निद्रारूपेण संस्थिता...(भाग-१)

    31-May-2023
Total Views |
Vinayak Damodar Savarkar Bhagwan Birsa Munda

विनायक दामोदर सावरकर यांचा दि. २८ मे हा जन्मदिवस, तर दि. ९ जून हा भगवान बिरसा मुंडांचा स्मृतिदिन. या पंधरवड्यात आपण सारे या दोन महाविभुतींपुढे नतमस्तक होत त्यांना श्रद्धापूर्वक अभिवादन करत असतो. या दोन लोकोत्तर युगपुरुषांच्या बंदिगृहातील ‘निद्रे’वरची त्यांची मनोगते मला सर्वस्वी चिंतनीय वाटतात. म्हणून त्यांचे विचार माझ्या लेखात सादर करावे असे वाटते. यानिमित्ताने निद्रेची अध्यात्मिक परिक्षेत्रातील कल्पनाही सार्‍यांनी जाणून घ्यावी असेही वाटते. यावर आधारित ‘निद्रारूपेण संस्थिता’ या लेखाचा हा पहिला भाग...

विचार करण्यासारखे आहे की, त्या काळच्या मुंडा जमातीचा माणूस आपल्या झोपेतसुद्धा तत्कालीन चलनातील राणीछापाचे फारफार तर दहा रुपये पाहात असेल. अशात त्याला जर ५०० रुपये मिळत असतील, तर का नाही एखाद्याची झोप उडणार? का नाही तो फितूर होणार? पैशाच्या लालसेपोटी तो या वनवासींच्या भगवंताला आपल्यापासून का नाही दूर करणार? असा विचार करताना मला भारतीय स्वातंत्र्य काळातल्या वर उल्लेख केलेल्या दोन लोकोत्तर युगपुरुषांचे विचार आठवतात. ’निद्रे’वर त्यांची मनोगते मला चिंतनीय वाटतात. त्यांच्या जीवनपटातून मला आपल्या जीवनाचं थोडं चिंतन करावे असे वाटते व त्यातून काही बोध आपण घेऊ शकतो का, हे पाहावेसे वाटते. ’निद्रे’ची अध्यात्मिक परिक्षेत्रातील कल्पनाही आपण जाणून घ्यावी असे वाटते. असे आत्मचिंतन करताना प्रथमतः या द्वयींच्या बंदिगृहातली मनोगते काय होती, हे समजून घेऊ.

राँचीचे बंदिगृह

बिरसा मुंडा, (आदिवासी/वनवासी)जनजाती समाजाचा ’भोगोबान’ आणि जनजाती समाजक्रांतीचा जनक. त्याने त्याच्या मनुष्यावतारातल्या ’निद्रे’तील किती प्रसंग स्मरले असतील. ’दीकु’ म्हणून ज्यांना ओळखले जायचे अशा विदेशातून आलेल्या आणि त्यांना साथ देणार्‍या अनेकांची झोप उडवली असेल. झारखंडातील उलिहातू येथे दि. १५ नोव्हेंबर, १८७५चा गुरुवार. ‘बृहस्पतिवार’ या दिवसावरून नाव ठेवण्यात आलेल्या बिरसाने त्या दिवशी करमी हातू व सुगणा मुंडा या जोडप्याच्या पोटी अवतार घेतला. त्या मातेच्या कुशीत झोपत आपलं बालपण त्याने तेव्हा अनुभवलं असेल. रांगायला लागल्यावर आपल शैशव अनुभवत आपल्या आईला सुखाची झोप देऊ केली असेल. गुरं-ढोरं सांभाळत रानावनात कितीतरी झाडाच्या सावलीत तो पहुडला असेल. आपल्या बासरीने त्यांना मंत्रमुग्ध करत सुखावल असेल. समाजसंघटन करत किती अरण्य किती डोंगर कपारीतून मजल-दरमजल करत शरीराला आवश्यक एवढीच डुलकी त्याने घेतली असेल. अपार कष्ट केल्यावर व ताण-तणावामुळे अत्यावश्यक पण सजग अशी झोप त्याने घेतली असेल.

