येमेन शांत होणार का?

    05-May-2023   
Total Views |
Peace process in Yemen
 
मुस्लीमबहुल येमेन देशांतर्गत संघर्षाने ग्रासलाय. येमेन सरकार व हुती विद्रोही गटातील संघर्षात अन्य देशही पडद्यामागून सूत्रे हलवित आहेत. विद्रोहींना इराणचे, तर येमेन सरकारला सौदीचे समर्थन आहे. सौदी समर्थित सरकार आणि हुती विद्रोहींचा येमेनच्या अनेक भागांवर कब्जा आहे. या रक्तरंजित संघर्षाला आठ वर्षं पूर्ण होत आली असून, आता येमेनमध्ये शांतता नांदण्याची चिन्हे दिसू लागली आहे. येमेनमधील दोन्ही गट शांतता प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहेत. अमेरिकेचे विशेष दूत टीम लिंडर किंग नुकतेच येमेन खाडीच्या दौर्‍यावर गेले. त्यांनी येमेनमध्ये नव्याने सामंजस्य आणि शांततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. येमेनमध्ये कैद्यांच्या अदलाबदलीने युद्धविरामाची आशा निर्माण झाली आहे. रक्तरंजित संघर्ष का झाला आणि आता संघर्षविराम कसा शक्य झाला, हे जाणून घेण्याआधी येमेनविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. येमेन अरब प्रायद्वीपचा भाग असून पूर्वेला ओमान, उत्तरेला सौदी अरेबिया, पश्चिमेला लाल सागर तर दक्षिणेला अदनची खाडी आहे.

 सना शहर येमेनची राजधानी असून लोकसंख्या तीन कोटींहून अधिक आहे. यात ७० टक्के सुन्नी, तर ३० टक्के शिया मुस्लीम आहे. इराक, अझरबैजान, बहारीन या देशांत शिया मुस्लीम बहुसंख्य असून त्यांचे नेतृत्व इराण, तर युएई, ओमान, कुवेतमध्ये सुन्नी बहुसंख्य असून त्यांचे नेतृत्व सौदी करतो. येमेन याच धार्मिक संघर्षाचा शिकार झाला आहे.हुती विद्रोही गटात शिया तर येमेनमधील मान्यताप्राप्त सरकारमध्ये सुन्नी मुस्लीम आहेत. १९८६ मध्ये येमेन गृहयुद्धाआधी उत्तर आणि दक्षिण असा दोन भागांत विभागलेला होता. याठिकाणी स्वतंत्र सरकारही होते. नंतर, १९९०मध्ये या दोन्ही भागांचे एकत्रीकरण झाले आणि अब्दुल्लाह सालेह येमेनचे पहिले राष्ट्रपती बनले. येमेनच्या उत्तरेकडील सैदा शहरात ‘द बिलिविंग युथ’ संघटनेने विद्यार्थी आंदोलन सुरू केले. ज्याचे नेतृत्व हुसैन बेदरदीन अल-हुती यांच्याकडे होते. त्यामुळे या आंदोलनाला ‘हुती आंदोलन’ नाव मिळाले. हुती ही येमेनमधील एक जनजातीदेखील आहे. एक हजार वर्षांपासून राज्य करणारा शिया संप्रदाय पिछाडीवर गेल्याने शिया मुस्लिमांनी आवाज उठवला. तत्कालीन राष्ट्रपती सालेहविरोधात शिया मुस्लिमांच्या वाढत्या संतापाचे हुती आंदोलन उदाहरण होते. कारण, सालेह सुन्नी मुस्लीम होते.
 
शिया आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना सालेह त्याकडे दुर्लक्ष करत होते. पुढे २००४ साली आंदोलनाचे प्रमुख हुसैन बेदरदीन अल-हुती येमेन सैन्याकडून मारले गेले. यानंतर उत्तर येमेनमध्ये हुती विद्रोह उफाळून आला. हुतींनी येमेनच्या अनेक भागांवर कब्जा केला. २०१० साली विद्रोही आणि सरकारमध्ये सामंजस्य करार झाला. परंतु, तो तात्पुरताच ठरला. त्याचवर्षी अरब देशांमध्ये क्रांतीचे वारे वाहत असताना सालेह यांनाही पायउतार व्हावे लागले. पुढे २०१४ साली येमेनची राजधानी सना शहर आणि २०१५ साली राष्ट्रपती पॅलेसवर विद्रोहींनी नियंत्रण मिळवले. तेव्हा, येमेनने सौदीकडे मदत मागितली. तेव्हापासून सौदी येमेनमधील हुती विद्रोहींविरोधात संघर्ष करतोय. त्यानंतर सौदी समर्थित गट आणि हुती विद्रोहींचा गट यांच्यामध्ये संघर्ष पेटला. यात येमेनच्या लाखो लोकांचा बळी गेला. परंतु, आता दोन्ही गटांनी येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यामागे येमेनचे भौगोलिक स्थान आणि आर्थिक फायदा हे कारण आहे. जगातील दोनतृतीयांश तेलाची वाहतूक येमेन किनार्‍यावरूनच होते. अमेरिका आणि युरोपला जाणारी जहाजेही येथूनच जातात.

येमेनच्या दक्षिणेकडील बाब-अल-मंदेब-स्टेट भाग आशियाला आफ्रिकेशी जोडतो, तर पुढे सुएझ कालव्याद्वारे भूमध्य सागराला जोडतो. म्हणजे, आशिया युरोप आणि अमेरिकेशी याच मार्गाने जोडलेला आहे. येमेनमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल भंडार असून यात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे हित दडलेले आहे. यासाठी युरोपातील अनेक देश सौदीला येमेनमध्ये युद्धासाठी प्रोत्साहित करतात. तेल भंडारासाठी सौदीलाही येमेनमध्ये वर्चस्व गाजवायचे आहे. परंतु, सौदी आता हा संघर्ष थांबवू पाहतोय. काही दिवसांपूर्वीच चीनच्या माध्यमातून सौदी आणि इराणमधील तणाव दूर झाला. आता त्यानंतर येमेनमध्येही आर्थिक विकासासाठी युद्धविरामाची शक्यता वाढली आहे. हुती विद्रोहींच्या ठिकाणांहून सौदी गटाकडून हवाई आणि समुद्री नाकाबंदी हटविण्यात येणार आहे, तर हुती विद्रोहींनी संरक्षणाची हमी दिली आहे. त्याबदल्यात सौदीने व्यापक पुनर्निर्माणाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येमेनमध्ये शांतता नांदणार का, हे येणारा काळच ठरवेल.



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.