पर्यावरणीय धड्यांचे ‘विनय’शील ‘नंदन’वन

    04-May-2023   
Total Views |
Dr. Nandini Vinay Deshmukh

पर्यावरणासाठी अनेक उपक्रमांमार्फत कार्यरत असणार्‍या आणि विद्यार्थ्यांच्या ऋषितुल्य मातृवत्सल प्राध्यापिका डॉ. नंदिनी विनय देशमुख यांचा हा हृदयस्पर्शी प्रवास...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मातृसमान प्राध्यापिका डॉ. नंदिनी यांचा जन्म मुंबईतलाच. लहानपणापासून ते अगदी आत्ता वयाच्या 65 वर्षांपर्यंतचं त्यांचं आयुष्य मुंबईतच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यावेळच्या ’इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत झालं. आता या शाळेला ’महात्मा फुले कन्या शाळा’ असे नाव देण्यात आले आहे. त्या वेळच्या अकरावीनंतर माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी त्यांनी प्रवेश घेतला. बालपणापासून वाचनाची गोडी असलेल्या नंदिनी यांचे पुढे लेखिका होण्याचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी त्यांना कला शाखेला प्रवेश घ्यायचा होता. मात्र, वडिलांच्या इच्छेनुसार, विज्ञान शाखेला त्यांनी प्रवेश घेतला. या प्रवेशाचा सूड उगवायचा अशा बालहट्टामुळे त्यांनी अभ्यास केला नाही. कालांतराने आपण आपल्या पालकांवर सूड उगवत नाही, तर स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ‘बीएससी झुओलॉजी’ला प्रवेश घेऊन जोमाने अभ्यास सुरू केला. या अभ्यासाचे फलित म्हणून की काय ’झुऑलॉजी’मधील ’बीएससी’ आणि ’एमएससी’ या दोन्ही पदव्या प्राप्त करताना त्या मुंबई विद्यापीठातून पहिल्या आल्या.
 
नंदिनी यांनी पुढे ’पीएच.डी’साठी त्यांचे पती डॉ. विनय देशमुख यांच्यासोबत दिल्लीतील ’जेएनयु’मध्ये प्रवेश घेतला. पण, त्याचवेळी ’अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस’ची परीक्षा दिल्याने विनय यांना कोचीनला नोकरी मिळाली. त्यावेळी म्हणजेच 1976-77च्याकाळात दिल्लीत एकटं राहणं शक्य नव्हतं म्हणून मुंबईची वाट धरावी लागली.अपूर्ण राहिलेलं ‘पीएच.डी‘चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतील ’इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये पुन्हा ‘पीएच.डी‘साठी प्रवेश घेतला. ’युजीसी’ची चार वर्षांसाठी फेलोशिप पटकावून वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी ’तेलाच्या प्रदूषणाचे कोळंबीवर होणारे परिणाम’ या विषयात ‘पीएच.डी’ पूर्ण केली. 1998 साली त्यांनी ‘रानातील गोष्ट’, ‘मनातील गोष्ट’ या नावाचे पर्यावरणीय समस्यांवर आधारित पुस्तकही लिहिले.नंतर डॉ. विनय यांची बदली वेरावळ, गुजरात येथे झाल्यावर पूर्णवेळ गृहिणी बनण्याचा त्यांनी विचार केला. पण, मुलाच्या शिक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरल्यानंतर त्यांनी मुलाला सांभाळून प्राध्यापकी सुरू करण्याचा निश्चय केला.

चार निरनिराळ्या महाविद्यालयामधून नेमणूक होत असतानाही घराच्या जवळ आहे म्हणून कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापकी करण्याचे त्यांनी निश्चित केले. इथे तळागाळातील मुलांची शिकण्याची आणि जगण्याची ओढ हे त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारी ठरली आणि यातूनच पुढे या विद्यार्थ्यांना मदत म्हणून त्यांच्या जेवण खाण्यापासून ते राहण्याच्या सोयीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना या देशमुख दाम्पत्याने मदत केली. समुद्र विज्ञानातील व मत्स्यविज्ञानातील अनेक तरुण संशोधक या दाम्पत्याने घडवले आहेत. या कालावधीत नंदिनी यांनी Post graduate diploma in education management and post graduate diploma in counselling and guidance केला. ‘सर्टिफिकेट’ समुपदेशक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मानसिक मदतही केली. त्यांच्या हातून अशा प्रकारची ऋषितुल्य प्राध्यापकी घडल्याचे श्रेय या विद्यार्थ्यांनाच त्या देतात.2020 ला ’लॉकडाऊन’ असतानाच्या काळात त्यांचे आधारवड असलेले डॉ. विनय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले.

डॉक्टर गेले, मात्र कोळी बांधवांसाठी आणि सामान्य माणसांना माशांची माहिती व्हावी, या हेतूने तयार करायचे ’मासे जाणून घेऊया’ या पुस्तकाचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.‘कोविड‘ काळात नंदिनी बंगळुरुला असतानाही डॉ. त्यांना याविषयी शंका विचारत असत, पण वेळेअभावी त्यांना मदत न करू शकल्याचे शल्य नंदिनी यांच्या मनात होते. त्यामुळे विनय यांच्या पहिल्या पुण्यतिथीला हे पुस्तक पूर्ण करून प्रकाशित करून श्रद्धांजली वाहीन, असा निश्चय नंदिनी यांनी केला. विनय यांनी पुस्तकासाठी केलेल्या नोंदी, संशोधनाचे पेपर्स असं सगळं मिळवून एकत्र करून नंदिनी यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने हे पुस्तक पूर्णत्वाला नेले. कांदळवन कक्ष, त्यांचे विद्यार्थी आणि इतर अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे पुस्तक प्रकाशित करता आले.डॉक्टरांचं हे स्वप्न पूर्ण करता आल्याने नंदिनी यांना आत्मिक समाधान मिळाले. प्राध्यापक म्हणून काम करत असताना लेखन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांमध्ये चढता आलेख असलेल्या नंदिनी यांनी महाविद्यालयातही विभाग प्रमुख आणि नंतर व्हाईस प्रिन्सिपल म्हणून कामगिरी बजावली.

या कामाच्या व्यापातून पर्यावरण आणि इतर कामांसाठी वेळ मिळत नव्हता म्हणून त्यांनी या पेशातून 2012 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता त्या ’क्लायमेट रियालिटी ऑर्गनायझेशन’ या पर्यावरणासाठी कार्यरत असलेल्या अमेरिकन संस्थेच्या भारतीय शाखेत ’नॅशनल कोऑरडिनेटर’ (एज्युकेशन) म्हणून कार्यरत आहेत. ‘ग्रीन कॅम्पस’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये शाश्वत जीवनाचे धडे देऊन त्या हरित आवार शाळा बनवल्या आहेत. या ’हरित आवार योजने’मध्ये सौरऊर्जेचे पॅनल बसवणे, पर्जन्य जलसंधारण (rainwater harvesting),वृक्षरोपण, बटरफ्लाय गार्डन्सची निर्मिती तसेच गाडीऐवजी सायकलचा वापर अशी शाश्वत जीवनशैली वापरण्याचे शिक्षण मुलांना व शिक्षकांना देण्यात येते. याबरोबरच शाश्वत विकास ध्येयावर आधारित महाराष्ट्रातील विविध भागांत भेटी देऊन त्या मार्गदर्शन ही करतात. विविध दैनिके, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, विश्वकोश यामध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पर्यावरण रक्षणासाठीचे काम आणि ऋषितुल्य प्राध्यापकीच्या निष्ठावंत सेवेला दै. ’मुंबई तरुण भारत’चा सलाम!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.