विरासतेच्या वैभवासाठी...

    12-Jun-2023   
Total Views |
Article On Dr Bhagyashree Pataskar

आपली बुद्धी, कौशल्य आणि ज्ञान देश-संस्कृती गौरवासाठीच आहे, असे मानणारी आणि त्यासाठीच आपले आयुष्यकार्य करणार्‍या डॉ. भाग्यश्री पाटसकर यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

आपली मंदिरं, शिल्प, पुरातन वास्तू यांच्याबद्दलची माहिती आणि ज्ञान हे सर्वांनाच प्राप्त व्हायला हवे. ही संधी केवळ ठरावीक गटापुरती मर्यादित न राहता, सर्वच भारतीयांना आपल्या अभिमानस्पद वारशाचे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळावे, असे कार्य होणे गरजेचे आहे.” ‘विरासत का वैभव’ या पुस्तकासंदर्भातील संवादरम्यान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, डॉ. भाग्यश्री पाटसकर यांना म्हणाले. त्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेले हे विधान म्हणजे डॉ. भाग्यश्री पाटसकर यांच्या आयुष्याचे ध्येयच बनले. त्याआधीही त्यांना वाटेच की, जर आपल्या गावातील ऐतिहासिक वैभवाची साक्ष प्रत्येकाला ज्ञात झाली, तर त्या गावाचा सर्वार्थाने विकास होईल. त्यातूनच डॉ. भाग्यश्री यांनी ‘विश्व संस्कृती सेतू’ या संस्थेची स्थापना केली असून त्या ‘इंडिकल्ट हेरीटेज’ या संस्थेच्या डायरेक्टर आहेत. या आयामातूनच भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा वारसा जपणार्‍या स्थळी पर्यटन विकसित करावे, हे त्यांचे लक्ष आहे.

हा नुसता विचार करतच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू येथे अशाप्रकारचे वारसा पर्यटनही सुरू केले. समाजाचाही या पर्यटनाला भरभरून प्रतिसाद आहे. डॉ. भाग्यश्री पाटसकर यांचे वैशिष्ट्य हेच म्हणावे लागेल की, पुरातत्व संशोधक म्हणून त्यांनी जे संशोधन केले, त्यातून ती साहित्य निर्मिती केली, त्यात एका भारतीयाचा अस्सल अंतरात्मा आहे. सत्य मांडतानाची त्रयस्तता असली तरीसुद्धा त्या त्रयस्ततेमध्ये मांडलेली वैभवशाली परंपरा ही आमचा वारसा आहे. अभिमानाने सांगण्याची एक लय आहे. पुरातत्वशास्त्र आणि भारतीय विद्या यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या भाग्यश्री यांनी ‘शिलालेख’ या विषयावर ‘एमफील’ केले, तर पुरातत्वशास्त्रामध्ये ‘पीएच.डी’ केली. इतिहासकारांमध्ये महिलांची स्थिती, मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, विदर्भातील मूर्ती, नाणी, शिलालेख, मूर्ती उत्खननाच्या पद्धती, अश्मयुगीन जीवन, तुलनात्मक पुरातत्व, वैदिक साहित्यामध्ये दिसणारे जीवन हे पुरातत्वीय पुराव्यामध्ये कशाप्रकारे दिसते, यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘भारतरत्न’ हे पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाला राज्य सरकारच्या बालसाहित्याचा ‘विक ओक’ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी आजपर्यंत ३८ पुस्तक लिहिली आहेत.

