पवारांचा राजीनामा ; राहुल-स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन!

    04-May-2023
Total Views |
rahul-gandhi-m-k-stalin-dialled-supriya-sule-wants-sharad-pawar-to-stay-party-chief-say-ncp-leader

मुंबई : शरद पवार यांनी नुकतेच २ मे रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संपुर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र दि. ४ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची चर्चा माध्यामातून रंगत आहे. शरद पवार यांच्या राजीनामा घोषणेनंतर दोन्ही नेत्यांनी फोन करून पवारांनी राजीनामा का दिला? याबाबत माहिती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पूर्णवेळ कर्नाटकमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शरद पवार यांच्याशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली त्यामुळेच राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून राजीनाम्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.