गोष्ट ‘मुंबईकर वाघोबा’ची...

    08-May-2023   
Total Views |


leopard & cub



बिबट्या हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये आढळणारा परंतु या जातींमधील आकाराने सर्वांत लहान असणारा असा प्राणी आहे. बिबट्याला स्थानिक किंवा ग्रामीण भाषेत बिबट, बिबळ्या, वाघरु अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. बिबट्या हा प्रामुख्याने जंगली अधिवासात राहणारा प्राणी असला, तरी मार्जार कुळातील इतर प्राण्यांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहजपणे स्वतःला सामावून घेतो. त्यामुळेच, बिबटे गावांशेजारी, मानवी वस्तीच्या जवळ, एवढेच काय शहरांजवळ ही आढळून येतात.


collared leopard


महाराष्ट्र वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' यांनी एकत्र येऊन मुंबईतील बिबट्यांना रेडियो कॉलर लावण्याचे निश्चीत केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे १०४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले विविध प्राण्यांचा अधिवास असणारे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. मुंबईत वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानामध्ये इतर प्राण्यांबरोबरच बिबट्यांचाही अधिवास मोठ्या संख्येने आढळतो. १०४ चौरस किलोमीटरच्या या क्षेत्रात जवळपास ४५ बिबट्यांचा अधिवास आहे. बिबट्या प्रामुख्याने चितळ, सांबर, भेकर, वानर यांची शिकार करतो. मात्र, नैसर्गिक अधिवासात आढळणाऱ्या भक्ष्याची शिकार करण्यासाठी बिबट्याला पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक कष्ट घ्यावे लागतात. म्हणूनच मोठ्या संख्येने उद्यानात असलेले बिबटे आपले खाद्य शोधण्यासाठी अनेकदा मानवीवस्तीजवळ आलेले दिसतात. यामुळे मुंबईतील मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटना समोर येत होत्या. म्हणूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागात अधिवास करणाऱ्या बिबट्यांचा अभ्यास करणे हे उद्दीष्ट समोर ठेऊन बिबट्याला रेडिओ कॉलर लावण्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्र वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण केलेल्या या प्रकल्पाचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या प्रकल्पात प्रामुख्याने सीमावर्ती भागात राहणाऱ्या पाच बिबट्यांना रेडिओ कॉलर लावून दोन वर्षांच्या कालावधीसाठी अभ्यास करण्यात आला.



महाराष्ट्रातील पहिला कॉलर टॅग केलेला बिबट्या

‘वाईल्डलाईफ कॉन्झवरवेशन सोसायटी-इंडिया’च्या कंट्री हेड डॉ. विद्या अत्रेय यांनी २००९ साली एका बिबट्याला कॉलर टॅग केले होते. कॉलर टॅग केलेला हा बिबट्या वयाने बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे आणि त्यांच्या आजोबांची आठवण करुन दिल्यामुळे विद्या यांनी त्याचे ‘आजोबा’ असे नामकरण केले. पुढे या बिबट्याला माळशेज घाटामध्ये सोडुन दिले गेले. मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील असलेला हा बिबट्या २५ दिवसांत १२९ किलोमिटरचा प्रवास करत पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे कुच करत होता. २०११ मध्ये या बिबट्याला ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर वाहनाची धडक लागली. रस्त्याचा कडेला विव्हळत पडलेल्या आजोबाला एका गृहस्थांनी आपल्या गाडीतुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणतानाच वाटेत त्याचा मृत्यु झाला.



Ajoba


'मुंबईकर वाघोबा' या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या पाच बिबट्यांचे 'रेडिओ टेलीमेट्री'द्वारे सर्वेक्षण केले गेले. 'सावित्री', 'क्रांती', 'तुळशी' या तीन माद्या आणि 'महाराजा', 'जीवन' या दोन नर बिबट्यांना या प्रकल्पामध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आले. सीमावर्ती भागात राहणाऱ्या या बिबट्यांचे अधिवास क्षेत्र, खाण्याच्या पद्धती, मानवी हल्ल्यांची संख्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या प्रकल्पाअंतर्गत संशोधकांना करता आला. ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला होता. बुधवार, ३ मे रोजी पार पडलेल्या जागतिक बिबट दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचा अहवाल जाहीर करण्यात आला.


रेडिओ कॉलरिंग म्हणजे काय?

