कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान

    14-Jun-2023
Total Views |
Article On Kundalini Shakti

खर्ज साधना आणि कुंडलिनी जागृती

सर्व भारतीय शास्त्रांचा आधार योगशास्त्र असल्यामुळे, भारतीय परंपरेत योग बरेच आहेत. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, अध्यात्मयोग, मंत्रयोग यांसारख्या मोक्षाप्रत घेऊन जाणार्‍या मार्गांना ‘योग’ म्हणतात. अध्यात्मालाही योग लागतो काय? होय, सतत अभ्यासयुक्त संस्काराने योग प्राप्ती होते. सर्व जीवनच ज्यावेळेस विशिष्ट संस्काराने भारले जाते, त्या वेळेस त्या संस्कारांना सहज अवस्था प्राप्त होते आणि असल्या सहज संस्कारांतून योगशास्त्र उत्पन्न होत असते. असल्याच अभ्यासयुक्त सहज संस्कारांतून भारतीय संगीत शास्त्रातील गानयोग उत्पन्न झाला आहे. पण, त्या सहज संस्कारांत एक शास्त्र आहे. कोणत्याही प्रकारच्या सहज संस्काराला गानयोगात स्थान नाही. गायक राग गात असता त्या-त्या रागाच्या स्वरुपाशी पूर्ण एकरुप होतो, त्यामुळे तो गात असताना त्याच्या गाण्याची सहज अवस्था म्हणजे तो राग असतो.

गात असताना सारखा विचार करीत गायक गात असेल, तर त्याला गाताच येणार नाही. असली सहज अवस्था त्याला सतत अभ्यासाने, संस्काराने व त्यातून उत्पन्न होणार्‍या वृत्तीतून प्राप्त करायची असते. ‘धवलाश्री’ व ‘जयती’ हे राग एकाच स्वरमेलांचे. पण, दोघांच्या प्रकृतीत भेद असल्याने दोघांच्या फलश्रुतीतही बराच भेद आहे. हे राग गाताना अतिशय काळजीपूर्वक गावे लागतात. थोडेसे अवधान गळाले की रागांची परस्पर भेसळ व्हायला वेळ लागत नाही. पण, अतिशय काळजीने गाणार्‍याच्या गायनातही अनवधानाने चुकून अंतर पडते. त्याकरिता एकच उपाय असतो आणि तो म्हणजे त्या रागाच्या आविर्भावाने स्वतःला पूर्ण झाकून घेणे म्हणजे स्वतःच रागमय होणे. असे झाले असता गायक भानावर जरी नसला तरी राग गायन चुकत नाही. ते जसे व्हायचे तसेच होते. हे असे का होते? तसे शुद्ध गायन कोण करवून घेतो? उत्तर कठीण आहे. अभ्यास संस्कारच हे सर्व घडवून आणतात. असल्या अभ्यास संस्कारांतून एक वृत्ती निर्माण होते. ही वृत्तीच राग, सातत्य कायम ठेवते व साधकाला इष्ट फल देते. म्हणजे वृत्तीसारुप्य ही गानयोगाची पहिली कसोटी आहे.

भगवान पतंजलींनी साधनपादातील चौथ्या सूत्रात लिहिले आहे. ’वृत्तीसारुप्यम् इतरत्र’ असल्या वृत्तीसारुप्याने गायक योगसाधक बनतो. गानयोगाची सुरुवात येथूनच आहे. गानयोगी होण्याकरिता साधकाला योगशास्त्रातील काही प्राथमिक अवस्थांचा अभ्यास करावा लागतो. नाडीशुद्धी व स्वरज्ञान हे त्यापैकी महत्त्वाचे अभ्यास होत. योग्याला आवश्यक असे योग्य आचरण ठेवून खर्जसाधनेने कुंडलिनी जागृत करावी लागते. योग्याला आवश्यक आचरण कोणते? तर ’नियम पाळावे, जरी म्हणशील योगी व्हावे॥ रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी। शब्दवल्गना बहु न करावी । साधक जीवे, जरी म्हणशील योगी व्हावे॥’ आजच्या सर्वसाधारणांच्या जीवनात वरील गोष्टींना थारा नसतो, नव्हे तसे वागण्यात त्यांना कमीपणा वाटतो. कारण, स्वरांचे विचित्र प्रदर्शन तानबाजी साधल्यास व लयकारी कायम ठेवल्यास उत्तम गायक म्हणून जर मिरविता येत असेल व प्रसिद्धी मिळवता येत असेल, तर संयमित जीवन जगून गानयोगी बनण्याचे कारणच काय? ’येन केन प्रकारेन प्रसिद्धो पुरुषो भवेत’ अशी साधारणांची मनोरचना असते, तर काही थोड्यांना असल्या स्वस्त तानबाजी व स्वरबाजीशिवाय काही संगीत जीवन आहे याची कल्पनाही नसते. त्यामुळे अज्ञानामुळे असले लोक ’महाजनो येन गतस्य पंथः’ या नात्याने साधारणांनी चोखाळलेलाच मार्ग आवडीने स्वीकारतात.

