आणखी किती काळ सहन करायचे?

    10-Jun-2023   
Total Views |
Attacked On vimukta jati and nomadic tribes teenagers

भटके-विमुक्त वर्गवारी असलेल्या शिकलगरे समाजाच्या तीन किशोरवयीन मुलांवर समुदायाने नुकताच हल्ला केला. त्यात किरपाल सिंग भोंड या १४ वर्षांच्या बालकाची हत्या करण्यात आली. या मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे की, मारणार्‍यांच्या धर्मात डुक्कर हराम आहे आणि आम्ही डुक्कर पाळतो म्हणून आमच्या मुलांवर हल्ला करण्यात आला. गावातील प्रमुख संघटनानीही अशाच आशयाचे निवेदन जारी केले आहे. खरोखर भयंकर! नि:शब्द आहे... या पार्श्वभूमीवर त्या घटनेचा आणि एकंदर शिकलगरे समाजाचा मागोवा घेणारा हा लेख...

किरपाल सिंग भोंड, गोरसिंग दुधानी आणि अरुणसिंग टाक या तीन मुलांची गावात धिंड काढण्यात आली. ते शिकलगरे म्हणजे शीख समाजाचे होते. त्यांची पगडी अपमानास्पदरित्या काढून फेकण्यात आली. त्यांना मारहाण करत गावभर फिरवले गेले. ती मुलं गयावया करत होती, हात जोडत होती, माफी मागत होती. आपला गुन्हा काय हेच मुळी त्यांना समजत नव्हते. पण, त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच किरपाल सिंग भोंड या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. मूलं मेली का जीवंत आहेत, हे पाहण्यासाठी त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकण्यात आले. छे!! लिहितानाही डोळ्यात पाणी आहे आणि मनात अथांग वेदना आहे. कसलेल्या आणि निर्घृण-निबर गुन्हेगारासोबतही असे होऊ नये इतके भयंकर या तीन युवकांसोबत झाले.

या गुन्ह्यासाठी सय्यद एजाज, सय्यद इब्राहिम, सय्यद अकरम, सय्यद अगामिया, सय्यद तोहिद सय्यद संमदर, सय्यद फजलू सय्यद अली, शेख जावेद, शेख पिरमिया, पाशा खान उर्फ बाबाखान. अफजल खान या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २७ मे रोजी ही परभणी येथे घडलेली घटना. भटके-विमुक्त विकास परिषद संघटनेचे कार्यकर्ते या मुलांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांच्या पालकांचे म्हणणे होते की, ”डुक्कर पकडायचे आहेत म्हणून मुलांना पहाटे फोन आला. मुलं उखळद गावी गेली. पण, डुक्करं भेटली नाहीत म्हणून ते परभणी वाटे परतत होते. तेव्हा त्यांना बाईकवर जाणार्‍या लोकांनी अडवले. गावातल्या त्यांच्या धार्मिक स्थळावरच्या लाऊडस्पिकरवरून अनाऊन्समेट केली गेली की, गावात चोर आले. सगळे गाव एकत्र आले. गावातला माजी सरपंच अक्रम पटेल म्हणत होता ’मारून टाका, बाकी मी सगळ बघतो.’ या पालकांचे म्हणणे आहे की, ”आमच्या मुलांना मारणार्‍यांचे म्हणणे होते की, त्यांच्या धर्मात डुक्कर हराम आहे. मुलं डुक्कर पकडण्यासाठी आली होती. त्यामुळे या मुलांबद्दल त्यांना द्वेष होता.” भयंकर, क्रूर पद्धतीने हकनाक मारल्या गेलेल्या मुलाचे ते आईवडील, त्यांना काय वाटत असेल, शब्दांत सांगू शकत नाही...

