धर्मांतरासाठी दबाब, खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ; पाद्रीसह ४ जणांना अटक!

    15-Jun-2023
Total Views |
uttar-pradesh-hardoi-fir-against-4-for-forcing-hindu-family-became-christians
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एका कुटुंबाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजारी मुलाला बरे करण्याच्या बहाण्याने आरोपी संपूर्ण कुटुंबावर ख्रिस्ती होण्यासाठी दबाव आणत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी १३ जून रोजी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील सुरसा पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. ओडरा गावातील रहिवासी विजय कुमार श्रीवास्तव यांनी त्यांच्याच गावातील ४ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी मैकू, सुमित, अधिराज आणि शिवनंदन हे ख्रिश्चन असल्याचे सांगितले. त्यांनी अधिकराज आणि शिवनंदन हे पाद्री असल्याचे ही सांगितले आहे. या चौघांवर गावामध्ये परवानगी आणि मान्यता नसताना ख्रिश्चन शाळा चालवल्याचा आरोप आहे.

विजय कुमार श्रीवास्तव यांचा मुलगा सौरभ याला ब्रेन ट्युमर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने आजार बरा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विजय कुमार आपल्या मुलाला अनेकवेळा आरोपीच्या घरी घेऊन गेला. पण तरी ही विजय कुमार यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. काही दिवसांनंतर चारही आरोपींनी विजयला सांगितले की, जर त्याने संपूर्ण कुटुंबासह ख्रिश्चन धर्म स्विकारला तर आम्ही तुम्हाला १ लाख रुपये देऊ. यासोबतच तुमचा मुलगा ही बरा होईल. दरम्यान २४ डिसेंबर २०२२ रोजी पीडित विजय कुमार यांना ५ हजार रुपये देण्यात आले. आणि त्यांच्या आजारी मुलाच्या गळ्यात क्रॉस असलेली माळ घालण्यात आली.
 
 
 
मैकू, सुमित, अधिराज आणि शिवनंदन यांनी विजयच्या घरात असलेल्या देवतांच्या मूर्ती फेकून दिल्याचा आरोप ही पीडित विजय यांनी केला आहे. ही बाब विजयच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना कळताच त्यांनी या प्रकरणाला विरोध केला. त्यामुळेच विजयनेही धर्मांतर करण्यास नकार दिला. यामुळे चारही आरोपी संतप्त झाले. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ते विजयकडे पोहचले. त्यावेळी विजय शेतीत काम करत होते.
 
विजय कुमार यांचा आरोप आहे की, त्या दिवशीही आरोपींनी धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसे न केल्यास खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्या दिवसापासून त्याच्यावर सतत दबाव टाकला जात होता. यामुळे व्यथित झालेल्या विजय कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून, मैकू, सुमित, शिवानंदन आणि अधिराज यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०४ अंतर्गत उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायदा २०२१ च्या कलम ३/५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.