चेन्नई : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री वी सेंथिल बालाजी यांना दि. १४ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. कॅश फॉर जॉब घोटाळ्यासंदर्भात त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. मात्र अटक केल्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले, तिथे ते रडताना दिसले.
सेंथिल बालाजी हे दि. १३ जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, सकाळी सातच्या सुमारास ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला. याबाबत माहिती मिळताच बालाजी घरी आले. त्यानंतर सुरू झालेल्या दीर्घ चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आता ईडी त्यांना न्यायालयात हजर करून रिमांडची मागणी करणार आहे.
प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने सेंथिल बालाजी यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यानी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील ओमंडुरार सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे ते वेदनेमुळे रडताना दिसले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना दिसले.
सेंथिल बालाजी यांना अटक का करण्यात आली?
सेंथिल बालाजी यांना परिवहन विभागातील कॅश फॉर जॉब घोटाळ्याप्रकऱणी अटक करण्यात आले आहे. सेंथिल बालाजी २०११ ते २०१६ पर्यंत AIADMK सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. दरम्यान, त्याच्यावर नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी तपास करून सेंथिल बालाजीसह ४६ जणांवर आरोपपत्र दाखल केले. या घोटाळ्यात परिवहन विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे आहेत.
हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याने. अशा स्थितीत पोलिस आणि आयकर विभागाच्या माध्यमातून तपास अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) पोहोचला. यानंतर ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. पण सेंथिल ईडीच्या या नोटिशीच्या विरोधात न्यायालयात गेले. जिथे सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला आणि पोलीस आणि ईडीला चौकशीची परवानगी दिली. यानंतर ईडीने छापे टाकत सेंथिल बालाजीला अटक केली. यापूर्वीही प्राप्तिकर विभागाने त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.