मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जानिर्मितीसाठी मागील वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने मागील काही महिन्यात विविध सामंजस्य करारांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीसाठी मोहीम हाती घेतली असून विजेच्या तुटवड्याचा संभाव्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सुरु केले आहे. नवीकरणीय तथा पवन आणि जलविद्युत ऊर्जा निर्मितीसाठी अधिक जोर दिला जात असून 'ऊर्जादायी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फडणवीसांचे विशेष प्रयत्न सातत्याने अधोरेखित होत आहेत. बुधवारी राज्य सरकारच्या वतीने एक करार करण्यात आला असून या करारातून र्राज्यात ५ हजार मेगावॅट निर्मितीसह हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून ऊर्जादाये महाराष्ट्राचे फडणवीसांचे प्रयत्न फलद्रुप होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बुधवार, दि. १४ जून रोजी राज्य सरकारच्या महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या करारामुळे ऊर्जानिर्मिती, गुंतवणूक आणि रोजगार उपलब्धता अशी विकासाची त्रिसूत्री साधली जाणार आहे.
सहयाद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
''केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करायाची आहे. त्यामुळे ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे.
महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.
सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत
सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
अवघ्या दोन आठवड्यात एक लाख कोटींची गुंतवणूक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची झलक दाखवून इतर क्षेत्रांसह ऊर्जाक्षेत्रातही भरघोस गुंतवणूक खेचून आणण्यात यश मिळविले आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या ऊर्जा विभागाच्या माध्यमातून अवघ्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात एक लाख बारा हजार कोटींची प्रचंड मोठी गुंतवणूक आली आहे. ६ जून २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या करारातून ७१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्या करारानुसार नॅशनल हायड्रो पॉवर कार्पोरेशनच्या माध्यमातून ४४,००० कोटी रुपयांचे ७३५० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प तर टोरंट पॉवर लि. कंपनीच्या माध्यमातून २७,००० कोटी रुपये किमतीच्या ५७०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला जोडूनच अवघ्या दिवसांत दुसरा मोठा ऊर्जानिर्मितीचा करार करण्यात आला असून त्या माध्यमातून ४१ हजार कोटींच्या गुंतवणुकीसह ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार आहे.