कर्नाटकची रणधुमाळी...

    05-May-2023   
Total Views |
Karnataka Assembly Elections

काँग्रेसच्या या घोषणेनंतरच्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे काँग्रेसला माघार घेणे भाग पडत आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा करून एकगठ्ठा मुस्लीम मते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते करताना नेहमीप्रमाणे बहुसंख्य हिंदूंना दुखविण्यात आले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील बुधवारी मतदान झाल्यानंतर सायंकाळापासून मतदानोत्तर कल चाचण्यांचे निकाल येण्यास प्रारंभ होईल. मात्र, त्यापूर्वी ‘जन की बात’ या वाहिनीने मतदानपूर्व कल चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. ’जन की बात’ने त्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारे काही आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार यावेळी कर्नाटकातही भाजपला काँग्रेस आणि ‘जेडीएस’पेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता आहे. १ मेपर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, भाजपला १००-११४ जागा, काँग्रेसला ८६-९८, जेडीएसला २०-२६ जागा मिळू शकतात. ‘जन की बात’च्या दुसर्‍या सर्वेक्षणात ७० टक्के लिंगायत आणि ७० टक्के मराठा फक्त भाजपलाच पाठिंबा देतील, तर ८६ टक्के मुस्लीम आणि ८३ टक्के कुर्बा काँग्रेससोबत असतील. क्षेत्रनिहाय, कर्नाटक, कित्तूरमध्ये भाजप आघाडी मिळवेत आणि कल्याण-बंगळुरु भागात काँग्रेस लढत देईल. ‘व्हीआयपी’ मतदारसंघांबद्दल बोलायचे झाल्यास, बसवराज बोम्मई शिगावमधून, डीके शिवकुमार कनकापूरमधून, सीटी रवी चिकमगलूरमधून, जगदीश शेटर हुबळी धारवाडमधून आणि बीवाय विजेंदर शिकारी पुरामधून आघाडी घेतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

’जन की बात’प्रमाणेच इतर अनेक वाहिन्यांचे ‘ओपिनियन पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. रविवार, दि. ३० एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘एबीपी सीव्होटर’नुसार यावेळी भाजपला केवळ ७४ ते ८६ जागांवर समाधान मानावे लागेल, तर काँग्रेसला १०७ ते ११९ जागा मिळू शकतात. तसेच, जेडीएसला २३ ते ३५ जागा मिळतील. ‘झी न्यूज-मॅटर्स ओपिनियन पोल’नुसार, यावेळी भाजपला राज्यात १०३ ते ११५ जागा मिळतील. या पोलनुसार, काँग्रेसला ७९ ते ९१ तर जेडीएसला २६ ते ३६ जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला ४२ टक्के आणि काँग्रेसकडे ४० टक्के मते असतील. ‘सी-व्होटर - इंडिया टुडे’नुसार, यावेळी काँग्रेस जिंकू शकते. या पोलनुसार भाजपला फक्त ७४ ते ८६ जागा मिळतील आणि काँग्रेसला १०७ ते ११९ जागा मिळतील. तसेच जेडीएसला २३-५५ जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात काँग्रेसला ४० टक्के आणि भाजपला ३५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे, ही सर्वेक्षणे कर्नाटक निवडणुकीत ‘बजरंग दल’ हा मुद्दा बनण्यापूर्वीची आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची ‘पीएफआय’शी तुलना करून बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा देशभरातून विरोध होत आहे. यामुळे काँग्रेस बॅकफूटवर आहे. नुकसान नियंत्रणाच्या प्रयत्नात पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी प्रथम बजरंग दलावर बंदी घालण्याची शक्यता नाकारली. त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सत्तेत आल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हनुमान मंदिरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने ‘पीएफआय’सह बजरंग दलावर बंदी घालण्याची केलेली घोषणा आता काँग्रेसला अडचणीची ठरण्यास प्रारंभ झाला आहे. कारण, काँग्रेसच्या या घोषणेनंतरच्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे काँग्रेसला माघार घेणे भाग पडत आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा करून एकगठ्ठा मुस्लीम मते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते करताना नेहमीप्रमाणे बहुसंख्य हिंदूंना दुखविण्यात आले आहे.

