हरितगृह वायूचा उच्चांक

    12-Jun-2023   
Total Views |
Article On Greenhouse Gas

पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच सरकारी पातळीवर काम सुरू दिसते. यासाठी अनेक स्तरांवर कार्यरत संस्था असल्या तरी त्यांचे हे कार्य लोकसंख्या आणि समस्येच्या अनुषंगाने विचार केल्यास कसे तुटपुंजे पडते, याचा प्रत्यय सध्या काही घटनांतून येताना दिसतो. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ अर्थात हरितगृह वायूंमुळे वातावरणीय बदलावर होणारा परिणाम सर्वश्रुत आहेच. याच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन आणि त्याने गाठलेली दशकभरातील सर्वोच्च पातळी हे वृत्त अलीकडेच झळकले. सध्या पश्चिम किनारपट्टी नजीक घोंगावणारे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे ही त्याचेच एक उदाहरण.

हरितगृह वायू, त्यांचे वातावरण बदलावरील परिणाम याविषयी माहिती घेण्याआधी हे हरितगृह वायू म्हणजे काय, ते थोडक्यात समजून घेऊ. हरितगृह वायू हा वातावरणातील पाण्याची वाफ, कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड यांच्या पृथ्वीवर असलेल्या प्रमाणातून नैसर्गिकपणे तयार होत असतो. मात्र, नैसर्गिकपणे निर्माण होणारा हरितगृह वायू आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारा वायू, याचे परिणाम मात्र वेगवेगळे असतात. नैसर्गिक हरितगृह वायू हे सौरकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचू देतात. तसेच पृथ्वीवरुन उत्सर्जित होणारे ‘इन्फ्रारेड रेडिएशन’ शोषूनही घेतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उष्णता निर्माण होते. त्यामुळे हरितगृह वायूंचे अस्तित्वच नसते, तर पृथ्वीवरील तापमान संतुलित राखण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली नसती.

असे असले तरी अवाढव्य वाढलेली लोकसंख्या, जीवाश्म इंधनांचा बेसुमार वापर, वन्यजीव आणि पर्यावरणाला दुर्लक्षित करुन हाती घेतलेले विकासप्रकल्प, यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या पातळीवर वाढले आहे. या वायू उत्सर्जनामध्ये जीवाश्म इंधन, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप आणि शेती पशुधनांसह मोठ्या प्रमाणात मानववंशिक कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होते. पाण्याची वाफ, कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्राफ्लोरोकार्बन यांचा हरितगृह वायूमध्ये समावेश होतो. याचा परिणाम असा की, हरितगृह वायूच्या वाढलेल्या उत्सर्जनामुळे त्याचा ‘ग्लोबल वार्मिंग’ म्हणजेच जागतिक तापमान वाढीवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो.

२०१५ साली झालेल्या पॅरिस करारात २०३० पर्यंत १.५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाचा पृथ्वीचा पारा वाढणार नाही, यासाठी केलेला करार लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे ही वृत्तवाहिन्या आणि हवामान बदलासाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या अहवालातून समोर आली आहेत. पृथ्वीवरील तापमान वाढले, तर त्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर होईल, हे उघड आहेच. जैवविविधतेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकावर, त्यांच्या परिसंस्थांवर याचे गंभीर परिणाम आताही पाहायला मिळतात आणि ते भविष्यात आणखी झपाट्याने वाढतील. वन्यजीवांच्या सवयी, प्रजनन क्षमता आणि एकूणच जीवनचक्रावरही याचा विपरीत परिणाम होईल. त्याचबरोबर तापमानवाढ झाली, तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेले बर्फाळ प्रदेश, हिमनद्यादेखील वितळायला सुरुवात होईल. त्याचा परिणाम म्हणून मोठा जलप्रलय येऊन पृथ्वीवरील सजीवसृष्टीच नष्टप्राय होऊ शकते.

हरितगृह वायूंच्या दृष्टीने पाहता, हे दशक हवामान बदलाच्या बाबतीत अतिशय चिंताजनक आहे, असे मत जागतिक हवामान बदल प्रकल्पाचे समन्वयक मांडतात. हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोहोचले असले तरी उत्सर्जनाचा दर आणि वेग थोडा मंदावला आहे, असेही हा अहवाल सांगतात. दूषित वायू उत्सर्जनाचा हा वेग मंदावला ही समाधानकारक बाब असली, तरी त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी वैयक्तिक, संस्था, सामाजिक आणि सरकारी अशा सर्व पातळ्यांवरुन विचार होणं नितांत गरजेचं आहे. पृथ्वीवरील तापमान संतुलित राहिले तरच हे शक्य आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पृथ्वीवर असणार्‍या प्रत्येक सजीवाचा त्याच्या अस्तित्वावरील हक्क मान्य करुन त्यांचा आपण सन्मान ठेवायला हवा, हेच खरे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.