प्लास्टिकमुक्तीच्या मुळाशी...

    31-May-2023   
Total Views |
Plastic Free Policy World Environment Day

दरवर्षी विविध संकल्पनांसह ‘जागतिक पर्यावरण दिन’ जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा तो यंदाही दि. ५ जून रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होईल. पर्यावरण दिन असेल किंवा अशा विविध उपक्रमांमुळे पर्यावरणाबद्दलची जागरुकता वैश्विक पातळीवर वाढलेली दिसते. अगदी शालेय स्तरापासून ते कामकाजाचे ठिकाण, उद्योगधंदे असा सर्वत्र पर्यावरणपूरक पद्धतींचा कसा अधिकाधिक वापर करता येईल, त्याचे नवनवीन प्रयोग समोर येत असतात.

त्यातच अलीकडे तीन ‘आर’ म्हणजे ‘रेड्यूस, रियुझ आणि रिसायकल’ या संकल्पनेचा प्रचारही मोठ्या पातळीवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या पातळीवर विविध महानगरपालिका हद्दींमध्ये ‘आरआरआर‘ केंद्रेही अलीकडे सुरू झाली आहेत. तसेच, यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना ही ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा,’ अशीच असल्यामुळे त्यादृष्टीने विविध कार्यक्रम, चर्चासत्रांचेही यंदा मोठ्या संख्येने जगभर आयोजन करण्यात आले आहे.

खरं तर प्लास्टिकचे प्रदूषण आणि पर्यावरणावर त्याचे होणारे अपरिमित दुष्परिणाम यावर चर्चा, कायदे, धोरणनिर्मिती जगभरात झालेली दिसते. परंतु, तरीही प्लास्टिकच्या पूर्णपणे वापरावर प्रतिबंध आलेला नाही. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. विशिष्ट मर्यादेपर्यंत प्लास्टिकबंदी लागू असली तरी प्लास्टिकचा सरसकट वापर आजही होताना दिसतो. मग अशाप्रकारे प्लास्टिकचे ढीग साचतच जातात आणि त्यावर रिसायकलिंग, विल्हेवाट लावण्याचे इतर मार्ग सूचविले जातात. पण, सध्या प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमाण आणि त्याच्या विल्हेवाटीचे पर्याय-पद्धती यांचे प्रमाण हे पूर्णत: व्यस्त आहे. त्यामुळे केवळ ‘रिसायकलिंग’ हा त्यावरचा एकमेव उपाय ठरू शकत नाही. त्यासाठी गरज आहे ती प्लास्टिकचा वापर कमी करण्याची आणि पर्यायाने त्याचे उत्पादनही बंद करण्याची. त्यामुळे केवळ सर्वसामान्य नागरिकांना प्लास्टिक वापरू नका, अशा सूचना देण्याबरोबरच प्लास्टिकचे उत्पादन करणारे उद्योगधंदे, कंपन्या यांना अधिक कल्पकपणे प्लास्टिकला हद्दपार करण्याचा विचार करावा लागेल.

प्लास्टिकला दुसरा पर्यायच नाही, हा भ्रमाचा भोपळा त्यासाठी आधी फोडावा लागेल. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा प्लास्टिकसंबंधी उद्योगधंद्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करून सरकारतर्फे योग्य ते धोरण राबविण्यात येईल. त्यामुळे प्लास्टिकबंदी हे उत्तर योग्य असले तरी त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने आणि कशी केली जाते, हेसुद्धा पाहणे तितकेच आवश्यक. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगार होणार्‍या उत्पादकांपासून ते वितरकांपर्यंत, या क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या रोजगाराचाही सांगोपांग विचार सरकारला करणे क्रमप्राप्त. म्हणूनच प्लास्टिकबंदीचे धोरण राबविताना त्याला दुसरा पर्याय काय? मग या प्लास्टिक उत्पादन युनिट्सना सरसकट टाळे न लावता, प्लास्टिकला पर्याय ठरणारे, पर्यावरणपूरक ठरणार्‍या विविध घटकांची निर्मिती त्याच ठिकाणी करता येईल का? यांसारख्या बाबींचा मानवीय-रोजगाराच्या दृष्टिकोनातूनही विचार करावा लागेल.

तसेच, बर्‍याच उत्पादनांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. जसे की सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित उत्पादने. मग अशा उत्पादनांमधील प्लास्टिकचा वापर कमी करण्यापासून ते शून्यावर आणण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्याचबरोबर प्रत्यक्ष प्लास्टिकइतकेच पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापरही शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, एखादी वस्तू वापरल्यानंतर त्याचे पॅकेजिंग, त्यासाठी वापरलेले प्लास्टिक हे आपसूकच कचर्‍याच्या ढिगात भर घालते. त्यामुळे जगभरातील सगळीच उत्पादने ही प्लास्टिकमुक्त आणि रिसायकल होण्याजोगी निर्माण करण्यासाठी त्यांची पुनर्रचना करणे ही काळाची गरज म्हणावी लागेल.

तेव्हा, यंदाच्या ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने प्लास्टिकला अधिकाधिक पर्यायी अशा कापड, वापरलेले कागद यांच्या वापरावर आपण भर देऊया. खरेदी करतानाही एखादी वस्तू पुनर्वापरयोग्य आहे का, याचीही नीट खातरजमा केल्यास, आपले ‘कार्बन फूटप्रिंट्स’ काहीअंशी का होईना, आपण कमी करू शकू. चला, तर यंदाच्या ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त संकल्प करूया प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची