नवी दिल्ली : भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी दोन आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पुरवणी दोषारोपपत्रात नाव असलेल्या दोन आरोपींपैकी एकाचे नाव थुफैल एमएच तर दुसऱ्याचे नाव मोहम्मद जबीर असे आहे. यासह आतापर्यंत एकूण २१ आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सदस्यांनी समाजात दहशत पसरवण्याच्या आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने नेत्तारू यांची सार्वजनिकपणे हत्या केली होती.
एनआयएने या वर्षी २० जानेवारी रोजी नेत्तारू हत्याप्रकरणी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले होते. पीएफआयने आपल्या कथित शत्रूंना आणि लक्ष्यांना मारण्यासाठी गुप्त 'हिट स्क्वाड्स', 'सर्व्हिस टीम्स' किंवा 'किलर स्क्वाड्स' तयार केल्या आहेत, असे एनआयएने त्यात म्हटले होते. पीएफआयच्या या गुप्त पथकांचे मास्टरमाईंड कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात राहत होते. हे लोक त्यांच्या साथीदारांना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील फ्रीडम कम्युनिटी हॉलमध्ये शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देत असत.