भाजपमध्ये मोठे फेरबदल ; नव्या कार्यकारिणीची घोषणा

प्रदेशाध्यक्षांकडून नव्या टीमची घोषणा

    03-May-2023
Total Views |
major-changes-in-the-bjp-state-executive-chandrashekhar-bawankule

मुंबई : ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडी घडणारच. आमच्याशी अदयाप तरी कुणीही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात विचारणा केलेली नाही अथवा कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच कुठल्याही भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधलेला नाही. मात्र जर कुणी स्वतःहून भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्याचा पक्षप्रवेश नक्की करून घेऊ,'' असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर पक्षात मोठी खळबळ माजलेली असून कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र आहे. त्यातच सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून अशाप्रकारचे विधान आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार का ? ही चर्चा सुरु झाली आहे. बुधवार, दि. ३ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
 
पक्षप्रवेशासाठी आमचे दरवाजे खुलेच !
 
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरु आहे तो त्यांचा पक्षाचा विषय आहे. जेव्हा आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी विचारणा केली जाते तेव्हा आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्हाला कुणाच्या अस्थिरतेचा फायदा घ्यायचा नाही. आम्हाला त्यांच्याकडे बघायचे देखील नाही. देशाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून ते भाजपात येत असतील. आमचा विकासाचा अजेंडा मान्य करत असतील. मोदींच्या विकासाच्या संकल्पनेनाला साथ देणारा कुणीही असेल तर आम्ही त्याला पक्षात घेणार हे निश्चित आहे. शेवटी आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आले तर आमचे दरवाजे उघडेच आहेत. आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर पक्षप्रवेशासाठी आमचे दरवाजे खुलेच आहेत,” असेही बावनकुळेंनी म्हटले आहे.

भाजपमध्ये मोठे फेरबदल ; नव्या कार्यकारिणीची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक , संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ , प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत,सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ,सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आणि इतर.कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे,विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे)

कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, विजयाताई रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.