The Kerala Story ‘लव्ह जिहाद’ ते प्रत्यक्ष ‘जिहाद’पर्यंतचा

    06-May-2023   
Total Views |
The Kerala Story From 'Love Jihad' to Actual 'Jihad'

नुकताच ‘द केरला स्टेारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा, वादविवाद देशभर रंगलेले दिसतात. पण, या चित्रपटात जे काही निर्माता-दिग्दर्शकांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी स्वत: आजवर जे काही पाहिले, अनुभवले, त्याचा परामर्श या लेखात घेतला आहे. अशी ही ‘द केरला स्टेारी’ केवळ दुर्भाग्यपूर्ण ठरलेल्या एकट्या केरळची ‘स्टोरी’ नाही, तर ती आज देशभरातील वस्तीपातळीवरची ‘स्टोरी’ आहे...

"इस दुनिया को सिर्फ अल्ला चलाता हैं, ओनली अल्ला....” ‘द केरला स्टेारी’ चित्रपटामध्ये असिफा नावाची व्यक्तिरेखा वरील वाक्य तिच्या सहविद्यार्थिनी शालिनी, गितांजली आणि निमाला सांगते. शालिनी एक सामान्य घरची हिंदू मुलगी, तर गितांजलीचे वडील कम्युनिस्ट विचारसरणीचे. ती देवधर्म वगैरे काहीही मानत नसते. मात्र, जन्माने हिंदूच आहे, तर निमा ही धार्मिक ख्रिश्चन. पुढे असिफा तिच्या हिंदू आणि ख्रिस्ती रूममेट्सना विचारते, “तुमचा देव कोणता?” यावर अतिशय निरागस असलेली आणि टिपीकल केरळी हिंदू पद्धतीची वेशभूषा- केशभूषा असलेली शालिनी म्हणते, ”आय थिंक शिवा इज बिग!” यावर त्या असिफाचे उत्तर- ”कौनसे गॉड को मानते हो, वो गॉड जो अपने वाईफ के मरने पर कॉमन मॅन की तरह रोता हो, वो गॉड कैसे हो सकत हैं?” पुढे असिफाच्या या विधानावर शालिनी गप्प होते. तिच्याकडे तर या प्रश्नाचे उत्तरच नसते. कारण, तिला यासंदर्भातल्या धार्मिक संकल्पना आणि घटना याबद्दल काहीएक माहिती नसते. शेवटी चर्चा सुरू राहते की, हिंदू देवीदेवता कशा शक्तिहीन आहेत. हे म्हणणे शब्दांतून सिद्ध करण्यात असिफा यशस्वी होते. चित्रपटातले हे दृश्य पाहताना शालिनीसारख्या कितीतरी निरागस किशोरवयीन मुली आठवल्या, ज्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या आणि आयुष्य नरकवासात घालवून बसल्या. यांच्या आयुष्यातही असिफा नावाची कुणी ना कुणी व्यक्ती कधी ना कधी अस्तित्वात होतीच.

कधी मित्र, कधी मैत्रिण, कधी वरिष्ठ, तर कधी शेजार्‍याच्या रूपात. (विनाअनुभवशिवाय मी लिहित नाही!) असो. तर ‘द केरला स्टेारी’ चित्रपटातील असिफा ही खोटी वाटत नाही, ती तितकीच खरी वाटते, जितकी ‘द काश्मीर फाईल्स’मधली ‘सरकार उनकी हैं, मगर प्रशासन अपना हैं’ म्हणणाारी दहशतवादीसमर्थक प्राध्यापक खरी वाटते. ही असिफा गैरमुस्लीम मुलींना फसवून त्यांना सीरियामध्ये ‘इसिस’च्या दहशतवादी कृत्यांत भरती करण्यासाठी पाठवण्याचे काम करताना दिसते. शालिनी, गितांजली आणि निमा या तिन्ही मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना सीरियाला पाठवण्यासाठी असिफा काही मुस्लीम पुरूषांची मदत घेते. त्यांना आदेश देणारे काही धर्मांध लोकही आहेत. हा धर्मांध म्हणतो, “तुमच्याकडून त्या मुली कशा फसवल्या जात नाहीत? उन्हे करिब लाओ, खानदान से जुदा करावो, जिस्मानी रिश्ते बनाओ. जरूरत पडे तो उन्हे प्रेग्नंट करो!” इतकेच काय तर दहशतवादी संघटनांकडून सूचित केल्याप्रमाणे अमली पदार्थांचा वापर करण्याचाही आग्रह करतो. हे सगळे पाहताना दुर्देवी श्रद्धा वालकर आठवली. वसईच्या मराठमोळ्या श्रद्धाला म्हणे अमली पदार्थांचे व्यसन होते. आईबाबांना न जुमानता ती त्या आफताबबरोबर दिल्लीला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहायला गेली होती. अशाच संबंधातून मुलींना ‘ब्लॅकमेक’ करण्याच्याही घटना सर्रास घडल्या आहेत.