स्वामी आनंद पांडे या योगीपुरुषाच्या मार्गदर्शनात निद्रिस्त समाजाला जागृत करत बिरसाने योगनिद्रा ग्रहण केली असेल. आपली काळजी घेणार्‍या समाजबांधवांच्या आग्रहाखातर त्यांच्या संरक्षणात झोप घेतली असेल. असं आपलं उणपूर २५ वर्षांच जीवन जगता-जगता दि. ९ जून, १९०० रोजी ब्रिटिशांनी जबरदस्तीने देऊ केलेली अखेरची निद्रा बिरसाने घेतली असेल. पण त्याच्या व समाजाच्या दृष्टीने त्या काजळरात्रीच्या दि. ३ फेब्रुवारी, १९००ला बिरसाला लागलेली ती झोप मात्र सगळ्यांचा घात करून गेली. साधेसुधे नव्हे, तर खणखणीत ५०० रुपयांच्या बदल्यात, ज्याने बिरसाला ब्रिटिशांच्या कचाट्यात पकडून देण्यात मदत केली होती, तो फितूर मात्र तेव्हा ब्रिटिश उपायुक्ताच्या सुरक्षेत सुखाने घोरत झोपला होता. हे असे काहीसं घडतयं असं झोपेतून सावध होताना जेव्हा बिरसाला कळले, तेव्हा मात्र स्वतःचाच राग त्याला आला होता, अशी कशी ही झोप लागली आपल्याला? तेव्हा जर मी झोपलो नसतो, तर मी सावध असतो. भात शिजवण्यासाठी आग पेटवू दिली नसती. आग पेटली नसती, तर धूर उठला नसता. आकाशात धूर दिसला नसता, तर त्याचा माग कोणाला मिळाला नसता... मग तेव्हापासून बिरसा नीट झोपूच शकला नव्हता. शेवटी शेवटी तर जेव्हा बिरसावर विषप्रयोग होऊ लागला होता.

तेव्हा त्याला झोपेत असल्यासारखे कळून चुकले होते की, तो कुठेतरी निघून जातोय. चाललाय. आजच सकाळी त्याला जबरदस्त रक्ताची उलटी झालीय. बेशुद्ध होता होता स्वतःच्या समाजबांधवांशी दोन गोष्टी करू पाहात होता. परंतु, बिरसा हे बोलू शकणार नव्हता. डोळेच उघडू शकत नव्हता. त्याच्या आतली महुतेलाची मशाल आणि टेंभी विझवून टाकली आहे जणू. कोणी माता जणू झोके देतेय बीरसाला, म्हणतेय ’झोप, झोप रे, झोप...’. त्या दिवशी सकाळी ८ वाजता बिरसाला रक्ताची उलटी होऊन तो बेशुद्ध झाला. बिरसा आता या झोपेतून काही जागा होत नाही, हे राँचीच्या तुरुंगाधिकार्‍यांनी जाणलं होतं आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले होते. स्वतःला हवा तसा अहवाल तयार करताना त्या तुरुंगाधिकार्‍याच्या मनात येत होते की, ’बेट्याच्या शरीरात कमालीची रग भरलीय. मे महिन्याच्या ३० तारखेपासून रखडतोय. त्याआधी फेब्रुवारीपासून विनाचौकशी एकांत कोठडीत बंद आहे. त्यापूर्वी कितीतरी दिवस डोंगरकपारीतून वनाजंगलातून वणवणत पळत होता. खायला प्यायला काय मिळत होते ते त्याचा तोच जाणे. पण, तरीही शरीर मोडून पडत नाही. निदान आता तरी तो मेला पाहिजे. नाहीतर, बिरसा खराच भगवान आहे, या म्हणण्याला आणखीन पुष्टी मिळेल. म्हणतील, भगवान नसता तर मेलाच असता एवढ्यात.’

९ तारखेच्या सकाळी तो झोपेतून जागाच झाला नाही आणि ९ वाजता बिरसा मृत्यू पावला. एक मृत्यू सोडून एवढी गाढ शांत निद्रा बिरसाला मिळवून देण्याचे सामर्थ्य, एका मुंडा शरीराला देण्याचे सामर्थ्य, दुसर्‍या कोणाला नसावे. ही अशी एक झोप भारतीयांनी अनुभवली. भारतीय ही एक झोप कधीच विसरू शकणार नाहीत. आता दुसर्‍या प्रकारातली झोप बघायला आपण राँचीहून अंदमानात जाऊ.

बंदिगृह अंदमानचे...