बिबट्यासारख्या रहस्यमय प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठीचे रेडिओ कॉलरिंग हे एक साधन आहे. यात त्या प्राण्याला एक ‘जीपीएस ट्रान्समीटर’युक्त कॉलर लावली जाते. ज्यामुळे आपल्याला त्या प्राण्याच्या हालचाली समजुन घेता येतात. या कॉलरची बॅटरी जितके दिवस चालते तितके दिवस ही कॉलर काम करते. या कॉलरच्या बॅटरीमध्ये जवळपास सहा हजार स्थानांची नोंद घेण्याची क्षमता आहे.


रेडिओ कॉलर कशाप्रकारे काम करते?

बिबट्याच्या मानेवर लावलेल्या कॉलर टॅगमध्ये एक ‘जीपीएस ट्रान्समीटर’ असते. जे विशिष्ट वेळी तो प्राणी नेमका कुठे आहे याची अतिशय सुचक माहिती देते. त्या प्राण्याच्या स्थानाविषयीची ही माहिती सीम किंवा सॅटलाईटद्वारे संशोधकांच्या सर्व्हरवर पाठविली जाते. परंतु ती ताबडतोब उपलब्ध होत नाही, तर काही तास उशिराने मिळते. असे त्या प्राण्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरी वाचवण्यासाठी केले जाते. शिवाय जेव्हा तो प्राणी एखाद्या गुहेत असतो तेव्हा ही माहिती मिळणे पुर्णपणे थांबु शकते किंवा ती मिळण्यास खूप उशीर लागू शकतो. या कॉलरमध्ये ‘ड्रॉप ऑफ तंत्र’ ही आहे ज्यामुळे कॉलर ही प्राण्याच्या शरीरापासून दुरुनच वेगळी केली जाऊ शकते.

बिबट्याला कॉलर कशाप्रकारे लावले जाते?

कॉलर टॅग लावण्यासाठी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले जाते. त्याला भूलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले जाते. मग त्याच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलर लावली जाते. यानंतर त्यांच्या शरिराचे तापमान इत्यादी गोष्टींची तपासणी करुन त्याला पुन्हा पिंजऱ्यात ठेवले जाते. साधारणपणे ५-६ तासांनी औषधाचा प्रभाव उतरल्यावर त्याला सोडून दिले जाते.


leopard


बिबट्या हा रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात कार्यरत असतो, म्हणजेच निशाचर प्राणी म्हणून ओळखला जातो. असे असले तरी, त्याला ठोस पुरावे उपलब्ध नव्हते. या प्रकल्पामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासामुळे या समजुतीला एक ठोस पुरावा मिळाला. वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावल्यामुळे तसेच जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा असल्यामुळे हे बिबटे सतत संशोधकांच्या नजरेत राहिले. दिवसा आपल्या गुहेत किंवा इतर ठिकाणी निद्रिस्त होणारा बिबट रात्रीच्या वेळी शिकारीसाठी वा गस्त घालण्यासाठी बाहेर पडत असे. दोन ते तीन दिवसांतून एकदाच शिकार करणाऱ्या या प्राण्याचे मुख्य भक्ष्यही परिसरातील पाळीव जनावरे असतात. त्यातही पाळीव आणि फिरस्ते कुत्रे हे शिकारीला सोपे असल्यामुळे बिबट्यांचे मुख्य भक्ष्य असल्याचे या अभ्यासातून अनेकदा उघड झाले आहे.



leopard

या अहवालामध्ये टॅग केलेल्या सावित्री, क्रांती, तुळशी या तीन माद्यांपैकी दोन माद्यांनी कॉलर टॅग केल्यानंतर पिल्लांना जन्म दिल्याचे ही समजले आहे. त्यामुळे मानेवर असलेल्या कॉलरचा बिबट्याला त्रास होऊन प्रजननामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची शक्यताही दूर झाली आहे. मानवी वस्तीच्या अत्यंत जवळ अधिवास असतानाही सहजासहजी न दिसणारा हा प्राणी मानवापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करतो, असे संशोधक सांगतात. हा अभ्यास वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या मानव-प्राणी सहसंबंध प्रकल्पाचे प्रमुख निकीत सुर्वे आणि त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पुर्ण केला. 



leopard
मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे आपल्याच हातात

सीमावर्ती भागात असणाऱ्या बिबट्यांना पाळीव तसेच भटके कुत्रे हे सोपे भक्ष्य आहे. कचऱ्याचे ढीग असणाऱ्या ठिकाणी भटके कुत्रे जास्त असतात. यांची शिकार करण्यासाठीच बिबटे मानवी वस्तीजवळ येतात. त्यामुळेच कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर कुत्र्यांचे प्रमाण कमी होईल आणि सहाजिकच बिबट्यांचे हल्ले थांबायला मदत होईल, असे या अहवालातुन स्पष्ट होते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.