या चित्रपटात पुढे दोन हिंदू आणि एक ख्रिश्चन मुलीला इस्लामिक पद्धतीची वेशभूषा करण्यास कसे भाग पाडले जाते, याचेही चित्रण आहे. या तीन मुली मॉलमध्ये जातात. तिथे हिजाब-बुरखा परिधान केलेल्या असंख्य मुलीमहिला असतात. मात्र, असिफा ठरवून काही गुंडांना तिथे पाठवते. ते या तीन मुलींची छेड काढत, त्यांचे कपडे फाडतात. त्यावेळी असिफा त्यांना सांगते की, ”तिथे इतक्या मुली होत्या, पण तुमच्यासोबतच असे का झाले? कारण, तुम्ही हिजाब घातला नव्हता. हिजाब पेहने लडकी पर नाही कभी रेप होता हैं, नाही उन्हे कोई छेडता हैं, बिकॉज अल्ला ऑलवेज प्रोटेक्ट हर!” या तीन्ही मुली मनाने इतक्या खचलेल्या असतात की, कुणी आपली छेड काढू नये म्हणून त्या चक्क हिजाब घालू लागतात. पुढे असिफा जाळे विणत विणत रमिझशी शालिनीचे आणि गितांजलीचे अब्दुलशी प्रेम जुळवून देते. हे दोघेही जण या मुलींशी शारीरीक संबंध निर्माण करतात. यामध्ये शालिनी नंतर गरोदर राहते. मात्र, रमिझ सांगतो की, ”माझ्या घरी हिंदू मुलगी सून म्हणून चालणार नाही.” शालिनी रमिझच्या प्रेमात अक्षरश: वेडी झालेली असते. शालिनी धर्मांतर करते. मात्र, काही कारणास्तव रमिझ अम्मीसोबत मालदीवला जातो, असे सांगत तो तिथून कुठेतरी कायमचा पसार होतो. गरोदर शालिनी मग अधिकच हतबल होते. त्यावेळी चित्रपटातला धर्मांध मौलवी तिला सांगतो की, “तू काफीर आहेस. हा तुझा पहिला गुन्हा. तू अमली पदार्थांचे व्यसन करते, हा तुझा दुसरा गुन्हा आणि लग्नापूर्वी तू शरीरसंबंध ठेवलेस, हा तिसरा गुन्हा आणि सगळ्यात महत्त्वाचे, निकाहाआधी तू गरोदर राहिलीस, हा तर सर्वांत मोठा गुन्हा.


 आता अल्ला तुला माफ करणार नाही.” मौलवीने सांगितल्याप्रमाणे आपण मोठे पाप केले, आता आपल्याला ‘दोजख’ मिळणार, या कल्पनेने शालिनी घाबरते. मग तो धर्मांध तिला हळूच सांगतो की, “तुझ्यासकट तुझ्या गर्भातल्या बाळाला स्वीकारणारा एक जण आहे. तो खूप चांगला आहे.” कुठेच आसरा नसल्याने शालिनी त्याच्यासोबत निकाह करते. तिच्यासमोर तो सीरिया देशाचे चित्र रंगवतो. तिथे कसे सगळे चांगले-सुखनैव आहे, आपण तिकडे गेल्यावर कसे चांगले होईल वगैरे वगैरे. शालिनीही मग त्याच्यासोबत सीरियाला जायला तयार होते.इकडे गितांजली मुस्लीम धर्म स्वीकारण्याच्या वाटेवर असते आणि ती मुस्लीम धर्मांतरित होणार, म्हणून तिचे वडील चिंतेने आजारी पडतात. त्यावेळी तिची आई गितांजलीला म्हणते, “तू एकदा घरी ये, बाबाला भेट. आमची सगळी संपत्ती तुझीच आहे.” पण, असिफा तिला सांगते, “काफीरवर थुंकले किंवा त्याच्यावर दगड मारणे, हे चांगले आहे. काफिराची संपत्ती कोणत्या रूपात आपण काबिज केली पाहिजे. तू जा आणि तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये.” यावेळी गितांजली हॉस्पिटलमध्ये जाते. आजारी बापाजवळ जाते आणि अतिशय द्वेषाने त्यांच्या तोंडावर चक्क थुंकते. त्यानंतर “तुझी सगळी संपत्ती घेऊन आपण सीरियाला जाऊ,” असे अब्दुल गिताजंलीला सांगतो. पण, तिला केरळ सोडायचे नसते. ती अब्दुलला नकार देते. यावर अब्दुल तिला धमकावतो. ती म्हणते, “मी माझ्या आईबापाचे एकत नाही, तर मग तू कोण?” धमकी देऊनही ती सीरियाला जायला तयार होत नाही.

