पर्यावरणप्रेमी भरत

    11-Jun-2023   
Total Views |
Article On Environmentalist Bharat Godambe

‘ग्रीन्स स्कूल प्रोग्राम’चे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून ओळख असलेले डोंबिवलीतील भरत गोडांबे हे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये निसर्गाविषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविषयी...

भरत हे सध्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये निसर्ग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना शेतीसह पर्यावरण संवर्धनाचे ते धडे देतात. इतकेच नाही तर या शाळेने आपल्या आवारातच जैवविविधता उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात २५० हून अधिक प्रजातींची झाडे पाहायला मिळतात. तसेच या उद्यानात ३५ हून अधिक प्रकारचे पक्षी, ५६ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. शाळांच्या आवारात पुष्कळ झाडे असल्याने तिथे गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते. शिवाय ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हार्यन्मेंट’ (सीएसई) या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ‘हरितशाळा अभियान’ (ग्रीन्स स्कूल प्रोग्राम) राबविला जातो. भारतातील टॉप ग्रीन्स स्कूलमध्ये सेक्रेड हार्ट शाळेचा नंबर लागतो. शाळेमध्ये किती हिरवळ आहे, यावर त्या शाळेचे ऑडिट केले जाते.

त्यामध्ये शाळा पाण्याचा वापर कसा करते, कचर्‍याचा वापर कशाप्रकारे करते, अशा सहा ते सात निष्कर्षांच्या आधारे ‘ग्रीन्स स्कूल’ निवडली जाते. त्यासाठी साधारणपणे पाच हजार शाळा सहभाग नोंदवितात. त्यापैकी ७० ते ७५ शाळांची निवड ‘ग्रीन्स स्कूल’मध्ये केली जाते. त्यात कल्याणमधील सेक्रेड हार्ट स्कूलचा नंबर लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना जंगलाची सफर घडविली जाते. वनस्पतीची ओळख करून दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करण्याचे काम भरत करीत आहेत. ‘सीएसई’कडून त्यांच्या कामासाठी भरत यांना गौरविण्यात आले आहे. भारतातील फक्त आठ राज्यांतील आठ शिक्षकांना हा बहुमान मिळाला आहे. त्यात महाराष्ट्रातील भरत गोडांबे यांचा समावेश आहे. त्यांना सलग दोन वर्षे या पुुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अशा या सेक्रेड हार्ट शाळेतील विद्यार्थ्यांना जंगलाची सफरही घडविली जाते. वनस्पतींची ओळख करून दिली जाते. एकूणच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करण्याचे काम भरत करीत आहेत.भरत यांचा जन्म मुरबाडचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतील नवीन मराठी शाळा, तर माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद शाळा गोपाळनगर येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी वझे-केळकर महाविद्यालयातून ‘बी.एस्सी’ ‘वनस्पतीशास्त्र’ विषयातून केले. भरत लहान असताना आपल्या मुरबाड या गावी जात होते. त्यावेळी आजीआजोबा सोबत जंगलात फिरायला जात असे. त्यातून पर्यावरण आणि निसर्गाविषयी आवड निर्माण झाली. भरत यांना निसर्गाविषयी आवड असल्याने पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पर्यावरण दक्षता मंडळाचे काम करण्यास सुरुवात केली. पर्यावरण दक्षता मंडळाचे मामणोली येथे ‘निसर्गायण’ केंद्र आहे. या केंद्रात प्रकल्प समन्वयक म्हणून भरत यांनी साडेसात वर्ष काम पाहिले आहे. त्यामध्ये देशी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली. शाळांमधून पर्यावरण शाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

त्यात जिल्हा परिषदेच्या १६ शाळांचा समावेश होता. शाळांमधून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव, दिवाळी आणि नैसर्गिक रंगाची होळी, रानभाज्यांचे प्रदर्शन असे उपक्रम राबविले जात होते. रानभाज्यांचे प्रदर्शन हा पर्यावरण दक्षता मंडळाने प्रथम उपक्रम राबविला आहे. त्यानंतर हा उपक्रम अनेक ठिकाणी राबविण्यात येऊ लागला. ‘पर्यावरण दक्षता मंडळा’च्या माध्यमातून प्रथम विद्यार्थी आणि त्यानंतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती आणि गो आधारित शेती याविषयी मार्गदर्शन केले. ‘झिरो बजेट फार्मिंग’ ही पद्धत ‘पद्मश्री’ सुभाष पाळेकर यांनी विकसित केलेली पद्धती आहे. या पद्धतीत गोमूत्र यांसारख्या गोष्टींचा वापर केला जात असल्याने ही ‘झिरो बजेट फार्मिंग’ असते. या पद्धतीमुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा झाला.

बेरोजगारांना अळंबी प्रशिक्षण दिले. स्थानिक महिला बचतगटांना ही अळंबी प्रशिक्षण दिले आहे. शाळेतील प्रत्येक विषयांच्या शिक्षकांना त्या विषयांतून पर्यावरण शिक्षण विद्यार्थ्यांना कसे द्यायचे, याविषयी भरत मार्गदर्शन करीत असे. भरत हे ‘पर्यावरण दक्षता मंडळा’च्या माध्यमातून जल, जंगल, जमीन आणि ऊर्जा या चार गोष्टीवर भर देत काम करीत होते. ‘पर्यावरण दक्षता मंडळा’चे काम करत असताना भरत यांनी बिर्ला महाविद्यालयातून ‘एम. एस्सी’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ‘पीएच.डी’ संशोधन सुरू केले. याचदरम्यान त्यांनी सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये २०१७ पासून नोकरी करण्यास सुरुवात केली. सध्या ते विद्यार्थ्यांना ‘शेती’ हा विषय शिकवत आहे.

भरत यांच्या आई प्रमिला गोडांबे यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्ता आहेत. त्यामुळे भरत हेदेखील भारतीय मजदूर संघाशी जोडले गेले. ते भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्हा चिटणीस पदावर कार्यरत आहेत. मजदूर संघाअंतर्गत असलेल्या ‘घरेलु कामगार संघा’अंतर्गत त्यांनी घरेलु कामगारांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये ७५० महिलांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे घरेलु कामगार पाण्याची बचत करणे, वीज वाचविणे या गोष्टी दैनंदिन काम करत असताना करू लागला. त्यामुळे मालक वर्ग खूश झाला. या गोष्टीची महाराष्ट्र शासनाने दखल घेत भरत यांना २०१३ सालचा ‘सृष्टीमित्र’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. भरत हे सध्या पर्यावरणाशी संबंधित सहा ते सात संस्थांसोबत काम करत आहे. अशा या निसर्गप्रेमीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडूनहार्दिक शुभेच्छा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.