मुंबई : अनंत करमुसे यांना दि. ५ एप्रिल २०२० रोजी जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच्या बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यांच प्रकरणावर अनंत करमुसेंनी 'दै.मुंबई तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीत ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या ४९३ पानांच्या चार्जशीट बद्दल सांगितले . ते म्हणाले,पोलिसांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून सत्यस्थिती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ‘चार्जशीट’च्या माध्यमातून केला असून अनेक महत्त्वाचे खुलासे यात करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर होणारा तपास संशयास्पद असल्याचे मी म्हटले होते. मात्र त्याकडे तत्कालीन पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले होते. उलटपक्षी मी सांगितलेल्या बाबी नमूद न करता पुरेसा तपास न करता तपास थांबविण्याचे पत्र मला पाठवले होते.
मात्र आता नव्याने दाखल केलेल्या ‘चार्जशीट’मध्ये मी घेतलेले आक्षेप, तपासातील त्रुटी, हल्ल्याचा प्रकार होत असताना संबंधितांचे मोबाईल नेटवर्क ट्रेकिंग, मला घेऊन जाण्यासाठी आलेल्या गाड्यांची माहिती या सर्व बाबींचा नव्या ‘चार्जशीट’मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारचा खरा तपास या ‘चार्जशीट’मधून दिसून येत आहे. माझ्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे या तपासातून समोर आले आहे. ‘चार्जशीट’मध्ये दाखल झालेल्या ‘कलम 364 (अ)’ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना दहा वर्ष किंवा जन्मठेप होऊ शकते, अशी प्रतिक्रिया अनंत करमुसेंनी 'दै.मुंबई तरुण भारत'ला दिली.