तिला कळून चुकते की, अब्दुल, रमिझ आणि असिफा सगळेच दुष्टचक्राचे कर्तेकरविते आहेत. ती घरी येते. तिच्या कम्युनिस्ट वडिलांना सांगते की, ”ते खूप भयंकर आणि दुष्ट लोकं आहेत.” ती म्हणते, “मला असिफाचे सगळे खरे वाटले. कारण, मला आपला धर्म सांगितलाच गेला नाही. तुम्ही कम्युनिस्ट विचारसरणी सांगितली, पण आपला देवधर्म सांगितला नाही.” गितांजली मुस्लीम धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार करते आणि अब्दुलसोबत सीरियाला जायला नकार देते. यावर अब्दुल तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो. या सगळ्यामुळे नैराश्यात जात गितांजली आत्महत्या करते, तर निमा कधीच असिफाच्या जाळ्यात फसत नाही. मात्र, शालिनी तिला गळ घालते. ती म्हणते, “एकदा तू त्या मुलाला भेट.” मग ती असिफासोबतच्या त्या मुलाला भेटायला जाते. तो ती पित असलेल्या पेयात अमली पदार्थ मिसळतो. निमा बेशुद्ध पडते. तिचे अपहरण करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला जातो. निमा शुद्धीत येते, तेव्हा १८ ते १९ जणांनी तिच्यावर बलात्कार केलेला असतो. ती मनापासून हादरते. तिथून कसाबसा धीर एकवटत ती पळून येते. अशातच शालिनीला निमाचा फोन येतो की, गितांजलीने आत्महत्या केल्याचे आणि तिच्यावरही बलात्कार झाल्याची आपबिती ती शालिनीला सांगते. पद्धतशीरपणे ‘बे्रनवॉश’ झालेली शालिनी उर्फ फातिमा तिच्या दहशतवादी नवर्‍याला म्हणते ”गितांजलीने मुस्लीम धर्म सोडला म्हणून तिला मरायची बुद्धी झाली आणि निमा तर इस्लाम मानतच नव्हती, म्हणून तिच्यावर बलात्कार झाले. पण, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे, मी अल्लाला मानते,” असे म्हणून ती निश्चिंत होते. पुढे तिचा दहशतवादी नवरा सीरियाला जातो.

तिथे त्याचा मृत्यू झाला, असे तिला सांगितले जाते. अशातच तिला मुलगी होते आणि शालिनी उर्फ फातिमालाही सीरियाला जबरदस्तीने आणण्यात येते. सीरियाच्या वाळवंटात तिला तिचा तो दहशतवादी पती दिसतो. तो तिथे दहशतवाद्यांचा कमांडर असतो. शालिनीकडून तिचे बाळ हिसकावून घेतले जाते आणि तिला ‘सेक्स स्लेव्ह’ बनवले जाते. तिथले दहशतवादी वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तसे तिचे शोषण करतात आणि इतर वेळी दहशतवादी कृत्य करताना तिला आणि तिच्यासारख्या फसवून आणलेल्या मुलींना सोबत ठेवले जाते.इकडे भारतात निमा स्वत:ला कशीबशी सावरत तिचे पालक, गितांजलीचे पालक, शालिनीची आई आणि काही जागरूक नागरिक यांच्यासह पोलीस स्थानकात जाते आणि तिच्यासोबत तसेच गितांजली आणि शालिनीसोबत काय काय घडले, हे सगळे कथन करते. ती सांगते की, अशा हजारो मुली फसत आहेत. धर्मांधांच्या बळी पडत आहेत. तुम्ही याच्यावर कारवाई करा. त्याचवेळी सीरियामध्ये शालिनी दहशतवाद्यांच्या तळातून पळून जाण्यास यशस्वी होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे लष्कर तिचा ताबा घेते. तिथे तिला प्रश्न विचारला जातो की, “तू ‘इसिस’मध्ये कधी रुजू झालीस?” तेव्हा शालिनी उत्तर देते की, “ ‘इसिस’मध्ये केव्हा रुजू झाले, यापेक्षा ‘इसिस’शी का आणि कशी जोडले गेले, हे सांगणे महत्त्वाचे आहे.” इथूनच सुरुवात होते ‘द केरला स्टोरी’ची!

साहजिकच असे कथानक असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरून वाद-चर्चांचे वादळ उठले. पत्रकार कुर्बान अली आणि ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ यांनी तर न्यायालयातूनच विरोध केला. यांचे म्हणणे होते की, न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनालाच बंदी घालण्याचे आदेश द्यावेत किंवा हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल, तर त्यात नमूद करा की, हा चित्रपट काल्पनिक आहे. यावेळी चित्रपटाविरोधात कपिल सिब्बल, तर चित्रपटाच्या बाजूने हरीश साळवे न्यायालयात बाजू मांडत होते. न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच थांबवू शकत नाही, असा निर्णय दिला. वास्तविक, हा सिनेमा किशोरवयीन मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून पाहण्यासाारखा आहे. मात्र, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रौढांसाठीचे सर्टिफिकेट दिले आहे. या परिक्षेपात ‘लव्ह जिहाद’ विरोधात प्रखर सत्य मांडणार्‍या या सिनेमावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ” ‘द केरला स्टोरी’ म्हणजे केवळ एका राज्यातील दहशतवादाचा दस्तावेज आहे. काही वर्षांपासून दहशतवादाचे एक आणखी स्वरूप निर्माण झाले आहे. बॉम्ब आणि बंदुकीचा आवाज तर येतो, पण समाजाला खिळखिळे करणार्‍या या दहशतवादाला आवाज नाही.” ‘द केरला स्टोरी’ पाहणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला हेच वाटेल, हे नक्की!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.