खरंच डुक्कर पाळणं आणि त्यासंदर्भात काम केले म्हणून इतका द्वेष? आणि ज्या धार्मिक स्थळाचा वापर धार्मिक कार्यासाठी करायचा ज्या लाऊडस्पिकरचा उपयोग पाच वेळच्या प्रार्थनेसाठी करायचा की, असा कुणाला मारण्यासाठी या म्हणून आमंत्रण देण्यासाठी करायचा? या घटनेचा मागोवा घेताना काश्मीरमधून ८०-९०च्या दशकात हिंदूंचे जबरदस्तीने शिरकाण झाले आणि पलायन झाले, तेव्हाही अशाच प्रकारे लाऊडस्पीकरवरून ‘हिंदूंनो, तुमच्या स्त्रिया आणि संपत्ती सोडून इथून मुकाट चालते व्हा,’ अशा घोषणा झाल्या होत्या, असे जीवित असलेले काश्मिरी हिंदू आजही सांगतात, हे आठवल्याशिवाय राहत नाही. अर्थात, धार्मिक स्थळावरचा लाऊडस्पीकर आणि त्याचा उपयोग याबद्दल महाराष्ट्रात सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेेत. धार्मिक स्थळावरचे लाऊडस्पीकर हा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल. आता यावर लिहिणे विषयांतर होईल.

सवा लाख से एक लड़ाऊं,
चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं,
तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं!!
असे गुरू गोविंदसिंगचे वचन. त्यांना मानणार्‍या आणि त्यांचा वारसा सांगणार्‍या शिकलगरे समाजाच्या किशोरवयीन मुलाची आज हत्या झाली. दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शीख आणि मुस्लीम दोन्ही अल्पसंख्याक समाज वर्गीकृत आहेत. नुकेतच शरद पवार यांनी ख्रिस्ती आणि मुसलमान समाजाबद्दल भयंकर चिंता व्यक्त केली. पण, या दोन्ही समाजासारखेच अल्पसंख्याक समाजाचे घटक असलेल्या या शिकलगरे समाजाच्या किशोरवयीन मुलाच्या हत्येबद्दल त्यांनीच काय, तथाकथित पुरोगामी निधर्मी आणि मुख्यत: ‘डफली गँग’ने कुठे काय निषेध किंवा दुख: व्यक्त केलेले दिसले नाही. कदचित मत टक्केवारीच्या घोडेबाजारात शिकलगरे समाजाची कमी लोकसंख्या कामाची वाटत नसेल त्यांना!

असो. काही वर्षांपूर्वी राईनपाड्यामध्ये अशीच घटना घडली होती, त्यावेळी डवरी गोसावी समाजाच्या त्या पीडित कुटुंबांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रशासनाने न्याय मिळवून देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलली होती. परभणीमध्ये क्रूरपणे मारल्या गेलेल्या किरपालसिंग भोंड आणि जखमी झालेले गोरसिंग दुधानी आणि अरूणसिंग टाक यांनाही सध्याचे भाजप- शिवसेना सरकार नक्कीच न्याय मिळवून देईल, अशी खात्री आहे. नांदेड गुरूद्वारा शीख बोर्डाने या घटनेतील पीडितांना आर्थिक मदत केली असून गोरसिंग दुधानी आणि अरूणसिंग टाक या युवकांच्या उपचाराचा सगळा खर्च सध्या हे बोर्ड करत आहे. सरकार, प्रशासन, कायदा, धर्मसंस्था त्यांची त्यांची कामे करतीलच, पण समाज म्हणून आपण काय करणार आहोत? गैरसमज, पूर्वग्रह टाळून आपण आपल्याच बांधवांना कधी आपल्यात सामावून घेणार आहोत? भटके-विमुक्त समाजाकडे बघण्याचा प्रस्थापित समाजाचा दृष्टिकोन कधी बदलेल?

