोकं वारीसाठी जात नाही, त्यावेळी त्यांच्यापर्यंत वारी पोहोचावी, म्हणून हा सर्व अट्टाहास! लोक विठ्ठलाकडे निरपेक्ष भावनेने पाहतात. त्यानेच आपल्याला जन्म दिला. आपल्याला जे देतो तो तोच, आपल्याकडून घेतो, तोही तोच. आपण केवळ चालत राहायचं. आयुष्याच्या प्रवासात चालत राहण्याची प्रेरणा यातून मिळते.

‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटाविषयी काय सांगाल?
 
‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट मला मिळाला, त्याचे कारणसुद्धा वारी! मी वारी करायचो इथे सर्वांना माहिती होतं. माझे कित्येक फोटो इन्स्टाग्रामवर होते. माझे एक मित्र आहेत, विजय शिंदे. त्यांनी एक फोटो पाहिला आणि सांगितले, ‘हाच चेहरा आहे.’ विठ्ठल म्हणून हा चेहरा उत्तम आहे. हा चित्रपट करण्यामागे वारीचा मोठा हातभार आहे, वारीमुळेच मला हा चित्रपट मिळाला. काही भूमिका तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवरून मिळतात, तर काही भूमिकांच्या वेळी तुमचं काहीतरी पुण्य कर्म असावं लागतं. या चित्रपटात असं दाखवलंय की, विठ्ठल नावाचा एक माणूस अशा घरात येतो, जिथे सगळीच घडी विस्कटलेली आहे. विठ्ठल ती घडी व्यवस्थित करतो, तिथली परिस्थिती तो सुधारतो. वाममार्गाला लागलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणतो आणि आल्यापावली निघून जातो. चित्रपटात एक गीत आहे, ‘माझा सावळा सावळा सावळा विठुराया.’ या गाण्यातले जे भाव आहेत, जी आर्तता आहे, ती मला वेड लावते. या गीतावर ‘परफॉर्म’ करताना एक समाधान लाभलं. म्हणजे एक कलाकार म्हणून जी भूक असते, ती भूक हे साकारताना शमली. तसे एक हेच गाणे नाही सर्वच गीते सुंदर आहेत.
 
लोकांनी हा चित्रपट का पाहावा?

मराठी प्रेक्षकांना नेहमीच आपल्या मातीतलं आवडतं. त्यांच्याशी निगडित, त्यांच्या जीवनाच्या जवळ जाणारी कोणतीही कलाकृती असेल, तर ती त्यांना आकर्षित करते, ओढून घेते, ज्यांची श्रद्धा आहे, भक्ती आहे केवळ त्यांच्याचसाठी नाही, तर इतरांसाठीही हा चित्रपट एक संदेश देणारा, दिशा देणारा आहे. आपल्याकडे मनोरंजनासोबतच प्रबोधन गरजेचे आहे, ते या चित्रपटातून होते आणि मग लोकांना आवडते सुद्धा. मनोरंजन करताना छोटासा उपदेश दिला, तरी तो प्रेक्षकांना भावतो. हा प्रेक्षकांना आवडेल, त्यांनी तो नक्की पाहावा.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.