विश्वविक्रमी ‘धायगुडे’

    05-May-2023
Total Views |
Pandit Dhaygude

पोटावरून अवजड दुचाकी नेण्याचा पराक्रम गाजवून पुन्हा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यासाठी सज्ज झालेल्या विश्वविक्रमी पंडित धायगुडे यांच्याविषयी...
 
काही माणसं झपाटलेली असतात... जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असतो. असाच ध्यास घेतलेले पनवेल, कळंबोली येथील पंडित तुकाराम धायगुडे हे पुन्हा एकदा विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.पंडित धायगुडे यांचा जन्म दि. १ जून, १९८० साली सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धायगुडे वस्तीत झाला. घरात आई-वडील आणि तीन भावंडे असल्याने गरिबीचे चटके सोसतच त्यांचे बालपण गेले. आईही वडिलांसोबत दुसर्‍यांच्या शेतात राबत असताना तिघा भावांना कामे वाटून द्यायची, अशा हलाखीच्या परिस्थितीत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जतमध्ये पूर्ण केले, तर पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने बाहेरून पदवी मिळवली. पंडित धायगुडे यांना लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने त्यांनी ‘अ‍ॅथलिट’ म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला १०० मीटर, धावले. परंतु, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे, तर सराव महत्त्वाचा होता.

पोटाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याने त्यासाठी मुंबईशिवाय पर्याय नव्हता. मुंबईमध्ये जायचे तर राहाण्यापासून ते खाण्यापर्यंत समस्या होती. अखेर, मनाचा हिय्या करून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोपट पाटील (मामा) यांच्यासमवेत त्यांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यावरही खेळाची आवड टिकवून ठेवली होती. मुंबईतील देवनार बकरी मंडीमध्ये काम करत असताना बराच फावला वेळ असल्याने कराटे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला गोवंडीच्या झोपडपट्टीत ते वास्तव्यास होते. पहाटे गोवंडी ते वाशी एमजीएम ते परत गोवंडी असा दैनंदिन प्रवास सुरू होता. हाच त्यांचा दैनंदिन सराव, पण खाण्यापिण्याची वानवा होती. तरीही या सर्वांवर मात करून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर दोन पदके मिळवली. त्याच दरम्यान कुंडलीक ऐडके या सरकारी अधिकार्‍याच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी सेवायोजन कार्यालयात आपले नाव नोंदवले. त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून त्यांना नोकरीचा फोन आला आणि २००३ साली त्यांची शिपाईपदी नियुक्ती झाली. इथूनच त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. नोकरीची भ्रांत मिटली असली तरी आपणदेखील काहीतरी वेगळे करून दाखवले पाहिजे, असा निर्धार करून त्यांनी सराव सुरू ठेवला.

बालपणापासूनच शेतात काम करत असल्याने त्यांना मजबूत नैसर्गिक शरीरयष्टी लाभली होती. त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचे त्यांनी ठरवले. शेतीबरोबर शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रातही नैपुण्य असणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जाणले. २००० सालापासून शाळेतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे तसेच कराटेचे प्रशिक्षण देण्याचे काम करत असून हीदेखील त्यांची एक आवड असल्याचे ते सांगतात. बँकेच्या माध्यमातून विविध स्पर्धांमधून पाच, दहा, व २१, किलोमीटर धावणे सुरूच होते. कामासोबतच प्रचंड सराव सुरू होता. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे यातूनच वजनदार दुचाकी जास्तीत जास्त वेळा पोटावरून नेण्याच्या प्रकारात धायगुडे यांनी दि. २८ ऑगस्ट, २०१६ मध्ये ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. २५७ किलो वजनाच्या दोन दुचाकी लागोपाठ १२१ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यानी विश्वविक्रमाला गवसणी घातली. तद्नंतर सामाजिक जाणिवेतून होतकरू विद्यार्थ्यांसाठी सांगली, मुलुंड व कोपरखैरणे याठिकाणी कराटे क्लासेस सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चारवेळा ‘ब्लॅक बेल्ट’ पटकावला.

२०१६ नंतर शासनाकडून दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, कुणी दखलच घेतली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. मागील दोन-तीन वर्षांपासून शासन दरबारी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण यश आले नाही. अनेक प्रयत्नाअंती यश मिळाले नसले तरीही खचून न जाता सराव सुरूच ठेवल्याने २०१८ रोजी कराटेमध्ये १ हजार, ३१० पंच मारून त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला.भविष्यात सतत प्रयत्न करून युवापिढीला आत्मपरीक्षणचे धडे देण्याचे कार्य करायचे आहे. त्याचबरोबर युवापिढी व्यसनापासून दूर कशी राहील. यासाठी प्रयत्नशील असल्याचे धायगुडे सांगतात.जग जिंकण्यासाठी पैशाची नाही, तर प्रचंड मेहनतीची गरज आहे. माणसाचे ध्येय, उद्दिष्ट निश्चित असेल आणि ते पूर्ण करण्याची तयारी असेल, तर या जगात काहीच अशक्य नाही. हीच यशाची गुरूकिल्ली मानून देशाचं नाव ‘गिनीज बुक’मध्ये न्यायचं स्वप्न उरी बाळगत तब्बल २५७ किलो वजनाच्या पाच दुचाकी लागोपाठ १५० वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत ते विश्वविक्रम करणार आहेत, अशा या धीरोदत्त, धाडसी धायगुडेला उज्वल यशासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा !

-दीपक शेलार