बँकेच्या शिपायाचा विश्वविक्रम...

पोटावरून ३७७ वेळा दुचाकी नेल्याची ‘गिनिज बुका’त नोंद

    07-May-2023
Total Views |
Pandit Dhaygude World Records

ठाणे : सांगलीच्या अवलियाने ठाण्यात विश्वविक्रम केला आहे. पंडित तुकाराम धायगुडे (४३) असे त्यांचे नाव असून ते ठाणे जिल्हा बँकेत शिपाई आहेत. त्यांनी २५७ किलो वजनाच्या सहा दुचाकी ३७७ वेळा चक्क पोटावरून नेण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीही १२२ वेळा पोटावरून दुचाकी नेऊन धायगुडे यांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला होता. रविवारी ठाणे पूर्वेकडील धर्मवीर क्रीडासंकुलात धायगुडे यांनी आपलाच हा विश्वविक्रम मोडून नवा विक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमी कामगिरीमुळे धायगुडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ठाणे जिल्हा बँकेत शिपाईपदी कार्यरत असलेले धायगुडे यांनी कराटेत ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवला आहे. काही तरी जगावेगळे करण्याच्या ध्यासातून धायगुडे २००९ पासून तयारी करीत होते. याआधी २०१६ साली त्यांनी २५७ किलो वजनाच्या दोन दुचाकी लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून नेत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. रविवारी त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत २५७ किलो वजनाच्या सहा दुचाकी लागोपाठ ३७७ वेळा आपल्या पोटावरून नेऊन विश्वविक्रम केला. खरं तर, १५० वेळा या बाईक पोटावरून जाण्याची तयारी धायगुडे यांनी केली होती. पण, त्रिशतक होता-होता सहा दुचाकी त्यांनी तब्बल ३७७ वेळा त्यांच्या पोटावरून नेल्या.
 

Pandit Dhaygude World Records

३७७व्या खेपेला ‘इंडियाज स्कॉट’ची तब्बल ४५० किलो वजनाची गाडी धायगुडेंच्या अंगावरून गेली आणि एकच जल्लोष झाला. प्रारंभी धायगुडे यांनी एका मिनिटात १०५ साईड सीटअप्सचा देखील विश्वविक्रम केला. यापूर्वीचा रेकॉर्ड ६५ सीटअपस्चा होता. या कार्यक्रमाला आ. संजय केळकर, माजी आ. रवींद्र फाटक, ‘आयआरएस’ नितीन वाघमोडे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, राष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, कस्टम ऑफिसर संदीप भोसले, ज्येष्ठ वकील नानासाहेब मोटे, ठाणे जिल्हा बँकेचे संचालक बाबाजी पाटील, प्राध्यापक दत्ताजी डांगे, डॉ. मनोज माने, डॉ. अरुण गावडे, प्रशिक्षक गणेश मरगजे, मणी गौडा, ‘धनगर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष दीपक कुरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताचे नाव ‘गिनीज बुक’मध्ये

देशाचं नाव ‘गिनीज बुक’मध्ये न्यायचं स्वप्न होतं. २००९ पासून त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने भरून पावलो असे म्हणत या विश्वविक्रमासाठी मदत करणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले. इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही, अशा भावना धायगुडे यांनी व्यक्त केल्या.