तरीही ‘ड्रामा शुरूच रहेगा...’

    14-Jun-2023   
Total Views |
Maharashtra Current situation Love Jihad And Politics

तुम्हीच सांगा काकाहो, मामाहो काय करायचं? मला तर कसं पण आमदार व्हायचं हाय. आतून काही वाटत नाय, पण वरून वरून दाखवावं लागतं की मी सुधारली! म्हणजे, मला कधीच वाटत नाही की मी काही वाईट करते, का काही चुकीचं करते. मी मीच आहे! माझ्यासारखं कुणी नाही!! काय म्हणता, माझ्यासारखा सरडा आहे? तो पण पटपटा रंग बदलतो. बदलू द्या हो काकाहो, मामाहो, पण सरड्याशी माझी तुलना होऊच शकत नाही. तो जीव वाचवण्यासाठी रंग बदलतो. मी जीव वाचवण्यासाठी नाही, तर मला राजकारण करायचं आहे म्हणून! सत्ता मिळवण्यासाठी निर्लज्जपणाचा कळस करण्याची गुणवत्ता असावी लागते. त्यात माझी बरोबरी कुणी करू शकते का? आता बघा ना, वारीमध्ये पोळ्या लाटल्या, टाळ वाजवीन, उद्या काय अभंग बी म्हणीन. पण, छे लोक काय विसरायला मागत नाही! तिथे आधीच्या पक्षात असताना हिंदू समाजाला, त्यांच्या श्रद्धांना शिव्या देताना मजा यायची राव! आता इथे येऊन पोळ्या ते बी वारीसाठी लाटाव्या लागतात. लोक म्हणतात, हा माझा ‘आय बसली ते कानाखाली बसली’चा सुखद प्रवास हाय! असू द्या दादाहो! हो हो, अजितदादा, इथे तुम्हाला ‘दादाहो’ नाही म्हंटले हा लोकांना म्हंटले आहे. मला न्याय द्या, माझ कुणी कुणी ऐकत नाही म्हणून मी किती रडले. (डोळ्यात टिपूस आला नाही ही गोष्ट वेगळी. पण, रडण्याचं नाटक करणं सोपं का आहे?) मी असे रडले, पण कुणाला दया आली नाही. आमच्या खर्‍या साहेबांचे पुतणे तर फारच हुशार. त्यांनी बरोबर ओळखलं. मलाच ओरडले. आमच्यासमोर रडून फायदा नाय म्हणाले. आता काय बोलायचं?? अंदर की बात सांगू का? आता त्या ताईबाई साहेबांची कन्या म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून काही लोक घेतात. किती इंगळ्या डसतात जीवाला. बरं झालं, चला तिकडचे बस्तान उठवलं आता इथे वांद्य्राच्या साहेबांचे सैनिक आहे.इथे तसं कुणी नाही माझ्या ‘कॉम्पिटिशन’ला, म्हणजे मला तरी तसं वाटतं बुवा. काय म्हणता, इतका दलबदलूपणा येतो कुठून? कुठून म्हणजे, मी कुणाची शिष्य आहे? विसरला का दादाहो, काय म्हणता मी काहीही केले तरी अंधारच आहे. माझे नाटक सगळ्यांना माहिती आहे. असू दे, असू दे तरीही ‘ड्रामा शुरूच रहेगा..’
चिश्तीचा निर्लज्जपणा!

लडकी चीज ही ऐसी हैं जो बडे से बडे आदमी को भी गिरा सकती हैं, यह एक ऐसा सबजेक्ट हैं की बडे से बडा फिसल सकता हैं’ असे सरवर चिश्ती बोलला. कोण हा सरवर चिश्ती, तर अजमेर शरीफ दर्ग्याच्या मौलवीचे संघटन आहे ‘अंजुमन सय्यद जदगन.’ या संघटनेचा हा पदाधिकारी. लाखो-करोडो आयाबहिणी या दर्ग्यामध्ये जात असतात. हिंदू महिला तर बहुसंख्येने जातात. त्या अजमेरच्या दर्ग्याशी संबंधित व्यक्तीची ही मानसिकता? काय म्हणावे? मुली बाळी चीज म्हणजे वस्तू आहेत? या सरवर चिश्तीच्या जीवन संस्कारात महिलेला चीज-वस्तू समजतं असतील, असे वाटणारे अगणित पुरावे आहेतच म्हणा, तर सरवर चिश्तीने हे असले विकृत विधान कशासंदर्भात केले? तर ‘अजमेर ९२’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १९९२ साली अजमेर दर्ग्याशी संबंधित लोकांनी १००च्यावर मुलींवर बलात्कार आणि त्यांना ‘ब्लॅकमेल’ केले. या मुलींचे आयुष्य नरक बनले. काहींनी आत्महत्या केली, तर काही परगंदा झाल्या असे म्हणतात. ‘द काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांसारखाच काही तथ्यांवर आधारलेला हा ‘अजमेर ९२’ चित्रपट असे चित्रपट निर्मात्याचे म्हणणे. अजमेरमध्ये हे घडले होते का? तर पुरावे आहेत की घडले होते. पण, त्यावर चित्रपट बनवून तो प्रदर्शित होऊ नये, असे अजमेर दर्गा संबंंधित सगळ्यांचे मत. तर या चित्रपटाला विरोध करताना, हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून जे मौलवी जमले होते, त्यांच्यासमोर सरवर चिश्ती हे म्हणाला आहे की, ‘लडकी चीज ही ऐसी हैं.’ छे, किती विकृत लिंगपिसाट मानसिकता. असे बोलून असेच सिद्ध करत आहे की, मुली असतातच अशा की त्यांच्यासोबत बलात्कार करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्यास लोक प्रेरित होतात. चिश्तीसारखे लोक अजमेरच्या दर्ग्याशी संबंधित आहेत. चिश्ती ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सदस्य आहे, असे म्हणतात. चिश्तीने यापूर्वीही अशीच विकृत द्वेषमूलक विधाने केली आहेत. आता त्याने माफी मागितली म्हणे. पण आता काय फायदा? त्याच्या मनातली विकृती जगासमोर आलीच. त्यामुळे तो आणि तो ज्या कोणत्या संस्थेशी निगडित आहे, त्या सगळ्यांचे खरे रूप उघड झाले. यानंतरही जर हिंदू समाजाचे डोळे उघडणार नसतील, तर मग कठीण आहे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.