खरेतर इतिहासाची पाने उलटली, तर जाणवेल की, अत्यंत शूर, धाडसी आणि धर्मप्रिय असणाार्‍या या भटके-विमुक्त समाजाला घाबरूनच इंग्रजांनी त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का-ठसा उमटवला. देश स्वतंत्र झाला. कालांतराने कायद्यांतून हा ठसा पुसला गेला. पण, समाजाच्या मानसिकतेचे काय? आजही गावखेड्यांत काही गुन्हा झाला आणि चुकूनमाकून भटके-विमुक्त समाजापैकी एखादा समाज त्या घटनास्थळी आजूबाजूला असेल, तर लगेच त्यांच्यावरच संशय घेण्याच्या घटना घडताना दिसतात. भटके-विमुक्तपणाचे जीवन जगणारा समाज त्याचे जगणे म्हणजे ‘जावे त्यांच्या वंशा.’ घर तर सोडाच, गावही नाही अशी परिस्थिती. परभणीच्या घटनेमध्ये अत्याचार पीडित शिकलगरे समाजाचे वास्तवही हेच. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला शिकलगरे समाज कोण आहे? तर, ‘वाहे गुरूजी दा खालसा वाहे गुरूजी दी फतेह’ म्हणत या समाजातील प्रत्येक जण नव्या कामाची सुरुवात करतो. हत्यार बनवणं हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय. महाराष्ट्रातला शिकलगार समाज आपला वारसा सांगताना अभिमानाने सांगतो की ”आम्ही शीखधर्मीय आहोत.

गुरू गोविंद सिंग बिहार, पटना असं करत नांदेडला आले. त्यांच्यासोबत आमचे पूर्वज महाराष्ट्रात आले. त्यावेळी आमच्या गुरुंची हत्यारं बनवणं, हत्यारांची निगा राखणं अशी कामं आम्ही करायचो. तलवारींची साफसफाई करणं याला पंजाबीमध्ये ‘शिकल’ म्हणतात. आम्ही ते काम करायचो म्हणून आम्ही शिकलगरे.” मग आज शिकलगरे समाजाची परिस्थिती अशी का? देशाच्या स्वातंत्र्यानंतर शस्त्र बाळगण्यावर कायदेशीर बंदी आली. त्यामुळे शस्त्र बनवणार्‍या या समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आली. पण, हातात धातूपासून विविध वस्तू बनवण्याची कला होतीच. शस्त्र हाताळण्याचीही कला होती. त्यामुळे पुढे शेतात किवां गाववस्तीमध्ये हिंस्र पशू नासधुस करू लागले की त्यांची शिकार करण्यासाठी गाववाले त्यातही शेतकरी वर्ग शिकलगार समाजाला बोलवू लागले. डुक्कर ज्याला ‘वराह’ असेही म्हणतात, याची शिकार करणेही ओघाने आलेच. शिकार करता करताच या समाजातले बहुसंख्य लोक मग वराहपालनही करू लागले. शस्त्र बनवण्यात पारंगत असलेल्या या समाजाने आपला पारंपरिक व्यवसाय बदलला. मात्र, परभणीमध्ये घडलेल्या घटनेने या समाजाचे वास्तव जगासमोर आले आहे. वराह म्हणजे डुक्कर पाळतात म्हणून द्वेषाचे धनी झालेले ते शिकलगरे, ते शीख बांधव त्यांच्या सोबत आपण आज ठामपणे उभे राहूया. धर्माच्या नावाने ‘हराम-बिराम’ म्हणत अधर्म, अत्याचार करणार्‍यांविरोधातही सगळ्या सज्जनशक्तीने एकत्र येण्याची आता गरज आहे. परभणीमधल्या या अमानवी घटनेचा तीव्र निषेध! आणखी आता किती काळ सहन करायचे?

प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे!

प्रसारमाध्यमांवर ही घटना समजली तेव्हा तत्काळ भटके-विमुक्त विकास परिषदेचे शिष्टमंडळ पीडित कुटुंबाच्या घरी गेले. नरसिंग झरे - भटके-विमुक्त विकास परिषद प्रांत कार्यवाह, गोंविद भंडे - परभणी जिल्हा संयोजक आणि विवेक विचार मंचचे सचिन रासवे आम्ही सगळे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटलो. आमची मागणी आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुटुंबाला तत्काळ सहकार्य मिळण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाला आम्ही निवेदन दिले आहे. बालहक्क आयोगालाही निवेदन दिले आहे. (शरद दिवे, भटके-विमुक्त विकास परिषद, समन्वयक लातूर विभाग)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.