खर्जसाधनाने कुंडलिनी जागृत झाल्याने, चक्रभेदन होऊन सप्तस्वरांची स्थाने मोकळी होतात व गानयोग्याला त्या-त्या स्वरांची स्थाने कळू शकतात. मरहूम गायक फैयाज खाँ यांचे मरणकालीन उद्गार प्रत्येक गायकाने लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ‘वांझ गाय दिसायला कितीही सुंदर असली तरी अपत्य होऊ न शकल्याने दूध देऊ शकत नाही. ती खाण्याकरिता जगते व खात-खातच मरते. तद्वत् गायनाचा केवळ रंजकतेशिवाय दुसरा उपयोगच नसेल, तर गायनाला कोणते स्थान द्यावयाचे?’ रंजकतेशिवाय गायन हृद्य होत नसते. रंजकता नसेल, तर गायन श्रवणीय होऊ शकत नाही हे तेवढेच खरे, पण रंजकता ही स्वयंभू गोष्ट नाही. सतत संस्कारांतून उत्पन्न होणारी वस्तुस्थिती आहे. जे गायनवादन एकाला रंजक वाटेल, ते दुसर्‍याला तापदायक असू शकते. शास्त्रीय संगीताची आवड असणार्‍याला सकाळची तोडी स्वर्गात नेणारे एक रम्य साधन वाटेल, तर तीच तोडी सीनेसंगीत शौकिनाला किंवा परदेशस्थ भिन्न रुचीच्या व्यक्तीला ‘कपाळशूळ’ म्हणून वाटणे शक्य आहे. सिनेसंगीतातून अवतरित होणार्‍या गायनाला वेळेचे बंधन झुगारूनच त्या कुळात प्रवेश करावा लागतो. एकूण अभिरुची किंवा रंजकता हे संस्काराचे अपत्य आहे, हे सर्वांनाच पटण्यासारखे सत्य आहे. कुंडलिनी जागृतीनंतरच स्वरांची स्थाने कळू शकतात, हे आपण पाहिलेच आहे.

स्वरांची स्थाने कळल्यानंतर स्वरांचे वर्ण पाहता आले पाहिजेत. स्वरांचे वर्ण पाहता येण्याकरिता एक लहानसे साधन आहे. स्वरोदय शास्त्रानुसार, एकाच नाकपुडीतील स्वर (श्वासक्रिया) आवश्यक तितका वेळ स्थिर ठेवण्याचा अभ्यास प्रथम करावा लागतो. या श्वासप्रक्रियेलाच ‘स्वर’ असे म्हणतात. अशा तर्‍हेने स्वर स्थिर करता आल्यावर त्यावर साधकाने आपली दृष्टी स्थिर ठेवावी. साधारणतः ४० दिवसांत किंवा पिंडधर्मानुसार कमी अधिक काळात श्वासाचे म्हणजे स्वरांचे वर्णन कळू लागतात. ही साधना करताना भगवान शिवशंकराला साक्ष ठेवून धौत आणि अखंड वस्त्रे परिधान करून नित्य मध्यरात्री श्वासावर दृष्टी केंद्रित करून बसावे लागते. पंचतत्वातील स्वरांचे वर्ण अशा तर्‍हेने कळू लागतात. दोन्ही श्वासनाड्या मोकळ्या असल्यास ती सुषुम्ना नाडी होय. या नाडीतील श्वासाचा आवेग नाकाबाहेर लागत नसल्यास ते आकाश तत्व होय. आकाश तत्वाचे रंग अनेक असतात. ते चित्रविचित्र असून अत्यंत देदीप्यमान व पारदर्शक असूनसुद्धा कणाकणांतून स्वयंप्रज्वलित असल्यासारखे वाटतात. जड व्यवहारात असले अद्भुत रंग पाहायला मिळत नाहीत.

उजवी नाकपुडी चालू असल्यास तिला ’सूर्यस्वर’ किंवा ’पिंगलास्वर’ म्हणतात, तर डावी नाकपुडी चालू असल्यास ‘चंद्रस्वर’ किंवा ’इडास्वर’ म्हणतात. नाकाचे खाली चार अंगुले श्वासाचा आवेग असल्यास अग्नितत्व, आठ अंगुले आवेग असल्यास वायुतत्व, बारा अंगुले आवेग असल्यास पृथ्वितत्व, तर १६ अंगुले आवेगाला जलतत्व असे म्हणतात. पृथ्वितत्वाचा रंग पिवळा, आपतत्वाचा रंग शुभ्र, अग्नीचा रंग लाल, वायूतत्वाचा रंग नीलश्याम तर आकाशाचे सर्वच वर्ण भासतात. स्वरतत्वांना जसे वर्ण असतात. तसेच, त्यांना स्वादही असतात. साधक ज्या तत्वावर स्वर निश्चित करेल, त्या तत्वाच्या स्वादाचा त्याला अनुभव येतो.

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)