तथागतांच्या धम्मसेवेसाठी!!!

    13-Jun-2023   
Total Views |
Mata Ramabai Ambedkar Nagar Ghatkopar Dhammaseva

सोमवार, दि. १२ जून रोजी माता रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतीय भिक्खू संघाच्या भिक्खू संघ निवास आणि धम्मकेंद्राच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि खा. मनोज कोटक यांच्या समन्वय सहकार्यातून धम्मवास्तूचा जीर्णोद्धार होत आहे. त्रीरत्न महिला मंडळ, वंदना संघ, गौतमी महिला मंडळ, यशोधरा महिला मंडळ या संस्थासह अनेक स्थानिक धम्मबांधव यावेळी धम्मसेवेत कार्यरत होते. धम्मवास्तूच्या जीर्णोद्धारानिमित्त वास्तवाचा मागोवा घेताना जे वाटले ते इथे मांडले आहे. नमो बुद्धाय!

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच खा. मनेाज कोटक यांच्या समन्वय आणि सहकारातून भारतीय भिक्खू संघाच्या महत्त्वाच्या आणि समाजदिशादर्शक धम्मवास्तूचा जीर्णोद्धार झाला. मालाड मालवणी येथील मागासवर्गीय कुटुंबावर अत्याचार करत त्यांना तिथूनपलायन करण्यास भाग पाडले गेले. तेव्हा मोठ्या भावासारखी त्या कुटुंबाची काळजी -रक्षण करत त्यांच्यासोबत खंबीर उभे राहणार्‍या मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात म्हटले की, ” समाजाच्या आणि देशाच्या उत्थानासाठी आम्ही सगळे एक आहोत’ तेव्हा माता रमाबाई नगरामध्ये उपस्थित भिक्खू संघ आणि नागरिकांमध्ये मंगलएकतेची लय साधली गेली.

मंगलप्रभात लोढा यांनी तर आपण राष्ट्रीय स्वंयसेवक आहोत हे सांगून या धम्मवास्तूच्या जीर्णोद्धारामध्ये रा.स्व.संघाच्या मार्गदर्शनाचा आणि भूमिकाही स्पष्ट केली. मंगलप्रभात लोढा, मनोज कोटक, पराग शहा भाजपच्या या सगळ्याच प्रतिनिधींचे म्हणणे होते की, “भिक्खू संघाचे काम हे ईश्वरी कामच आहे. समाजजागृती आणि धम्मसंवर्धनासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला तर ते आमचे भाग्य.” यावेळी शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनीही मनोगत व्यक्त केले असो, जीर्णोद्धार होत असलेले हे भिक्खू निवास पुष्कळ जुने, जीर्ण, मोडकळीस आलेले. हे भिक्खू निवास नव्याने बांधण्यात येत असून भिक्खू निवासाचा जीर्णोद्धार होत आहे. बौद्ध धम्मासाठी प्रचार प्रसार करणारे बौद्ध धम्मगुरुंचे श्रामणेर-भिक्खू प्रशिक्षण केंद्र, विपश्यना केंद्र, तसेच बौद्ध भिक्खूंचे वास्तव्यासाठी असलेले भारतीय भिक्खू संघाचे भिक्खू निवास, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, उपिसक उपासिका प्रशिक्षण केंद्र, विपश्यना ध्यान साधना केंद्रीय, बाल संस्कार केंद्र, विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका तसेच धम्म मार्गदर्शन असे धम्माचे काम या भविष्यातील नव्या वास्तूमध्ये आणखीन भव्यरित्या सुरू होणार आहे.

यापूर्वीहीयाच वास्तूध्ये भारतीय भिक्खू संघ हे काम करतच होता म्हणा. पण आता जीर्णोद्धारहोणार्‍या या भव्य वास्तूमध्ये या सर्व कार्याची भव्यता आणि व्याप्ती आणखीन वाढेल हे नक्कीच. या कार्यक्रमाला भदन्त काश्यपजी महाथेरो-उपाध्यक्ष भारतीय भिक्खू संघ, भदन्त करूणाज्योती महाथेरो- कोषाध्यक्ष भारतीय भिक्खू संघ, भिक्खू विरत्न महाथेरो-कार्याध्यक्ष भारतीय भिक्खू संघ, आर्याजी संघमित्रा थेरी, आर्याजी कात्यायनी थेरी व भिक्खू गण उपस्थित होते. विपश्यनाचार्य पूज्य भदंत संघकिर्तीजी महास्थवीर यांचे आशीर्वचन उपस्थितांना लाभले. यावेळी भाजपचे प्रवीण छेडा, भालचंद्र शिरसाट, अशोक राय, देवंद्र रत्नम आणि योजना ठोकळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. किती सुखद आणि सामाजिक समरसतेचा गाथा सांगणाारी ही घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी ही वस्ती. तथागतांचा धम्म माननारी ही वस्ती. १९६९ सालापासून भारतीय भिक्खू संघ माता रमाबाई नगरामध्ये धम्माच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करत आहे.

