भारत हिंदू राष्ट्र झाला, तर जगाला प्रेरणा मिळेल

    03-May-2023
Total Views |
former-chief-justice-of-nepal-gopal-paranjali-demands-to-make-india-hindu-rashtra

नवी दिल्ली : नेपाळचे माजी सरन्यायाधीश गोपाल परांजली यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारत हिंदू राष्ट्र झाल्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. ही माहिती परांजली यांनी १ मे रोजी मथूरा येथे दिली.वास्तविक, नेपाळचे माजी सरन्यायाधीश गोपाल हे शिष्टमंडळासोबत मथुरा येथील गोवर्धन येथील मंदिरांना भेट देण्यासाठी पोहोचले होते. या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत पशुपतीनाथ विकास कोष काठमांडूचे प्रमुख सदस्य आणि संहिता लेखक अर्जुन प्रसाद वास्तोला आणि इतर १० लोक होते.

मंदिरांला भेट दिल्यानंतर त्यांनी श्री आद्य शंकराचार्य आश्रमात जाऊन गोवर्धनपुरीचे पिठाधीश्वर स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर परांजली यांनी भारत-नेपाळ संबंधांवर चर्चा करताना त्यांनी नेपाळ हे तत्त्वतः हिंदू राष्ट्र असल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतालाही हिंदू राष्ट्र घोषित केले तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल, असे ही परांजली म्हणाले. तसेच भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर जगभरात राहणाऱ्या १७८ कोटी हिंदूंनाही अभिमान वाटेल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढणार असल्याचे परांजली यांनी सांगितले.

काठमांडू येथील पशुपतीनाथ विकास कोषचे प्रमुख सदस्य अर्जुन प्रसाद वास्तोला यांनी म्हटले आहे की, २५३० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी विधर्मीयांनी नष्ट केलेल्या वैदिक सनातन संस्कृतीची पुनर्स्थापना केली होती.त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांना शंकराचार्यांच्या विचारांचा लाभ होणार असल्याचे वास्तोला म्हणाले.
 
तसेच जगात ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांचे देश असल्याचेही वास्तोलाने म्हटले आहे.ज्यूंचाही एक देश आहे. अशा स्थितीत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले पाहिजे. भारत हा दैवी देश आहे. ज्ञानाचा प्रवाह येथे नेहमीच वाहत राहिला आहे. हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झाल्यामुळे जगातील कोट्यवधी सनातनींचा आत्मविश्‍वास दृढ होईल. त्याच वेळी जगाचे कल्याण होईल.