नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. घटनेच्या वेळी मंत्री केरळमध्ये होते. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत.
गेल्या २० दिवसांत मणिपूरमधील मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे. याआधी १४ जून रोजी इंफाळच्या लामफेल भागात उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत बंगल्याला आग लागली होती. त्यावेळी किपगेन घरी नव्हते. ८ जून रोजी भाजप आमदार सोरासम केबी यांच्या घरावर आयईडी हल्ला झाला होता. दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी उघड्या गेटमध्ये आयईडी बॉम्ब फेकला. २८ मे रोजी काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घरावरही हल्ला झाला होता. काही लोकांनी सेरो गावात येऊन आमदार रणजित यांच्या घराची तोडफोड सुरू केली.