समाजात दया, करूणा, मैत्रीसह अष्टांग मार्गानुसार समाजबांधव कसे जीवन व्यतीत करतील यासाठी संघ प्रयत्नशील आहे. तथागतांच्या या करूणामयी धम्माच्या तत्वाचे विचार समाजात संवर्धित करण्यासाठी भारतीय भिक्खू संघाचे योगदान मोठे आहे. बुद्धांचा धम्म करूणा सांगतो दया मैत्रभाव सांगतो. तो धम्म निखळ निस्वार्थीपणे हा भिक्खू संघ समाजाला शिकवतो आहे, सांगतो आहे. दया करूणा मैत्री या मानवतेचेअधिष्ठाण असलेल्या या संकल्पना या भावना समाजात संवर्धित करत आहे. या सगळ्यांची आज देशाला समाजाला गरज आहे. कारण म्हणतात ना की तुम्ही तुमच्या लेकरांना धम्म शिकवला नाही, तर अधर्मी लोक तुमच्या मुलांना अधर्म शिकवण्यासाठी टपलेले असतातच. अशा अधर्मी लोकांपासून आणि विचारांपासून हे धम्मगुरू आणि धर्मवास्तू समजाचे रक्षण करत आहे, तर अशा या महत्त्वाच्या धम्मवास्तूच्या जीर्णोद्धारासाठी भिक्खू विरत्न महाथेरो यांची तळमळ आणि प्रयत्न शब्दातीत आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी आणि धम्मकामासाठी कष्ट करण्याची सदवृत्तीप्रेरणा या जोरावर भिक्खू विरत्न महाथेरो यांनी भिक्खू निवासाच्या जीर्णोद्धाराचे लक्ष पूर्ण केले. अर्थात भिक्खू विरत्न महाथेरो याचे श्रेय स्वत:कडे न घेता भिक्खू संघाच्या वरिष्ठ भिक्खूना देतात.

डॉ. वैभव देवगिरीकर यांच्या साथीला देतात. हिंदू सभा रुग्णालयाचे डिन असलेले डॉ. वैभव देवगिरीकर हे गेले अनेक वर्षे भिक्खू संघाच्या आरोग्यसेवेसाठी झटत आहेत. त्यातूनच त्यांचा आणि भिक्खू विरत्न महाथेरो यांचा संपर्क झाला. पुढे डॉ. वैभव देवगिरकर यांनी भारतीय भिक्खू संघातील भिक्खूंच्या आरोग्यासाठी सातत्याने उपक्रम राबवले.डॉ. वैभव देवगिरकर यांनी भिक्खूसंघाची केलेली आरोग्यसेवा ही विसरण्यासारखी नाही. या सगळ्या पाश्वर्र्भूमीवर ”धर्म म्हणा धम्म म्हणा पण त्याचे संवर्धन करणारा, समाजाला नैतिकतेचे अधिष्ठान शिकवणार्‍या भिक्खूंची काळजी समाजाने म्हणजे त्यात आपणही आलोच, तर आपण ही काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार आहेात? असे अतिशय संवेदनशीलरित्या सांगणारे आणि कार्य करणारे विठ्ठल कांबळे आणि संजय नगरकर. या दोंघाचाही उल्लेख केला नाही, तर या वास्तूच्या जीर्णोद्धारावर लिहिलेला हा लेख माझ्यामते, अपूर्ण राहील. भिक्खूंना कोणताही त्रास कधीही होऊ नये, यासाठीची त्यांची नेहमीप्रमाणे प्रसिद्धी पराडमुख असे कार्य आहे.

