पोलंडमधील आंदोलन

    16-Jun-2023   
Total Views |
Poland Strike For Abortion Prohibition Law

मे महिन्याचा शेवटचा आठवडा. पोलंडमधील डोरेट ललिक ही महिला पाच महिन्यांची गरोदर होती आणि तिला त्रास होत होता. पोटातल्या गर्भाला आणि आपल्याला काही इजा होऊ नये, म्हणून ती इस्पितळात गेली. तिच्या गर्भाशयाला इजा झाली होती. डॉक्टरांनी तिला तपासले. काळजी करण्यासारखे काही नाही, असे तिला आणि तिच्या घरच्यांना सांगितले. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, डोरेटची परिस्थिती बिघडतच चालली होती. डॉक्टर सकाळ-संध्याकाळ येऊन तिच्या गर्भातल्या अर्भकाचे हृदयाचे ठोके नोंदवून जायचे. मात्र, तिसरा दिवस उजाडला आणि ‘सेप्टिक‘ म्हणजे शरीरात विष भिनून त्या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी जर तो गर्भ काढून टाकला असता, तर ती महिला दगावली नसती. मात्र, तिचा गर्भपात करण्यासाठी त्या इस्पितळातला कोणताही डॉक्टर पुढे आला नाही.

कारण, गर्भपात करू नये, ही ‘गॉड’ची आज्ञा आणि मिशनरींचे सांगणे, त्यातच पोलंड देशामध्ये ‘गर्भपात बंदी कायदा’ आहे. बलात्कार, व्याभिचार आणि आईच्या जीवाला धोका असेल, तरच गर्भपात करण्याचा अधिकार आहे. गर्भाची वाढ अनियमित होत असेल आणि गर्भाला काही अनुवांशिक आजार असेल, तरीसुद्धा माता गर्भपात करू शकत नाही. आई-वडिलांना त्या बाळाला जन्माला घालावेच लागेल. या घटनेमध्ये आईच्या जीवाला धोका आहे, म्हणून तिचा गर्भपात करावा, तर तिच्या अर्भकाचे हृदयाचे ठोके क्षीण का होईना ऐकू येत होते, असे डॉक्टरांचे म्हणणे. हृदयाचे ठोके ऐकू येत असताना म्हणजे गर्भात जीव असताना गर्भपात करणे, म्हणजे हासुद्धा पोलंडमध्ये गुन्हाच. नुसते कायद्याने गुन्हा नव्हे, तर पोलंडमधल्या कॅथलिक चर्चच्या धर्मसंस्थेच्या नजरेतही मोठा गुन्हाच. त्यामुळे गर्भपाताचे पाप न करण्याचा कल म्हणे त्या डॉक्टरांचा होता. कॅथलिक चर्चच्या नियम रूढीप्रमाणे पुण्याचे भागीदार होऊ पाहणारे ते डॉक्टर काय केवळ त्या इस्पितळातच होते का? तर नाही.

गर्भपातासंदर्भात कायदेशीर आणि धार्मिक कारण देत गर्भपाताला विरोध करणारे पोलंडमध्ये सगळीकडेच दिसतील. कालबाह्य झालेल्या रीतिरिवाजांना कवटाळत बसणारे पोलंडचे हे कट्टर कॅथलिक ख्रिस्ती लोक. पण, पोलंडच नव्हे, तर युरोपमधील इतर कॅथलिक ख्रिस्तीबहुल देश किंवा अमेरिका काय? व्यक्तिस्वातंत्र्यासाठी अगदी जळीस्थळी आवाज उठवणारे हे देश. पण, हे देश त्यांच्या देशातल्या महिलांना तिच्या गर्भासंबंधीचा हक्कही देत नाहीत. इथेही कॅथलिक चर्चच्या मान्यतेनुसार गर्भपाताविरोधातच कायदा आहे. असो. डोरेट ललिकच्या मृत्यूने पोलंडमधील नागरिकांचा रोष पुन्हा उफाळून आला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. ‘स्टॉप टू किलींग’, ‘नॉट वन मोर’, ‘मॉम आय एम अफ्रेड फॉर माय फ्युचर’, ‘वुई वॉन्ट डॉक्टर्स नॉट मिशनरीस’, असे म्हणत हजारो महिला-पुरूष रस्त्यावर उतरले. पण, पोलंड सरकारचे उत्तर होते की, पोलंडच्या गर्भपात बंदी कायद्याचा आणि डोरेट ललिकच्या मृत्यूचा काही संबंध नाही. कायद्याने महिलेच्या जीवाला धोका असेल, तर ती गर्भपात करू शकते, असे आहे, मग तिने गर्भपात का केला नाही? पण, त्याचवेळी तिच्या अर्भकाचे हृदयाचे ठोके सुरू होते आणि डॉक्टरांनी जर गर्भपात केला असता, तर पोलंडच्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा ठोठावली गेली असती, यावर तेथील सरकार काही बोलत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलंडमधील आठ महिलांनी ’द युरोपियन कोर्ट फॉर ह्युमन राईट्स’संस्थेकडे पोलंडच्या गर्भपात बंदी कायद्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, हा कायदा मागे घ्यावा, अशी तक्रार केली. अशा प्रकारे हजारांच्यावर तक्रारी त्यांच्याकडे आहेत. पण, या तक्रारींवर संस्थेने निर्णय दिला की, या महिलांना पोलंडच्या ‘बॅन अ‍ॅबॉर्शन’ अर्थात गर्भपात बंदी कायद्यामुळे त्रास झाला, हे काही सिद्ध होत नाही. त्यामुळे या कायद्याला विरोध करणे चुकीचे आहे. ‘युरोपियन कोट फॉर हयुमन राईट्स’ संस्थेचा हा निर्णय कोणत्या ह्युमॅनिटीला धरून आहे? पण, याबद्दल कोणतेच पुरोगामी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवताना दिसत नाहीत. याउलट आपल्या देशात महिलांना असलेले अधिकार आणि त्यातही गर्भपातासंदर्भातले हक्क हे मानवतावादी आणि महिलांचे अभिव्यक्ती तसेच कौटुंबिक अधिकार जपणारे आहेत. युरोपियन देशामधील महिलांपेक्षा आपल्या देशातील महिला खरेच भाग्यवान! पण, तरीही पाश्चात्य आणि आपल्या देशातील तथाकथित पुरोगामी वाद काय घालणाार, तर भारतात महिलांना अधिकार नाहीत! हे लोक, पोलंडच्या या आंदोलनावरही बोलतील का?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.