अंदमान म्हटले की हिंदू संघटक आणि
आसिंधू सिंधूपर्यंता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥
असे प्रतिपादन करणार्‍या विनायक दामोदर सावरकर आपल्याला झोपेतही आठवणार. अंदमानच्या बंदिगृहांत सर्वतोपरी गांजले गेले असतानाही त्यांच्या वाट्यास एक सुख दैवाने जवळजवळ शेवटपर्यंत राखून ठेवलेले होते. ते म्हणजे झोपेचे. त्यांस एकदा दिवसाचा त्रास संपून संध्याकाळी कोठडीत कोंडले गेले की, झटकन झोप यावी. ती इतकी सुखद नि गाढ असे की, अनेक वेळा सकाळी घंटा होई तेव्हा डोळे उघडल्यानंतर किती वेळ तरी आपण बंदिगृहांत आहोत याची जाणीव त्यांना येत नसे. सर्व सोबती आणि सांगाती दूर झाल्यावर जी एकच सोबत त्यास लाभली होती त्या निद्रेचे त्यांस जे मनःपूर्वक उपकार मानत, त्यांनी त्यांच्या ’निद्रे’ या कवितेत तसे व्यक्तव्यही केले आहे. त्यात स्वातंत्र्यवीर म्हणतात,

‘हे निद्रे, सहगमना अंगने-समा
करुनी या यमपुरीत येसी मजसवे.
मम शय्या बंदिगृही संगती तुझ्या
प्रेममृदुल, मोहक जणू शेज फुलांची
देवा या निद्रेसी तरि निदान तू
नेऊ नको मजपासुनी - सर्व यद्यपि नेलेसी’
ही शांत निद्रा आणि त्यांची कविता हीच त्यांची बंदिगृहात खरी सहचरी होती.. त्या थंड कडक फरशीवर गाढ झोपणारे असे होते सावरकर.

सुखशय्यापलंग...

मोरोपंतांचे वंशज रा. द. पंतपराडकर यांनी सावरकर हे १९२६ला रत्नागिरीत असताना त्यांना एक लोहपलंग सुखशय्यापलंग अशा नावाने भेट म्हणून दिला होता. त्यावर त्यांनी आर्या लिहिल्या होत्या:

हिंद तपस्वीच गमे सावरकर रुप घेऊनी भेटे
आर्याकेकास्वाहाकारीं मजला चढेचि बळ मोठें
हा सुखशय्यामंचक प्रेमें सावरकरांसि आहेर
देतो मयूरवंशज ज्यासि रुची एक आंत बाहेर
पंतपराडकरांच्या भेटीचा स्वीकार करणारे एक आर्याबद्ध पत्र सावरकरांनी पाठवले होते. त्यातील काही भागाचा उल्लेख येथे करावासा वाटतो:

...जो ध्येय प्राप्त न तें, जों न असे राष्ट्रपाश हा तुटला
हा हिंदूजाती-गौरव-रवी ना राहुग्रहांतुनी सुटला
हे आंथरूण तोंवरि आपण जें अर्पिले उपायनसें
तें ती निद्रा देवो कर्तव्या जीमधें अपाय नसे
करण्या पुनरपि युद्धोद्युक्तचि निजवूनि देह हा दमला
ही सुखशय्या उठवो रणशय्येसमचि निरपवाद मला.
सावरकरांची ती ’सुखशय्या’ असली तरी जोवर हे हिंदूजातीय राष्ट्रस्वातंत्र्याचे ध्येय प्राप्त झाले नाही, तोवर त्या शय्येने मला ’रणशय्या’ देते तितकाच विसावा द्यावा. प्रत्यहींच्या युद्धात दमलेला देह उदर्ड्कच्या युद्धाला तोंड देण्यास अधिक समर्थ व्हावा, इतक्याचपुरती निद्रा वेळात वेळ काढून झुंजत्या सैन्यांतील सैनिकास जशी घेऊ देतात - तितकीच मला मिळो. ध्येय साध्य झाल्यावर मग ही संपूर्णपणे ’सुखशय्या’ होवो: तोंवर ती ’रणशय्या’ होवो. सावरकर हे त्यावेळेस जन्मठेपेच्या कारागारांतून नुकतेच सुटलेले होते. त्या दमण्याचा उल्लेख पराडकरांच्या पत्रात होता तोच इथे सूचित केला आहे.

१८व्या अन् १९व्या शतकातील भारतीयांचे निद्रेवरचे विचार आपल्याला २२व्या शतकातदेखील चिंतन करायला उद्युक्त करतात. सच्च्या भारतीयाची झोप या दोन उदाहरणाने उडली नसेल तरच नवल! आता भारतीय हिंदू संस्कृती जोपासणारे देशभक्त सामान्यजन अशा आपल्याला; ’निद्रे’ची महिमा कशी भासते हे आपण आता पुढच्या भागात पाहू. (क्रमश:)

श्रीपाद पेंडसे