नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात १६ वर्षीय तरुणीच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. साक्षीची हत्या करणाऱ्या साहिल सरफराजला पोलिसांनी बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथून अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण लव्ह जिहाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही साहिल सरफराजच्या हातातील दोरा पाहून हा लव्ह जिहाद असल्याचे म्हटले आहे. २० वर्षीय साहिल सरफराज हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. साहिल आणि साक्षी रिलेशनशिपमध्ये होते. साक्षीने अनेक दिवसांपासून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्याचे वडील सरफराज यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. मोबाईल बंद करून साहिल पळत होता, पण तो मावशीच्या घरी पकडला गेला. त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांना माहिती मिळाली.
जॉइंट कमिशनर विवेक किशोर यांनी सांगितले की, साहिलने साक्षीवर चाकूने 34 वार केले होते. साक्षीने अनेक दिवसांपासून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. रविवारी रात्री अचानक साहिल तरुणीसमोर आल्यावर त्याने चाकू काढून तिची निर्दयीपणे हत्या करण्यास सुरुवात केली.
दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, “दिल्लीच्या शाहबाद डेअरीमध्ये एका अल्पवयीन निष्पाप मुलीला चाकूने वार करण्यात आले आणि नंतर तिला दगडाने ठेचण्यात आले. पोलिसांना नोटीस बजावत आहे. सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत मी यापेक्षा भयानक काहीही पाहिले नाही."