गेल्या काही वर्षांतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे यश त्याच्या उद्योग आणि व्यवसायाशी निगडित अशा संगणकीय कार्यपद्धतीद्वारा सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या ‘इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन‘ या संस्थेच्या फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशित अहवालानुसार, सध्या भारतात व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोग व वापराचे प्रमाण वार्षिक सुमारे ३४ टक्के दराने वाढत असून, यामध्ये आगामी तीन वर्षांत मोठी लक्षणीय स्वरूपात वाढ होणार आहे.
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमता ही नवी व प्रगत संकल्पना सध्या व्यवस्थापन क्षेत्रात नव्याने व विविध संदर्भात चर्चेत आहे. अल्पावधीतच या नव्या व्यवस्थापन विचारशैलीने आपले महत्त्व व आपली उपयुक्तता प्रस्थापित केली आहे. एवढेच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही कर्मचारी प्रेरक व व्यवसायपूरक असल्याने भविष्यकाळात व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या उभयंतांना ही बाब दिशादर्शक ठरणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात फायदेशीर ठरते. मुख्यत: कर्मचार्यांची उपयुक्तता व उत्पादकता याद्वारा व्यवसायवाढ साधणे यामुळे शक्य होते. केवळ आर्थिकच नव्हे, तर व्यवसायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठीस या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असतो, हे सिद्ध झाले आहे. देश-विदेश पातळीवर विभिन्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा लाभ सर्व संबंधितांना आता होताना दिसतो.
अर्थात, ही प्रक्रिया नवीन व नावीन्यपूर्ण असल्याने त्याबद्दल कुतूहलापोटी उत्सुकता प्रामुख्याने दिसून येते. त्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो त्याच्या अंमलबजावणीचा. कारण, कुठल्याही उद्योग-व्यवसायात नवी संकल्पना आणून त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे व व्यवसायाला उपयुक्त स्वरुपात झाली, तरच त्याचा व्यवस्थापनाच्या दृष्टीने व खर्या संदर्भात लाभ होऊ शकतो. यासाठी मूलभूत व मुख्यतः आवश्यकता असते, व्यावसायिक संदर्भात परस्पर विश्वास, व्यावहारिक पारदर्शिता व व्यावसायिक सद्भावनेची. मुख्य म्हणजे, या महत्त्वाच्या बाबी कंपनी व्यवस्थापनाच्या दप्तरी-कागदोपत्री वा कार्यालयीन भिंतींपुरत्याच मर्यादित नसाव्यात. कारण, कुठलाही नवा उपक्रम वा पुढाकाराचे यश त्याच्या शब्दश: व परिणामकारक अंमलबजावणीवरच अवलंबून असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात सुद्धा ही बाब तंतोतंत लागू पडते.
गेल्या काही वर्षांतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे यश त्याच्या उद्योग आणि व्यवसायाशी निगडित अशा संगणकीय कार्यपद्धतीद्वारा सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या ‘इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन‘ या संस्थेच्या फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशित अहवालानुसार, सध्या भारतात व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोग व वापराचे प्रमाण वार्षिक सुमारे ३४ टक्के दराने वाढत असून, यामध्ये आगामी तीन वर्षांत मोठी लक्षणीय स्वरूपात वाढ होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भारतातील वाढीचे अन्य प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या व्यावसायिक गरजांनुसार त्यामध्ये आता भारतातील विभिन्न भारतीय भाषा व स्थानिक व्यवसाय-व्यवस्थापन परंपरांचा मोठा चपखल वापर करण्यात आला.
या नव्या व्यवस्थापन पद्धतीद्वारा उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील ज्या विविध क्षेत्रांत सुधारणांद्वारे यश प्राप्ती साध्य झाली, त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन व उत्पादकता, विक्री व व्यवसाय वाढ ग्राहक सेवा व प्रतिसाद तंत्रज्ञान व अद्यायावत पद्धतीची व्यवसायाशी सांगड, व्यवसाय विकास इ. क्षेत्राचा उल्लेख करावा लागेल. या सुधारणा गरजेनुरूप भारतीय स्थिती व भाषांद्वारा केल्या जात असल्याने त्याचा लाभ विशेषत: नव्या व ‘स्टार्टअप‘ सारख्या उद्योग कंपन्या प्रामुख्याने घेत असल्याचे दिसते.
व्यवस्थापनांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभप्रद उपयोग कर्मचार्यांपासून कंपनीपर्यंत व व्यवस्थापकांपासून व्यवस्थापनापर्यंत सर्वदूर होताना दिसतो. यामध्ये प्रगत व अद्ययावत सुधारणांवर भर देण्यात येतो. विविध टप्प्यांवरील या सुधारणा व संशोधनातून व्यवसाय प्रगतीचा मार्ग त्यामुळे प्रगत व प्रशस्त होत जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व प्रगत स्वरूपातील व्यवसाय पद्धती उत्पादन प्रक्रिया लेखन-आरेखन, मूलभूत संशोधन, गुणवत्ता सुधारणांसह ग्राहक सेवा व प्रतिसादावर आधारित कायम स्वरूप व्यवसाय विकासाला यामुळे चालना मिळालेली आपण पाहतो.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य व विचारपूर्वक उपयोगाद्वारे निर्णय क्षमता व पात्रता व त्याच्याच जोडीला कर्मचारी स्तरावर बदलत्या व्यावसायिक गरजांनुरूप त्यांची क्षमताच नव्हे, तर कार्यक्षमतेमध्ये वृद्धी निरंतर होत असल्याने यासंदर्भातील पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार कायमस्वरुपी करणे आवश्यक ठरते.
कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसाय विकासाला संपूर्णपणेे व सर्वार्थाने पूरक ठरू शकते. त्यामुळे त्याचा व्यापक पद्धतीने वापर अवलंब करणे, तेवढेच आवश्यक ठरते. ही व्यवस्था लहान-मोठ्या स्वरूपातील विविध व्यवसाय-उद्योगांना उपयुक्त ठरल्याने त्याच्या लवचिकतेचा लाभ आपण वेळेत व पुरतेपणी घ्यायला हवा. यशस्वी व्यवस्थापनाचा पाया हा व्यवसायाशी निगडित तपशील व आकडेवारीवर असतो. याचा योग्य अभ्यास, आवश्यक ते विश्लेषण-विवेचन करून निर्णय घेणाची प्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात अहम मानली जाते. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास व सराव व्यवस्थापकांसाठी केल्यास त्याचा फायदा व्यावसायिक निर्णयांसाठी व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे यशस्वी व्यवसाय-निर्णयांसाठी आवश्यक ठरतो.
याशिवाय उद्योग-व्यवसायाशी संबंधित असणारे कागदपत्र व तपशीलावर योग्य संस्कार करून त्याचा उपयोग केल्यास, ते व्यावसायिक निर्णयांसाठी अधिक फायदेशीर ठरते. संगणकीय पद्धतीचा योग्य वापर करून त्याची गाठ घालणे गरजेचे असते. त्यासाठी विषयवार व क्रमानुसार माहितीची मांडणी अल्पावधीत व अचूकपणे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा केली जाऊ शकते. याशिवाय वाहन-वस्तूंची वाहतूक, विशिष्ट कामाची सद्य:स्थिती, काम आणि कामावर नियंत्रणासह निगराणी व्यावसायिक बाबी या नव्या पद्धतींद्वारा केल्या जाऊ शकतात.
पारदर्शी कार्यपद्धती
बदलत्या काळानुरूप व्यावसायिक गरज म्हणून बरीच महत्त्वाची कामे अनेकांनी व सामूहिकपणे करावी लागतात. विशेषत: प्रकल्प नियोजन-क्रियान्वयन, व्यवस्थापन विषयक सामूहिक सेवा, नेमक्या वेळात माहितीचे आदान-प्रदान, ग्राहक सेवा विषयक माहिती बँक आणि बँकिंग विषयक तपशीलावर अपरिहार्यपणे वेगवेगळ्यावेळी अनेकजण काम करतात. या आणि अशा महत्त्वपूर्ण व व्यावसायिकदृष्ट्या संवेदनशील अशा माहितीवर काम करणे, त्यावर विचार-विमर्श करणे, आवश्यकतेनुरूप निर्णय घेणे इ. कामे एकाच स्वरूपाचे काम करणार्या वेगवेगळ्या व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यपद्धतीमुळे उपलब्ध होणार्या एकात्मिक माहिती व्यवस्थेमुळे सहजगत्या व गरजेनुरूप प्रसंगी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. याचा फायदा अर्थातच व्यवसायाला होतो.
तसेच क्षेत्र कुठलेही असले तरी कामात व्यावहारिक शिस्त व सुसूत्रता असणे फार गरजेचे असते. यामुळे निश्चित कार्यपद्धतीद्वारे कामकाज होते. ही कामकाजी शिस्त पुरतेपणी पाळणे हल्ली फार गरजेचे झाले आहे. विभिन्न बँका, व्यवसाय मानक संख्या, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय-उलाढाल करणारे ग्राहक, निर्यातीवर आधारित व्यवसाय इ. प्रसंगी नेटकेपणे सूत्रबद्ध पद्धतीने व अचूक माहितीसह केलेले काम सहजपणे स्वीकार्य ठरते, नव्हे यातूनच ग्राहकांचा संतोष व त्याद्वारा व्यवसायवाढ साधली जाते. वरील पैकी अधिकांश बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा साधल्या जाऊ शकतात. मुख्यत: संगणकीय तंत्रज्ञान पद्धतीवर आधारित अशा या बाबींमुळे कमी वेळेत व अचूकपणे दिल्या जाऊ शकतात. याचा उपयोग मुख्यतः काम करण्याची व्यावसायिक विश्वासार्हता या उत्पादकता वाढ व परस्पर दोन्ही संदर्भात अवश्य उपयुक्त ठरतात.
दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवस्थापन व व्यवसाय क्षेत्रातील वाढता वापर लक्षात घेता, आता प्रमुख व्यवस्थापन शिक्षण संस्थांसह तंत्रज्ञान शिक्षण संस्था या क्षेत्रात नव्याने व प्रामुख्याने पुढाकार घेत आहेत. या विषयाचा समावेश अधिकृतपणे अभ्यासक्रमात अद्याप झाला नसला, तरी आघाडीच्या व्यवस्थापन शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षणासह कृत्रिम तंत्रज्ञान शिकवून त्यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देण्यास यापूर्वीच सुरुवात केली केली आहे, हे विशेष.
व्यवस्थापन शिक्षणतज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञान, संगणकीय प्रगती, प्रगत व्यावसायिक वा व्यवस्थापन विषयक संकल्पना यांच्या जोडीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ ही बाब आता अपरिहार्य ठरणार आहे. बदलत्या व नव्या व्यावसायिक परिस्थिती व स्पर्धेवर मात करून व्यवसायाला यशस्वी करण्यासोबतच प्रसंगी जागतिक आयाम प्राप्त करून द्यायचे असतील, तर नव्या बदलांमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा बुद्धीसह वापर करणे त्यांच्या मते आता आवश्यक झाले आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६