‘विद्या विनयेन शोभते’ या सद्वचनाचे मूर्तिमंत वास्तव म्हणजे डॉ. भाग्यश्री जयंत पाटसकर. त्यांचे पिता भालचंद्र काळे आणि माता शैलजा काळे. दोघेही साहित्यिक. भालचंद्र हे खासगी नोकरी करत, मात्र त्यांनी अर्थशास्त्रातून ‘पीएच.डी’ केलेली, तर शैलजा याही उच्चशिक्षित आणि त्या प्रकाशकही होत्या. मूळचे नागपूरचे हे काळे दाम्पत्य. अत्यंत सुसंस्कृत आणि रा. स्व.संघाच्या विचारांचे पाईक. भाग्यश्री या वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत नागपूरला होत्या. मात्र, त्यानंतर त्या मामा प्रा. गजानन पुरुषोत्तम जोशी यांच्याकडे मुंबईला आल्या. भाग्यश्री यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली ती दहावीच्या परीक्षेनंतर! दहावीच्या परीक्षेनंतर त्यांच्या आईने त्यांना नाशिक येथे विवेकानंद केंद्राच्या योगशिक्षा शिबिरामध्ये पाठवले. शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये दिलीप कुलकर्णी यांनी वेदांमधील विज्ञान आणि मृणालिनी देसाई यांचे वैदिक काळातील जीवन आणि साहित्यातली त्याची अनुभूती हे मार्गदर्शन, तर भाग्यश्री यांच्यासाठीचे नववैचारिक पर्वच होते. आपली वैदिक परंपरा इतकी समृद्ध इतकी समर्थ आहे, तर त्याचा अभ्यास आपण करायलाच हवा, असे भाग्यश्री यांना ठामपणे वाटू लागले.

त्यांचे सौभाग्य की, त्यांना प्रा. हरिहर ठोसर, डॉ. गो. ब देगलूरकर, डॉ. शोभना गोखले असे गुरूजन लाभले. भाग्यश्री या ‘विदर्भातील मूर्ती’ यावर संशोधन करतानाची एक आठवण. त्यांनी महतप्रयासाने आणि कष्टाने ‘विदर्भातील मूर्ती’ या विषयी संशोधन केले, त्याबद्दल लिहिले. अभिप्रायासाठी त्यांनी ते लिखाण डॉ. देगलूरकर यांना वाचायला दिले. यावर डॉ. देगलूरकर म्हणाले, ”हे वर्णन केलेले जसेच्या तसे लिहिणे हे काही संशोधन नसते, तर तू जे पाहिले आहेस ज्यावर लिहिले आहेस ते तसे का आहे? याची कारणमीमांसा तू केली नाहीस. यात काहीच संशोधनात्मक नाही.” शिक्षक डॉ. देगलूरकर यांच्या परखड समिक्षेनंतर भाग्यश्री यांच्या संशोधनाला खर्‍या संशोधकवृत्तीची किनार आली. काळापासून स्त्रियांवर अत्याचार झाले, अत्याचार होतात. ज्या काही सुधारणा झाल्या, त्या बाहेरच्या देशातूनच झाल्या. त्या तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी महिलेचा आणि तिच्यासोबतचे लोक सातत्याने या एकाच विषयावर बोलत असत.

मात्र, एकेदिवशी डॉ. भाग्यश्री पाटसकर यांनी वेदकाळापासून ते इंग्रजांपर्यंतच्या कालखंडातील मातृशक्तीच्या कर्तृत्वाची आणि ज्ञानविद्वतेची यादीच तिथे पुराव्यासकट मांडली. त्यानंतर पुणे तिथे काय उणे असलेल्या पुण्यनगरीतल्या त्या तथाकथित पुरोगामी निधर्मींनी डॉ. भाग्यश्री यांच्यासमोर असे बोलणेच टाळले. हे विस्ताराने का लिहिले? तर सत्य बोलण्यासाठी आणि ते चारचौघांमध्ये ठामपणे सिद्ध करण्यासाठी हिंमत लागते, ती डॉ. भाग्यश्री यांच्याकडे आहे. त्यांच्याही आयुष्यात काही कटु अनुभव आहेतच. राष्ट्रीय विचारांची पुरातत्वशास्त्र अभ्यासक म्हणून त्यांना गेले अनेक दशके डावललेच गेले, हे त्या मुळीच सांगत नाहीत. पण, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ‘संस्कार भारती’च्या आयामातून डॉ. भाग्यश्री कार्यरत आहेत. आपले संशोधन, आपले साहित्य हे देशाच्या वैभवशाली इतिहासाच्या संवर्धनाचे माध्यम समजणार्‍या या विदुषीस खरेच खूप शुभेच्छा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.