
एनसीईआरटी वाद – स्वयंघोषित बुद्धिवाद्यांचा फुकाचा तमाशा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशातील गर्विष्ठ, स्वार्थी आणि स्वयंघोषित बुद्धिजीवी नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम बदलास विरोध करून हे लोक फुकाचा तमाशा करत आहेत, असे प्रत्युत्तर देशातील १५०हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी सुहास पळशीकर – योगेंद्र यादव कंपूस दिले आहे.
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेले बदल हे 'एकतर्फी आणि अतार्किक' असल्याचा आरोप एनसीईआरटीच्या सल्लागारपदावर असलेले सुहास पळशीकर आणि स्वराज इंडियाचे प्रमुख आणि कृषी ते समाजसेवा व्हाया राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील ज्ञान असल्याचा दावा करणारे योगेंद्र यादव यांनी आपले नाव पुस्तकातून काढण्यात यावे, अशी मागणी एनसीईआरटीकडे केली होती. मात्र, एनसीईआरटीने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर पळशीकर – यादव यांनी आपल्या कंपूतील ३३ जणांना हाताशी धरून पत्रकबाजी केली होती. यामध्ये ३३ जणांनीदेखील आपले नाव पुस्तकातून काढण्याची मागणी केली होती.
मात्र, आता पळशीकर – यादव यांच्या कंपूस देशातील १९२ शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विभागप्रमुख यांनी पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. या शिक्षणतज्ज्ञांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांत एनसीईआरटी या देशातील अग्रगण्य सार्वजनिक संस्थेला बदनाम करण्याचा आणि अभ्यासक्रम अद्ययावत करण्याच्या अत्यंत आवश्यक प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. या तमाशातून माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे महत्त्व आणि त्यातील सामूहिक बौद्धिक गुंतवणूकीचे महत्व, याचा पूर्णपणे विसर पडला आहे. त्याचप्रमाणे एनसीईआरटी अभ्यासक्रमास लक्ष्य करून त्याद्वारे नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या कामात अडथळे आणले जात आहेत. त्यामुळे अशा गर्विष्ठ, स्वार्थी आणि स्वंयघोषित बुद्धिवाद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही हे पत्र लिहित असल्याचे म्हटले आहे.
एनसीईआरटीने समकालीन गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे तर्कशुद्धीकरण केल्याचे पत्रात म्हटले आहे. यामध्ये मूळ संकल्पनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे काय अस्वीकार्य आहे आणि काय इष्ट आहे हे ठरवण्याच्या संदर्भात, नवीन पिढीला सध्याच्या ज्ञानाच्या आधारावर काहीतरी जोडण्याचा - हटवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कार्यरत विद्वानांची निवड हे गतवेळच्या निवडप्रक्रियेपेक्षा अधिक पारदर्शक होती. त्यामुळे चुकीची माहिती आणि अफवा पसरवून शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांना विरोध केला जात असल्याचेही या शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.
फॅसिस्टवादी उद्दामांचे घातक मनसुबे – प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित, कुलगुरू – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानजनक व्यंगचित्रे कोणाच्या कारकिर्दीत एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात घेण्यात आली, हे जगजाहिर आहे. त्याद्वारे ‘त्यांची’ विशिष्ट मानसिकता दिसून आली होती. एखाद्या मुद्द्याविषयी मतभेद असल्यास राजिनामा देण्याचा मार्ग आहेच. मात्र, या मुद्द्याचे राजकारण करून त्यामागे एखादे षडयंत्र आहे का, हे तपासायला हवे. कालानुरूप अभ्यासक्रमात बदल करणे, त्याचे तर्कशुदधीकरण करणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे २० वर्षांपूर्वी जे केले तेच आजही चालू ठेवणे आणि विशिष्ट लोकांनीच त्याविषयी बोलणे ही मानसिकता म्हणजे उद्दामपणा आणि फॅसिस्टवादाचे अतिशय घातक मिश्रण आहे. अनेक वर्षांपूर्वी तयार केलेला अभ्यासक्रम पिढ्यानपिढ्या शिकवणे सुरूच ठेवल्यास त्यामध्ये कालसुसंगत बदल करण्याचा हक्क नव्या पिढीस आहे. एनसीईआरटीचा अभ्यासक्रम आता २००६ नंतर २०२३ साली म्हणजे तब्बल १७ वर्षांनी बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सकारात्मक बदलांमध्येही राजकीय मनसुबे घुसडणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.