‘बजरंग दल’ ही संघटना आक्रमक असल्याचा दावा काँग्रेससह अन्य पक्ष करत असतात. मात्र, त्यांची आक्रमकता आणि ‘पीएफआय’सारख्या देशद्रोही संघटनेची आक्रमकता यामध्ये निश्चितच फरक आहे आणि हा फरक बहुसंख्य हिंदूंना व्यवस्थित कळतो. त्यामुळे अनेक हिंदूंचा बजरंग दलास पाठिंबा नसला असे क्षणभरापुरते मान्य केले तरी त्यांची तुलना ‘पीएफआय’सोबत करणे हे हिंदूंना रुचणारे नाही, याचा अंदाज काँग्रेसला अद्याप आलेला नाही.त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याचा मुद्दाही काँग्रेसकडून प्रचारात आणण्यात आलेला नाही. प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने काँग्रेसला त्यावर फार काही बोलता आलेले नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक निवडणुकीमध्ये पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरून भाजपला ‘फुलटॉस’ देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी त्यामध्ये भर घातली ती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या पुत्राने!

निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला ’प्रजा ध्वनी’ असे नाव दिले आहे. त्याचवेळी काँग्रेसने आपल्या निवडणूक आश्वासनांना ’संकल्प पत्र’ असे नाव दिले आहे. भारतीय जनता पक्षाने गरिबांना वर्षातून तीनदा मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. हे सिलिंडर उगाडी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला दिले जातील, असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. याशिवाय कर्नाटकातील प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या माध्यमातून गरिबांना स्वस्त आणि चांगले अन्न उपलब्ध होणार आहे. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बीपीएल’ कार्डधारकांना पोषण योजनेंतर्गत दररोज अर्धा लीटर नंदिनी दूध दिले जाईल, असे जाहीर केले आहे. नंदिनी दुधावरून राज्यात सध्या जोरदार राजकारण सुरू आहे, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दहा लाख गरिबांना घरे, दलित महिलांच्या नावावर दहा हजारांची एफडी, गरिबांना दरमहा पाच किलो रेशन, राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पाच लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज न आकारणे, शेतकर्‍यांना बियाण्यांसाठी दहा हजार रुपये देणे आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करणे या भाजपच्या आश्वासनांचा समावेश आहे.

काँग्रेसनेही सरकार स्थापन झाल्यावर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात सर्व महिलांना मोफत प्रवास सुविधा, केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करून राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, ६३ सीमावर्ती तालुक्यांमध्ये कन्नड भाषा आणि संस्कृतीचा विकास करण्याचे आश्वासन दिले. कमाल आरक्षण मर्यादा ५० टक्के, दर ७५ टक्के करणे, २०० युनिट वीज मोफत देणे आदी आश्वासने देण्यात आली आहेत. त्यासह महिला कुटुंबप्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना दोन हजार रुपये, बेरोजगार पदविकाधारकांना १ हजार, ५०० रुपये आणि रात्रपाळीत काम करणार्‍या पोलिसांना पाच हजार रुपये विशेष भत्ता देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. मात्र, राज्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासनच सर्वाधिक चर्चेत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही भाजपने यावेळी खास राजकीय प्रयोग केला आहे. हा प्रयोग कमी-अधिक प्रमाणात गुजरात मॉडेलच्या धर्तीवर आहे. याअंतर्गत पक्ष निवडणुकीच्या वेळीच जुन्या नेतृत्वाविरुद्ध नवीन नेतृत्व पुढे करतो. काही काळापूर्वी पक्षाने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून एसआर बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले होते. पक्षाने तिकीट वाटपातही हाच कल कायम ठेवला. माजी मुख्यमंत्री आणि सहा वेळा आमदार जगदीश शेट्टर यांनाही पक्षाने तिकीट नाकारले होते. याच कारणामुळे शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेट्टर यांचा लिंगायतांमध्येही प्रभाव आहे. तसेच, अन्य काही दिग्गजांना पक्षाने तिकीट दिले. राज्यात नवीन नेतृत्व आणि नव्या पिढीसोबत आपण निवडणुकीत उतरलो आहोत, असा संदेश पक्षाने दिला. यामागे भाजपची दुहेरी विचारसरणी आहे. प्रथम, ते सत्ताविरोधी घटकाचा मुकाबला करेल आणि दुसरे म्हणजे, जुने आणि वृद्ध नेतृत्व जागी ठेवून ते नवीन नेतृत्व तयार करेल, जेणेकरून ते आगामी काळात आपले स्थान मजबूत ठेवू शकेल. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हा प्रयोग यशस्वी केला होता. आता हाच प्रयोग यावेळी कर्नाटकात होत आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.