"माझ्या आजोबांना मंत्री करा", काँग्रेस आमदाराच्या ७ वर्षाच्या नातीने लिहले राहुल गांधीना पत्र!
29-May-2023
Total Views |
बेंगलूरू: कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ खात्यांची विभागणी करण्यात आली. कर्नाटक मंत्रिमंडळात एकूण ३४ आमदारांना मंत्री करण्यात आले. या सर्वानंतर काही नेते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. नाराज आमदारांमध्ये सिरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टीबी जयचंद्र यांचाही समावेश आहे. टीबी जयचंद्र यांच्या नातीने राहुल गांधींना पत्र लिहून आपल्या आजोबांना मंत्री करण्याची मागणी केली आहे. सात वर्षांच्या मुलीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दि. २७ मे रोजी करण्यात आला. ज्यामध्ये २४ नवीन मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एका महिलेचा ही समावेश करण्यात आला आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी वित्त विभाग, माहिती, आयटी आणि बीटी, पायाभूत सुविधा विकास, गुप्तचर विभाग त्यांच्याकडे ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याकडे मुख्य आणि मध्यम पाटबंधारे विभाग तसेच बेंगळुरू शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एच.के.पाटील यांना कायदा व संसदीय कामकाज, विधी, पर्यटन मंत्रालय मिळाले आहे. गुंडू राव यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री करण्यात आले आहे. कृष्णा बायरेगौडा यांना महसूल (मुझराई वगळता) विभाग देण्यात आला आहे. गृहखात्याची जबाबदारी देव यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रियांक खर्गे यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आमदार रुद्रप्पा लमाणी, लक्ष्मण सवदी, ज्येष्ठ काँग्रेस नेते एम कृष्णप्पा, कृष्णप्पा यांची आमदार पुत्र प्रिया कृष्णा आणि टीबी जयचंद्र यांसारखे नेते मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराज असल्याची माहिती उघडकीस येत आहे.टीबी जयचंद्र यांच्या लहान नातीने तर चक्क राहुल गांधींना पत्र लिहत आजोबांना मंत्री करावे ,अशी मागणी केली. या पत्राचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काँग्रेस नेत्याच्या नातीने लिहले आहे की, "प्रिय राहुल गांधी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझे आजोबा मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून मी दु:खी आहे, मला माझ्या आजोबांनी मंत्री व्हावे असे वाटते कारण ते एक कर्तबगार, कष्टाळू आणि दयाळू व्यक्ती आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार , काँग्रेस हायकमांड टीबी जयचंद्र यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवू इच्छित होते. मात्र, त्यांनी हे पद स्वीकारले नाही.