असो, माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होणारी आंदोलन अगदी जवळून अनुभवलेली सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला या धम्मवास्तूच्या जीर्णोद्धाराचे खरच खूप अप्रुप आणि महत्त्व वाटते. आज काही समाजविघातक शक्ती समाजात वितुष्ट पसरवण्याचे काम करतात. समाजातील दोन गटामध्ये तेढ विद्वेष कसा पसरले यासाठी हे लोक सातत्याने कुरापती कटकारस्थान करतात. ते लोकांच्या मनात द्वेष पसरवत की या देशात बाबासाहेब केवळ एकाच समाजगटाचे आहेत. इतर कुणी जर बाबासाहेबांना मानत असतील तर त्यांनी तसे मानू नये. जर इतर समाजगटांनी बाबासाहेबांचे नाव घेतले तर ते खोटे आणि शोषणकर्तेच आहेत. त्यांची जीभ कापली पाहिजे त्यांना ठार मारले पाहिजे.. (हे मी कपोकल्पित सांगत नाही तर असे गीत आहे आणि ते अंगात नाचायची उर्मी येईल अशा पद्धतीने काही लोक या वस्तीत ते गायचे) डॉ. बाबासाहेब आंबेडर हे केवळ बौद्ध समाजाचेच आहेत, अशी मांडणी करत या परिसरात संत कबिराच्या नावाने काही फुटीरतावादी जलसे करत आणि म्हणत. 

जयभिम म्हणण्याआधी तुमच रगत तपासा

आता कुणी म्हणेल की मंगलप्रसंगी हे अभद्र आठवायचे कारणच काय? तर हे यासाठी आठवायचे की असल्या फुटीरतावाद्यांनी समाजात कितीही विष पेरले तरीसुद्धा समाजाच्या सज्जनशक्तीच्या एकतेतून सामाजिक समरसतेचे अमृतच निर्माण होणार आहे. माता रमाबाई आंबेडकर नगरात त्या मगंल समन्वयाची पहाट झाली आहे. ‘सब समाज को साथ लिएचे मंगलगान’ इथे उदयास आले आहे.
या जीर्णोद्धारादरम्यान मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. मनोज कोटक आणि सर्वांनाच आशीर्वचन देताना भिक्खू विरत्न महाथेरा म्हणतात-
‘ये केचि बुद्धं सरणं गतासे,
न ते गमिस्सन्ति अपायभूमिं।
पहाय मानुस देहं देवकार्य परिपूरेस्सन्ति।’
जो गुरू बुद्धाचा आश्रय घेतो, कधीही दुःखात पडत नाही, तो मानवी शरीराच्या नाशानंतर देवकयाला प्राप्त होतो. तसेच तथागतांच्या धम्माची सेवा करणार्‍या भिक्खूसंघाची काळजी घेणारे आणि धम्मासाठी प्रयत्नशील असणार्‍या या सर्वांचे सत्कार्य मंगलमयच होईल.

धम्मगुरूंचे हे आशीर्वचन आहे. या परिक्षेपात असे वाटते की माता रमाबाई नगरातल्या भारतीय भिक्खू संघाचे कार्य हे समाजामध्ये समरस समता आणण्यासाठीचे एक पुण्यशील धम्म्कार्यच आहे. नमो बुद्धाय!
या पुज्य भारतदेशामध्ये राहणारे आणि देशाविषयी निष्ठा असणारे आम्ही सगळे एक आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. आपण सगळे एक आहोत. भारतमातेची लेकरं आहोत. भारत विश्वगुरू आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करूया. माता रमाबाई आंबेडकर नगरीमध्ये भिक्खू निवास, श्रामणेर प्रशिक्षण केंद्र , विपश्यना केंद्र जीर्णोद्धार, भूमिपूजनातून एक मंगल राष्ट्रसंदेश दिला जात आहे की, फुटीरतावाद्यांनी कितीही फूट पाडली तरीसुद्धा आम्ही सगळे एक आहोत आणि राहणार. तसेच या पवित्र धम्मवास्तूच्या परिपूर्णतेसाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत
- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

बुद्धाने कधीही कुणाचा द्वेष केला नाही कुणाचा मत्सर केला नाही. हिंसा तर अमान्यच आहे. सगळ्यांची मंगल कामना भवतू सब्ब मंगलम हीच कामना घेऊन भिक्खू संघ काम करतो. बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून आम्ही धम्मनिष्ठ देशप्रेमी संस्कार बालकांवर करतो. बुद्धाची करूणा आणि समतातत्व समाजात रूजावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. आता वास्तूचा जीर्णोद्धार झाल्याने हेच काम आणखीन गतीने होईल.
- भिक्खू विरत्न महाथेरो

भारत हा विश्वगुरू आहे. जगाला शांतीचा मार्ग सांगणारा धम्म या भूमीतच जन्मला. जगाला आज युद्ध नको, तर बुद्ध हवा. बुद्धाच्या धम्माची शिकवण देशालाही तारणारी आहे. त्यामुळे भिक्खू संघाची सेवा आणि धम्माची सेवा हे महतकार्य आहे. त्यासाठी खारीचा वाटा उचलणे हे माझे भाग्य आहे.
- डॉ. वैभव देवगिरकर, अध्यक्ष, देव देश प्रतिष्ठान

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.